ढिंग टांग  : रंगले ते बंगले!

ढिंग टांग  : रंगले ते बंगले!

प्रिय मा. मि. मा. उधोजीसाहेब यांसी,
फारा दिवसांत पत्र लिहावयाची संधी मिळाली नाही. मध्यंतरी अर्धाएक डझन पत्रे तुमच्या अधिकृत निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठवली होती. ‘आड्रेसी नॉट फाऊण्ड’ म्हणून पत्रे परत आली! चौकशी केली असता तुम्ही अजून सरकारी बंगल्यात राहायला गेला नाहीत, असे कळले. मी स्वत: दोन-चारदा तेथे चक्कर टाकली होती. बंगल्याचे गेट बंद होते. ‘‘शाबजी आताय, फौरन वापिस चला जाताय!’’ अशी माहिती गुरख्याने दिली. आतमध्ये जाण्यास मनाई आहे, असेही त्याने निक्षून सांगितल्यामुळे नाइलाज झाला. (खुलासा : पत्राच्या मायन्यातील ‘प्रिय मा. मि. मा.’ याचा फुलफॉर्म ‘प्रिय माजी मित्रवर्य माननीय’ असा आहे!) असो.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सदरील बंगल्यातील रहिवासी ऊर्फ आड्रेसी तूर्त बांदऱ्यात राहात असून, सदर सर्कारी बंगल्याचे नूतनीकरण चालू आहे, अशी माहिती मिळाली. मी तेथे पाच वर्षे (सुखात) राहिलो आहे. माझ्या खूपशा (चांगल्या) आठवणी त्या बंगल्याच्या आवारात रेंगाळत आहेत. तुम्ही तेथे राहायला गेलात की जेवणाच्या निमित्ताने येऊन अधूनमधून त्या आठवणी ताज्या करण्याचा माझा बेत होता. मगर वह हो न सका...

बंगल्यांचे नूतनीकरण हा माझ्या मते काही फार मोठा विषय नाही. परंतु, कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, पण बंगल्यांची रंगरंगोटी आणि चकाचक करण्यासाठी मात्र नव्वद कोटी रुपये खर्ची पडत आहेत, हे ऐकून थोडे वाईट वाटले इतकेच. हल्ली महागाईच फार वाढली आहे. मध्यंतरी आमच्या घरातील नळाची तोटी खराब झाली म्हणून प्लंबरला बोलावले, त्याने दोन हजार रुपये होतील, असे सांगितले! साधी नळाची तोटी दोन हजारांची तर बंगल्यांच्या नूतनीकरणाला किती खर्च येईल? याचा लोक विचार करत नाहीत. नव्वद आणि शंभर कोटीचे आंकडे ऐकले की सामान्य लोकांना वाटते की या मंत्रीमहोदयांनी स्विमिंगपूलसकट बंगला सजवला असणार! वास्तविक पाहता या बंगल्यांची पाणीपट्टीसुद्धा थकलेली आहे, असे कळते! (तुमच्या बंगल्याची नव्हे हं!) साध्या दोन खोल्यांच्या घराचे वीजबिल हल्ली काही हजारांच्या घरात येते, नूतनीकरणावर खर्च तर होणारच! मी म्हणतो होऊ दे खर्च!! पण...

सरकारी बंगले काही आम्हा मंत्र्यांच्या मालकीचे नाहीत, असे एका (तुमच्या) ज्येष्ठ मंत्र्याने घुश्‍शात सांगितले. खरे आहे! पण सजावटीचा पैसा तरी कुठे तुमचा आहे? तो करदात्यांचा आहे आणि त्यांच्या घरातल्या नळाची तोटी कायमस्वरूपी बिघडली आहे. वीजबिलांनीही त्याच्या तोंडचे पाणी पळवले आहे.

हे पत्र एवढ्यासाठीच लिहिले आहे (व ते बांदऱ्याच्या पत्त्यावर पाठवले आहे!) की सरकारी बंगल्यांचे नूतनीकरण असेच चालू ठेवावे. लोक काय म्हणतात, त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये! बंगल्यांचे नूतनीकरण ही एक आवश्‍यक गोष्ट आहे. कारण ओळखा! करेक्‍ट...‘मी पुन्हा येईन’, असे मी मागेच म्हटले होते. माझ्या शब्दांवर मी अजूनही कायम आहे. 

शब्द दिल्याप्रमाणे आम्ही रेडिमेड बंगल्यातच येऊ, असे म्हंटो!! सगळी रंगरंगोटी आटोपली की कळवावे, पुढचे आम्ही बघून घेऊ!! बाकी सर्व क्षेम. कळावे. 

आपला मा. मित्र. नानासाहेब फ.
ता. क. :  मध्यंतरी दोन-चार वेळा फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, बघावे तेव्हा तुम्ही नेटवर्क क्षेत्राच्या बाहेरच होता!! शेवटी तर ‘पुन्हा पुन्हा फोन भी ना करें’ असे ऐकू आले तेव्हा नाद सोडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com