ढिंग टांग : एकहाती आत्मचिंतन! (एक पत्रापत्री!)

maharashtra-politics
maharashtra-politics

मा. प्रदेश कमळाध्यक्ष, श्री. चंदुदादा कोल्हापूरकर यांसी, बालके नानासाहेबांचा शतप्रतिशत प्रणाम. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये आपल्या समर्थ नेतृत्वाखाली पक्षाला एकहाती एक जागा मिळाली. हे यश घवघवीत म्हणायला हवे. अभिनंदन! आपल्या मार्गदर्शनाखाली, आणि (माझ्या) परिश्रमांच्या जोरावर पक्षाला असेच एकहाती यश भविष्यात मिळो, ही प्रार्थना.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा अहवाल मी दिल्लीला पाठवला आहे. त्यात विजयाचे सारे श्रेय आपल्यालाच दिले आहे!! ‘सहापैकी फक्त एक?’ असे राष्ट्रीय कमळाध्यक्ष श्री. नड्डाजींनी विचारले होते. त्यांना मी (पाण्याने) अर्ध्या भरलेल्या ग्लासाची उपमा दिली. घोटभर पाणीही पुरेसे असते, हे सांगितले. त्यांना पटले!! सहापैकी फक्त एक जागा पक्षाला मिळाली असली तरी त्या एकहाती आहेत, हे विसरुन चालणार नाही. कुठल्याही पक्षाशी आपली (आता) मैत्री नाही.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मैत्रीसाठी हात पुढे केला तर लोक मान वळवतात!! अशा स्थितीत मिळालेले हे यश रग्गड म्हणावे लागेल. मी नेहमीच सकारात्मक (आणि हसतमुख) राजकारण करीत आलो आहे. कुठल्याही निवडणुकीत यश वा अपयश मिळो, आत्मचिंतन करणे, हा आपल्या पक्षाचा स्वभावच आहे. तशी पक्षाची आत्मचिंतन बैठक लौकर बोलवावी, व आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती करण्यासाठी हे स्मरणपत्र. सर्वांनी मिळून आत्मचिंतन करुया. कळावे. आपला एक निरलस पक्ष कार्यकर्ता. 

नानासाहेब फ. (माजी व भावी मुख्यमंत्री, महाराष्ट्र)

ता. क. : सध्या सर्व ठिकाणची उपाहारगृहे सुरु झाल्याने पार्सल सेवा उपलब्ध आहे. बैठकीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पार्सलच मागवू! दादर येथे एका ठिकाणी उत्तमसाबुदाणावडा मिळतो. 
कळावे. आपला. नाना फ.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मा. नानासाहेब, सप्रेम व शतप्रतिशत नमस्कार. आपले पत्र मिळाले. पक्षाच्या आत्मचिंतनाची गरज सध्या मला तरी वाटत नाही. मुळात आत्मचिंतन कोण करते? ते पराभूताने करावयाचे असते. आपला काय संबंध? आपण ठरल्याप्रमाणे दणकून विजय मिळवला आहे, हे तर उघड दिसते आहे!! काही लोकांना ‘कमळवाल्यांचे नाक ठेचले’ असे म्हणून बरे वाटणार असेल तर त्यांचा हिरमोड कां करावा? म्हणू द्यात. मी तर म्हणेन, ग्लास (पाण्याने) गच्च भरलेलाच नाही. तो रुह अफजा नामक सरबताने भरला असून पेलादेखील सुवर्णाचा आहे!! असो. नुकत्याच झालेल्या शिक्षक व पदवीधर निवडणुकांमध्ये आपल्याला सहापैकी एक जागा मिळाली. तुमच्या आणि आमच्या (बैठकीचे) खालचे पाट गेले, असे लोक म्हणताहेत!!

(पक्षी : नागपूर आणि पुणे!) म्हणोत बापडे!
गेले दोन-तीन दिवस मी एकट्याने चिंतन करत होतो. रात्री झोपेतही तेच चालू होते. परवा रात्री ओरडत उठलो! घामाघुम झालो होतो. पाणी पिऊन परत झोपण्याचा प्रयत्न केला. झोप लागली नाही. हा आत्मचिंतन एकट्याने करण्याचा परिणाम आहे, असे लक्षात आले. तेव्हा एकदा सामूहिकरित्या आत्मचिंतन करावे असे मलाही वाटत होतेच. आपली सूचना चांगली आहे. तेव्हा लौकरच एकदा भेटून आत्मचिंतन करुयात.
पार्सलचे लक्षात ठेवतो. कळावे. 
आपला कमळाध्यक्ष, चं. कोल्हापूरकर (माजी व भावी मुख्यमंत्रीच!)

ता. क. : वेषांतर करुन गुप्तपणे आत्मचिंतन बैठक करावी का? पत्रकारांच्या टोळ्या हिंडत असतात. 
कळावे. चं. को.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com