esakal | ढिंग टांग : सांकडे! 
sakal

बोलून बातमी शोधा

vitthal

माझ्या महाराष्ट्राचं भलं होऊ दे! माझ्या शेतकऱ्यांना पीकपाणी भरपूर मिळू दे! माझ्या महाराष्ट्रातल्या तमाऽऽम रयतेला आरोग्य लाभू दे! धरणांत पाणी साठू दे! मुख्य म्हंजे हे कोरोनाचं हे संकट आजपासूनच टळू दे!

ढिंग टांग : सांकडे! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : सर्किट हौस, पंढरपूर. वेळ : पहाटेची.
काळ : मंगल.पात्रे : आध्यात्मिक.

अत्यंत शुचिर्भूत मनाने मा. उधोजीसाहेब ‘अजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु’ हे भक्तिगीत गुणगुणताहेत. कपाळास गंध आहे. खांद्यावर उपरणे आहे. आषाढीची यथासांग पूजा झाल्यानंतर येणारे अष्टसात्त्विक भाव मुखमंडलावर उमटले आहेत. अब आगे...

चि. विक्रमादित्य : (खोलीचे दार ढकलून आत येत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (कळवळून) निदान पंढरीत तरी नको रे इंग्रजीत विचारूस! आज आषाढी एकादशी आहे! आपल्या मराठी माणसाच्या हृदयातील दैवताचा सण!

विक्रमादित्य : (जीभ चावून) ओके (पुन्हा जीभ चावत) बरं बरं...मी आत येऊ का?

उधोजीसाहेब : (शांत वृत्तीने) मुखपट्टी कुठं आहे तुमची माऊली? मुखपट्टीशिवाय कसं येता येईल खोलीत?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) माऊली म्हंजे?

उधोजीसाहेब : (प्रचंड संयमानं) होय! इथं पंढरीच्या वारीत एकमेकांना ‘माऊली’ म्हणून संबोधायची पद्धत आहे...

विक्रमादित्य : (अनवधानाने) आय सी!

उधोजीसाहेब : कित्ती बरं वाटतंय नाही?

विक्रमादित्य : मला नेहमीच बरं वाटतं! बांदऱ्यातसुद्धा!!

उधोजीसाहेब : (कृतज्ञतेनं हात जोडत) पांडुरंगाची अशी यथासांग पूजा करायला मिळेल, असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं! काल रात्री आलो काय, पहाटे अडीच-तीनला उठून पूजेला बसलो काय...सारं काही स्वप्न आहे! मजला चिमटा काढ बरं?...ओय! इतक्‍या जोरात नव्हता सांगितला!!

विक्रमादित्य : विठ्ठलाकडे काय डिमांड केलीत बॅब्स! 

उधोजीसाहेब : (पुन्हा कळवळून) डिमांड नाही रे! सांकडं म्हणतात त्याला, सांकडं! 

विक्रमादित्य : (गोंधळून) सॅक्‍ड? हुज बीन सॅक्‍ड? हल्ली बऱ्याच ठिकाणी असं सॅकिंग चाललं आहे खरं!!

उधोजीसाहेब : (प्रयत्नपूर्वक शांत राहात) साकडं म्हंजे...ते हे...आपलं त्याला विनंती किंवा...अं...(नाद सोडत) डिमांडच समज! पण प्रेमाची डिमांड हं! !

विक्रमादित्य : व्हॉटेव्हर! पण तुम्ही मागितलं काय?

उधोजीसाहेब : (सात्त्विक सुरात) हेच...माझ्या महाराष्ट्राचं भलं होऊ दे! माझ्या शेतकऱ्यांना पीकपाणी भरपूर मिळू दे! माझ्या महाराष्ट्रातल्या तमाऽऽम रयतेला आरोग्य लाभू दे! धरणांत पाणी साठू दे! मुख्य म्हंजे हे कोरोनाचं हे संकट आजपासूनच टळू दे! त्या विषाणूने एकदाचं तोंड काळं करू दे! सरहद्दीवरचं चिनी अरिष्ट जाऊ दे! 

विक्रमादित्य : (अचंब्यानं) केवढी मोठी लिस्ट ही? एवढ्या डिमांड्‌स कशा पूर्ण होणार?

उधोजीसाहेब : हे तर काहीच नाही! माझ्याकडे मोजून तीनशेतेहेतीस डिमांड्‌स आहेत! काही साकडी इथे घालायची, थोडी गणेशोत्सवासाठी राखून ठेवली आहेत! 

विक्रमादित्य : पुरेशी पीपीइ किट्‌स मिळू देत! जीएसटीचा परतावा मिळू दे! गरिबांना डाळ-तांदूळ मिळू देत! किंवा मुंबईकरांसाठी लोकलगाड्या सुरू होऊ देत!...या डिमांड्‌ससुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा!!

उधोजीसाहेब : (सपशेल नकार देत) छे, या डिमांड्‌स केंद्र सरकारकडे करायच्या असतात! 

विक्रमादित्य : (निरागसपणे) तुम्ही स्वत:साठी काहीही मागितलं नाहीत बॅब्स!

उधोजीसाहेब : (तृप्त मनाने) मला काहीही नकोय! जे मिळालंय, तेसुद्धा कधी मागितलं नव्हतं बाळा! माझा महाराष्ट्र संकटमुक्त झाला, की बास!! 

विक्रमादित्य : (कानात विचारत) आमचं तीनचाकी आघाडी सरकार टिकू दे, अशी डिमांड करून ठेवलीत ना गपचूप? नाही तर पंचाईत व्हायची!! काय?