esakal | ढिंग टांग : आहे आणि नाही! 

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : आहे आणि नाही! 

शेवटी आपल्यामुळे ते सरकार सत्तेत आलंय! मी तेव्हा "हो' म्हटलं नसतं तर आज काय झालं असतं तिथं? किंवा समजा, मी आजही "नको' म्हटलं तर काय होईल तिथं? याचा अर्थ आपण महाराष्ट्रात व्हेरी मच सत्तेत आहोत!

ढिंग टांग : आहे आणि नाही! 
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बेटा : (अत्यंत सळसळत्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक! 

मम्मामॅडम : (निर्विकारपणे कागदपत्रे हातावेगळी करत) हं! 

बेटा : (हसतमुखाने) कॅन यु सी मी? मी दिसतोय तुला? 

मम्मामॅडम : (न बघताच) काहीतरीच तुझं! न दिसायला काय झालं? 

बेटा : (स्वत:भोवती जादूची छडी फिरवत) आब्राकाडब्राऽऽ...आला मंतर, कोला मंतर! आता दिसतोय? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मम्मामॅडम : (कामात बिझी राहून) थोडा थोडा! 

बेटा : (चिंतेत पडत) याचा अर्थ माझा मंत्र अजून पुरता इफेक्‍टिव झालेला नाही! 
मम्मामॅडम : (मान वळवून बघून धक्का बसून) हे काय? हा कुठला ड्रेस? 

बेटा : (टोपी काढून मान लववून) आयम द मॅजिशियन! हाहा!! 

मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालून) हे काय आता नवीन? 

बेटा : (विजयी मुद्रेने) आता तुम्ही पाहणार आहात माझा फेमस व्हॅनिशिंग ऍक्‍ट!! एका क्षणात अदृश्‍य होण्याचा प्रयोग! हा असा गेलो, आणि हा असा प्रकटलो!! नाऊ यु सी मी...(झुऽऽईऽऽ...) नाऊ यु डोण्ट! दिसतोय का आता? नाही ना? हीच ती जादू!! 

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) कुठून शिकून येतोस हे सगळं? 

बेटा : (जादूची छडी स्टाइलीत वागवत) महाराष्ट्रातून! 

मम्मामॅडम : (गोंधळून) तिथं जादू शिकवतात? 

बेटा : (पोक्तपणाने) वेल, तिथल्या हवेतच जादू आहे! तिथं आपली पार्टी सत्तेत आहे आणि नाहीही! 

मम्मामॅडम : (किंचित वैतागाने ) माझ्या माहितीप्रमाणे आपण तिथे सत्तेत आहोत! व्हेरी मच!! मी स्वत: आपल्या लोकांना तिथे सत्तेत बसायला परमिशन दिली आहे! 

बेटा : (खुलासा करत) तेच तेच! आपण तिथे सत्तेत आहोत, पण नाहीओतसुद्धा! 

मम्मामॅडम : (कंप्लिट गोंधळून) म्हंजे? मला काहीही कळत नाहीए! 

बेटा : (चष्मा सावरून समजावत) ये देखो, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब ऐसे राज्यों में हम हैं, लेकिन महाराष्ट्र में हम हैं, और नही भी है! नहीं समझे? ठीक है, मैं समझाता हूं...महाराष्ट्रात आपण सरकारला सपोर्ट फक्त करतो, पण निर्णय घेत नाही! बरोबर? 

मम्मामॅडम : (चक्रावून) अगदी असंच काही नाही! आपले मंत्री आहेत ना तिथे! 

बेटा : (गंभीरपणे) ते आहेत आणि...नाहीतही! म्हंजे ते असतात, पण खरं तर नसतातच! खरंय ना? 

मम्मामॅडम : (विरोध करत) असं कसं म्हणता येईल? शेवटी आपल्यामुळे ते सरकार सत्तेत आलंय! मी तेव्हा "हो' म्हटलं नसतं तर आज काय झालं असतं तिथं? किंवा समजा, मी आजही "नको' म्हटलं तर काय होईल तिथं? याचा अर्थ आपण महाराष्ट्रात व्हेरी मच सत्तेत आहोत! 

बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) पण आपल्याला तिथं काही पॉवर आहे का? निर्णय घेऊ शकतो का? नाही! याचा अर्थ आपण महाराष्ट्रात व्हेरी मच सत्तेत नाही! 

मम्मामॅडम : (स्वत:चीच समजूत घालत) आहोत रे आहोत! 

बेटा : (डोळे मिटून नकारार्थी मान हलवत) नाही हो, नाहीओत!! 

मम्मामॅडम : (फणकारून) आपल्या तिथल्या मंत्र्यांना फोन लाव बरं! त्यांनाच विचार की ते सत्तेत आहेत की नाही! 

बेटा : (पुन्हा जादूगाराच्या पोजमध्ये येत) दे टाळी! त्यांच्याकडूनच तर मी शिकलोय ही जादू! म्हटलं तर मंत्री, म्हटलं तर काही नाही! नाऊ यु सी मी...नाऊ यु डोण्ट! मी आहे...आणि नाहीही! हाहा!!