ढिंग टांग : गवगवा!

ढिंग टांग : गवगवा!

प्रति, मा. मुख्यमंत्रीसाहेब (म. रा.) यांसी,
विषय : महात्मा सोसायटी (पुणे!) तील रानगव्याच्या अपमृत्यूबाबत गोपनीय चौकशी अहवाल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महोदय,
तारीख नऊ माहे डिसेंबर वर्ष २०२० रोजी सकाळी सातचे सुमारास कोथरुड भागात (पुणे!) एक एकांडा रानगवा आढळून आला. त्यावेळी अनेक जण मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले होते. रस्त्यावर रहदारी वाढली होती. गर्दीही जास्त होती. साहजिकच सुरवातीला तो रानरेडा आहे, हे कळून आले नाही! सर्वांची न्याहारी वगैरे पोटभर झाल्यानंतर कोथरुडच्या महात्मा सोसायटीत गवा शिरल्याचा गवगवा झाला. लोकांनी आपापल्या ग्यालऱ्या आणि खिडक्‍यांमधून आधी गव्याचे फोटो व व्हिडिओ काढले व ते पोस्ट केले. या दरम्याने, खबर मिळताच वनविभागाचे कर्मचारी तेथे पोचले. प्रारंभी ‘साधीच म्हैस असणार’ अशी वनकर्मचाऱ्यांची प्राथमिक अटकळ होती. कारण असे फेक कॉल अनेकदा येत असतात. मागल्या खेपेला नळ स्टॉप चौकात बिबट्या आल्याची खबर मिळाली होती. वनकर्मचाऱ्यांचे पथक पोचले, तेव्हा ते मांजर निघाल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच आप्पा बळवंत चौकात कोल्हा आल्याची आवई उठली होती, ते वेगळेच प्रकरण निघाले! निवडणुकीचे दिवस होते, म्हणून राजकीय पक्षाचा रोड शो होता! असो.

कोथरुडमधला गवा हा खराखुरा रानगवाच असल्याचे निष्पन्न झाले. सदर रानगवा सुमारे आठशे ते नऊशे किलो वजनी गटातील असून पूर्ण वाढीचा नर होता, असे प्राणीतज्ञांनी कन्फर्म केले. रानगव्यास एकंदर कोथरुडच्या सोसायट्यांमध्ये रस असावा, असे वाटते. रात्री शिट्या वाजवीत गुरखे फिरतात, त्याप्रमाणे सदर रानगवा एका सोसायटीच्या आवारातून दुसऱ्या सोसायटीच्या आवारात घुसत होता. वास्तविक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर ‘फेरीवाल्यांना प्रवेश नाही’ असा फलक होता. तरीही या रानगव्याने बेकायदा प्रवेश केल्याने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार गुदरण्यास काही नागरिक निघाले. परंतु, दारात रानगवा असल्याने घरातून बाहेर पडणे मुश्‍किल झाले व पोलिसात तक्रार देणे रद्द करणेत आले. रानगवा हा काही फेरीवाला नसल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई संभवत नसल्याकडे काही नागरिकांनी लक्ष वेधले, हा भाग अलाहिदा.

अखेर रानगव्याला भुलीचे इंजेक्‍शन देऊन वर जाळे टाकून जेरबंद करण्याची योजना आखण्यात आली. भुलीचे इंजेक्‍शन आणण्यासाठी गेलेला कर्मचारी लौकर परतला नाही. कारण आपण कशासाठी गेलो, हेच तो विसरला! अखेर एका मिसळीचे दुकानी त्यास शोधून काढण्यात आले व सरकारी कामाचे स्मरण करुन देण्यात आले. त्यात आणखी वेळ वाया गेला. भुलीचे इंजेक्‍शन रानगव्याच्या कमरेवर टोचावे की आणखी कुठे, हे ठरवण्यात बराच वेळ गेला. कारण रानगव्याची कंबर कुठे सुरु होते व कुठे संपते हे निश्वित होत नव्हते. रानगवा हा विशालकाय प्राणी आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंजेक्‍शन बंदुकीने मारण्याच्या कामी दोन वेळा अपयश आले. नेम चुकून दोन पुणेकर नागरिक सकाळच्या सुमारास गाढ झोपी गेल्याचे आढळून आले!! अखेर तिसरे इंजेक्‍शन अचूक लागले, परंतु, रानगवा झोपता झोपेना, अखेर काही नागरिकांनी ‘वन्यजीव अधिवास आणि बेसुमार शहरीकरणाचे तोटे’ या विषयावर परिसंवाद सुरु केला. (पुण्यात अशीच पद्धत आहे, असे सांगण्यात आले!) या परिसंवादामुळे मात्र सदर रानगवा निपचित पडला. इस्पितळात नेले असता वन्यजीवतज्ञांनी त्यास मृत घोषित केले. तो चर्चेने मेला, असा प्राथमिक अंदाज आहे. इति. आपला आज्ञाधारक. डॉ. बाजीराव बंदुकवाले, मानद वनक्षेत्रपाल, कोथरुड रेंज. पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com