ढिंग टांग : आरे आरे! (एक मुंबईतील अरण्यकथा!)

ढिंग टांग : आरे आरे! (एक मुंबईतील अरण्यकथा!)

मार्गशीर्ष महिन्यातली ती एक रम्य सकाळ होती. पाखरे चिवचिवत होती. अरण्य जणू कडाक्‍याच्या थंडीत जणू गोठून गेले होते. (खुलासा : हे वाक्‍य आपले इफेक्‍टसाठी. मुंबईतल्या अरण्यात कुठली थंडी? ह्या!! उकडत असतं जाम! ) आरेवनातील अरण्यात दोन शिकारी दबक्‍या पावलांनी चालत पुढे आले. त्यांच्या चाहुलीने आरेवनात थोडी खसफस झाली. रात्रभर शेजारच्या बोरिवली-गोरेगावातल्या गल्लीत भुंकून भुंकून दमलेले चार-सहा गावठी श्वान वैतागून उठले आणि दुसरीकडे जाऊन वेटोळे फिरून पुन्हा झोपले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘बॅब्स, लुक...इंडियन लुपस फॅमिलियारिस...ही जंगलात रेअर स्पेसी आहे हं! आपल्या आरे फॉरेस्टमध्ये सापडली, हा मोठा शोध ठरेल!’’ धाकल्या शिकाऱ्याने थोरल्या शिकाऱ्याला उद्देशून आपले जनरल नालेज सांगितले. थोरल्या शिकाऱ्याने त्याच्याकडे कौतुकाने पाहिले. हल्ली कुठली तरुण मुले झाडापाल्यात इंटरेस घेतात? कुणाला प्राणीजगताचे शास्त्रीय ज्ञान अवगत असते? ‘पोरगं गुणी आहे, नाव काढील,’ या विचाराने थोरला शिकारी मनातल्या मनात सुखावला.

तेवढ्या एक कावळा कोकलत एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे गेला. 

‘‘बॅब्स...कोर्वस स्प्लेण्डेन्स ऊर्फ कॉमन क्रो!’’ धाकल्याने बोट दाखवले. थोरल्याने ‘‘हो हो, होका? वावा!’’ असे कौतुकोद्गार काढले. आणखी थोड्या वेळात दोघांनाही सात चिमण्या, बारा कावळे, तेरा कुत्री आणि आठ-दहा घुशी असे वन्यजीवांचे दर्शन झाले.

अरण्यवाचनाचा हा छंद दोघांनाही पहिल्यापासूनच आहे. थोरले शिकारी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निसर्ग छायाचित्रकार!  त्यांनी आपले फोटो काढावेत म्हणून प्रत्यक्ष वाघ धडपडतात, अशी दंतकथा आहे. मागल्या खेपेला एकदा ते फोटो काढत असताना एक अत्यंत आगाऊ स्वभावाचा वाघ क्‍लोजअप देण्यासाठी उगीचच पुढे आला. तेव्हा त्यांनी त्याचा फोटो काढण्यास सपशेल नकार दिला. वाघ झाला म्हणून काय झाले? भलतेसलते लाड चालणार नाहीत...तेव्हापासून बोरिवलीचे बिबटेही त्यांना दबकून असतात. मुळीच तोंड दाखवत नाहीत. असो.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दोघांचेही यथास्थित अरण्यवाचन सुरू होते. चालता चालता ते आरेवनाच्या एका कोपऱ्यात आले. तिथे शेकडो झाडांचे नुसतेच भुंडे बुंधे होते. झाडे गायब! कुठल्या तरी नतद्रष्ट, स्वार्थी लाकूडचोरांनी रातोरात तोड केली म्हणे! नुसत्या आठवणीने थोरल्या शिकाऱ्याच्या अंगाची आग आग झाली. पापी माणसं!! जितीजागती झाडं तोडून यांना मेट्रो चालवायची आहे!! शी:!! काय हा दळभद्रीपणा!!

‘‘बॅब्स...हे कॅक्‍टस आहे?’’ धाकल्या शिकाऱ्याने कुतुहलाने विचारले. तोडलेल्या झाडांच्या भुंड्या बुंध्यांकडे तो भिंगाने पाहात होता. थोरल्या शिकाऱ्याने एक आवंढा गिळला.

‘‘क्‍याक्‍टस नाही रे! चांगली वाढलेली झाडं तोडली काही लोकांनी! त्याचे उरलेले बुंधे आहेत हे!’’ दु:खी सुरात थोरल्या शिकाऱ्याने जनरल नालेज दिले. क्‍याक्‍टस कसे दिसते, हा पुढला बालसुलभ प्रश्न येऊ नये, असे त्याला मनातून वाटत होते. 

‘‘इथेच मेट्रोची कारशेड होणार होती ना?’’ अनपेक्षितपणे बालसुलभ प्रश्न आला.

‘‘होय रे होय! इथेच होणार होते ते कारशेड नावाचे कारस्थान!’’ दातओठ खात थोरल्या शिकाऱ्याने उत्तर दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘आता ते कांजूरमार्गला गेले ना?’’ आणखी एक बालसुलभ प्रश्न त्यांच्या कानावर येऊन आदळला. थोरले शिकारी काहीच बोलले नाहीत.

‘‘सांगा ना बॅब्स...मेट्रो आता कांजूरमार्गला गेली ना?’’ धाकल्या शिकाऱ्याने हट्ट सोडला नाही. विक्रमादित्यच तो!!

‘‘कुणास ठाऊक, कुठे गेली तुमची मेट्रो...’’ मटकन एका झाडाच्या बुंध्यावर बसत थोरल्या शिकाऱ्याने सुस्कारा सोडला. त्याचे तोंड भयंकर खारट झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com