ढिंग टांग : मुलाखतीपूर्वीची मुलाखत!

political leaders
political leaders

राजकारणात काहीही घडू शकते हे खरे आहे. आमच्या मते राजकारणात काहीही नव्हे तर काहीच्या काहीही घडू शकते. आमचे परममित्र श्री. रा. रा. नानासाहेब फडणवीस आणि आमचे दुसरे जिव्हाळामित्र व प्रसिद्ध मुलाखतकार श्री. रा. रा. संजयाजी राऊत यांची सांताक्रूझच्या एका पंचतारांकित हाटेलात भोजनभेट झाल्याने एकच खळबळ उडाली. वास्तविक भविष्यातील एका म्यारेथॉन मुलाखतीचा ढाचा ठरवण्यासाठी ही भेट झाली होती. तिजला राजकीय संदर्भ काहीही नव्हता, हे आम्हाला सर्वात आधी कळाले! कारण या उभयतांस भोजनाचे पदार्थ आणून देण्याच्या (आणि रिकाम्या प्लेटी नेण्याच्या) ड्यूटीवर आम्हीच होतो. या बैठकीचा अंदरुनी वृत्तांत थोडक्‍यात असा आहे :

सर्व प्रथम मुलाखतकार रा. संजयाजी येऊन टेबलाशी बसले. हे गृहस्थ पंचतारांकित जेवणाचे बिल देऊ शकतील का? अशी शंका आम्हाला येऊ लागली असतानाच, दरवाजातून रा. नानासाहेबांनी एण्ट्री मारिली. जीव भांड्यात पडला. दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन न करता मूठ वळून एकमेकांच्या मुठीवर हापटली. (खुलासा : हल्ली आयपीएल सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडू असेच अभिष्टचिंतन करताना आम्ही पाहिले आहेत. असो.) बिल भरणारा माणूस कोण? हे आम्ही वेटरलोक बरोब्बर ओळखतो. तदनुसार रा. संजयाजी हेच भोजनाचे यजमान असणार, हे आम्ही वळखले.

‘‘सध्या काय चाल्लंय?,’’ रा. संजयाजी यांनी अघळपघळपणे विचारले.

‘‘हाच...हाच प्रश्न मेन मुलाखतीत विचारायचा नाही! सांगून ठेवतोय!’’ तोंडावरचा मास्क त्वेषाने उतरवत रा. नानासाहेब म्हणाले, ‘‘दर म्यारेथॉन मुलाखतीत तुम्ही अशीच सुरवात करता!’’

‘‘बरं बरं! काय घेणार?’’ रा. संजयाजींनी पुढला प्रश्न विचारला. त्यावर रा. फडणवीस यांनी एकदा गाल, एकदा मान, आणि एकदा डोके खाजवले.

‘‘हे तुम्ही मुलाखतीत विचारणार आहात?’’ त्यांनी संशयाने विचारले. थोडा वेळ कोणीही काही बोलले नाही. आम्ही दोघांसमोर मेन्यूकार्ड ठेवले. मेन्यूकार्डवर नजर टाकून रा. संजयाजी यांनी आधी पाणी मागवले! आमच्या हाटेलातील पदार्थांच्या किंमती जरा जास्तच पंचतारांकित असल्याने अशी प्रतिक्रिया होणे साहजिक होते.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

‘‘तुम्हाला माहीतच आहे, की मी या आधी दोघा दिग्गजांच्या म्यारेथॉन मुलाखती घेतल्या आहेत. तुमचीही घेऊ! पण त्याआधी काही गोष्टी ठरवायला हव्या!..,‘‘ रा. संजयाजी यांनी विषयाला हात घातला.

‘‘ठरवा! दोन प्लेट पनीर बिर्याणी, दोन प्लेट कोफ्ता करी, सहा नान...’’ मेनू कार्ड फेकत रा. नानासाहेबांनी शाकाहारी ऑर्डर दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘चालेल!’’, रा. संजयाजींनी मान डोलावली.

‘‘चालेल काय? तुम्ही तुमची ऑर्डर द्या!,’’ रा. नानासाहेबांनी रुमाल मांडीवर पसरत फर्मावले. त्यानंतर रा. संजयाजी मोजून साडेदहा मिनिटे निपचित पडले होते. नंतर उठून त्यांनी पुन्हा एक गिलासभर थंड पाणी मागवले. 

‘‘ही मुलाखतीपूर्वीची मुलाखत आहे, असं म्हणूया!,’’ कागद पेन काढत रा. संजयाजींनी जाहीर केले.

‘‘प्री-मुलाखत मुलाखत असं म्हणा!,’’ रा. नानासाहेबांच्या समोर एव्हाना काकडी, टामेटो आदी सलाड येऊन ठेपले होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

‘‘मी सडेतोड प्रश्न विचारीन बरं का?’’ रा. संजयाजींनी इशारा दिला.

‘‘ठीक! पण मी डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लागार आहे, असं म्हणू नका म्हंजे मिळवली!
उधोजीसाहेबांना तुम्ही डब्ल्यूएचओत पाठवलं होतंत!... ए, कांदा आण रे!,’’ रा. नानासाहेब

म्हणाले. शेवटचा आदेश आमच्यासाठी होता.

...अखेर म्यारेथॉन मुलाखतीपूर्वी अशा तीन-चार प्री-मुलाखती व्हाव्यात, असे सुचवून रा. नानासाहेबांनी बडिशेप उचलत निरोप घेतला. आम्ही शांतपणे बिल यजमानांच्या पुढ्यात ठेवले.  जय महाराष्ट्र!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com