esakal | ढिंग टांग  :  परीक्षा : एक पाहणे! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग  :  परीक्षा : एक पाहणे! 

कोरोनाच्या काळात परीक्षा घ्याव्यात की विद्यार्थ्यांना फुकट्यात पास करावे? हा आहे. आमच्या मते तर कोरोनायुगातच काय, कधीच परीक्षा घेऊ नयेत. जे क्रमिक पुस्तकात छापूनच आलेले आहे.  

ढिंग टांग  :  परीक्षा : एक पाहणे! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

परीक्षा या विषयावर आमचे गेले काही दिवस चिंतन चालू आहे व ते आणखी बराच काळ चालू राहील, असे दिसते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी गेले पंधरवडाभर आम्ही फडताळात बसून चिंतन करीत आहो!! आणखी आठवडाभरात आम्हाला विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेणारे "योग्य सूत्र' सापडेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. लौकरच आम्ही फडताळाच्या बाहेर येऊन परीक्षांचा फार्म्युला जाहीर करू. चिंता नसावी! 

परीक्षा या विषयी आमची काही विशिष्ट व काहीशी बंडखोर अशी मते पूर्वीपासूनच होती व हल्ली हल्ली ती काहीच्या काहीच तीव्र झाली आहेत, हे मान्य करावे लागेल. परीक्षेने काहीही होत नाही, हे आमचे पूर्वीपासूनचे मत असून निव्वळ वेळेचा अपव्यय म्हंजे परीक्षा हे आम्ही सोदाहरण सिद्ध करून दाखवू. मुदलात आमचा स्वभाव आणि पिंड तसा चिंतनशीलच. एका जागी ठिय्या मांडून चिंतन करीत राहावे, हा आमचा बालपणापासूनच आवडीचा छंद. उदाहरणार्थ, इयत्ता सातवीत असतानाच आम्हाला पाठ्यक्रमाच्या फोलपणाबद्दल विषाद दाटून आला. क्रमिक पुस्तकांची चीड आली. जिचा उपयोग बोटाच्या टोकावर गरगर फिरवण्यापलीकडे काहीही नाही, अशा वही नावाच्या वस्तूची तर तिडीक डोक्‍यात गेली. पेन ही वस्तू तर इंग्रजी अर्थानेदेखील वेदनादायी अशीच आहे, या मतावर आम्ही ठाम आहोत. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परीक्षा घेऊन नेमके काय साधते? या मूलभूत प्रश्नगुंत्यात आम्ही इतके गुंगून गेलो की सातवी पार करावयास आम्हाला तीन-चार वर्षे लागली. पुढील इतिहासदेखील असाच बंडखोर आणि रक्तबंबाळ असल्याने आम्ही त्यात पडू इच्छित नाही. असो. 

मुद्दा कोरोनाच्या काळात परीक्षा घ्याव्यात की विद्यार्थ्यांना फुकट्यात पास करावे? हा आहे. आमच्या मते तर कोरोनायुगातच काय, कधीच परीक्षा घेऊ नयेत. जे क्रमिक पुस्तकात छापूनच आलेले आहे, ते पुन्हा आपले म्हणून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेत लिहायला लावणे, हा वाङ्‌मयचौर्याचा धडा नव्हे काय? दुसऱ्याने लिहिलेले तोंडपाठ करून स्वत:चे म्हणून रेटण्याचा हा संस्कार कितपत योग्य आहे? बोला!! 

तेव्हा औंदा काय, दरवर्षी परीक्षा हा विषय ऐच्छिकच ठेवावा. किंबहुना, ऐच्छिक परीक्षेचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यास वा विद्यार्थिनीस "तुझी नक्की तयारी झाली आहे का बाळ? बरे वाटते आहे ना तुला?' असे कनवाळूपणाने विचारावे! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

""परीक्षा देऊन काय साधणार आहेस? परीक्षा देऊन का कुणाचे भले झाले आहे? आयते सर्टिफिकेट मिळत असताना तुजला ही अवदसा का बरे आठवते आहे?'' असे समजावून सांगावे! 

""मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो, परीक्षार्थी नव्हे!'' हे सुभाषित त्यांस सांगावे. ""परीक्षा देणे हे एक गर्हणीय कृत्य असून असल्या भंपक गोष्टींच्या मागे धावायचे नसते, यालाच शिक्षण असे म्हणतात,'' हे ठणकावून सांगावे! 

एवढे करूनही काही कर्मदरिद्री विद्यार्थी परीक्षेला बसून उत्तीर्ण होण्याचा दुराग्रह धरतील. त्यांना कुठल्याही पुढाऱ्याचा फोटो दाखवावा आणि मोठ्या आवाजात सांगावे : 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

""लेका या महान नेत्यांकडे जरा पाहा! या गृहस्थांनी एकही परीक्षाबिरीक्षा न देता खोटी पदवी सर्टिफिकिटे आणली. पदवीचे सोड, चक्क डॉक्‍टरेट हाणलीन!..आज हे गृहस्थ समाजाच्या उन्नयनासाठी किती झटत आहेत ते पहा! या महानुभवांची डझनभर उदाहरणे डोळ्यांसमोर ठेव आणि परीक्षेचा नाद सोड कसा!...न देशील परीक्षा तर चालवशील (तीनचाकी) रिक्षा! कळले?'' 

...हे सारे आम्हाला फडताळात बसून सुचले.