ढिंग टांग : ज्याची लस, त्याची म्हस!

ढिंग टांग : ज्याची लस, त्याची म्हस!

गेले काही दिवस आम्ही जय्यत तयारीने बसलो आहो. सर्व सदऱ्यांच्या बाह्या आम्ही अर्ध्या केल्या असून पाटलोणींची बटणेही रद्द करुन कमरपट्यात इलाष्टिक मारुन घेतले आहे. लस आली रे आली की आम्ही योग्य तो अवयव सर्सावून पुढे केलाच म्हणून समजा! लसीचे इंजेक्‍शन कुठे द्यावे, याचा निर्णय आम्ही संपूर्णपणे वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर सोडला आहे.
टोचा म्हणावे, हवे तेथे!! पण एकदाची ती लस येऊ द्या...

एक मन म्हणते-
मना सज्जना, तू दमानेच घ्यावे।
उतावीळ जंतू तुवा काय व्हावे।
लसीची सुई ती तिला काय भाव।
विचारु नको तू तिला ‘काय नाव?’।।

दुजे मन म्हणते-
मना रे खुळ्या तू असा काय येडा।
उगा वाढला एवढा थोर घोडा।
जयाचीच काठी तयाचीच म्हैस।
जगीं शुभ्र आहे दुज्याची खमीस।।

भला उसकी लस मेरे लस से अच्छी कैसी? असा सवाल करीत लसींच्या कुप्या एकमेकांच्या उरावर बसल्या आहेत. त्या मस्तवाल विषाणूला कोणी हरवायचे, यासाठी त्यांच्यात चढाओढ लागली आहे. एक लस म्हणते, ‘‘बाई पुण्याची! माझ्यासमोर तुझी काय पत्रास? मीच लसींची राणी, बाकी सगळे पाणी! कळलं?’’

दुसरी लस हैदराबादी बोलीत लागलीच उत्तरते : ‘‘हाँ, अब्बी बोली तो बोली, फिरसे मत बोल! बडी आएली पूनावाली! पानी किस्कू बोलती है रे? हमारा एकच्च सुई, तेरेकू उठाके फेकेंगी, समझी क्‍या?’’

...तर जेहेत्ते काळाचे ठायी अशा या लसी एकमेकांच्या उरावर बसल्या आहेत. कोरोना आपला बाजूला उभा राहून मजेत गंमत पाहात आहे!! मजाय!! पूर्वीच्या काळी नीरक्षीरविवेक नावाची एक गोष्ट असे. नीर (मराठीभाषकांसाठी अर्थ : पाणी) कुठले आणि क्षीर (म. भा. अ : खीर!) कुठली, हे वळखून काढण्याची जबाबदारी तेव्हा प्राय: राजहंसांवर असे. हल्ली राजहंस कुठले? तेव्हा लस कुठली आणि पाणी कुठले, याचा शोध घेण्याची जबाबदारी आपल्यावरच आली आहे!! टोचल्यानंतरच त्याची खरी परीक्षा होईल!

लस निघाली तर ठीक, पाणी निघाले तर... जाऊ द्या!
लसींच्या बाजारात येत्या काळात डझनावारी लशी येतील. प्रत्येकावर वेगवेगळी लेबले आणि किंमतीही असतील. प्रत्येक लस, आपणच खरी लस असून बाकी पाणी असल्याचे सांगतील. ‘बाजार लसींचा भरला, मज (तु)लस दिसेना!’- अशी अवस्था होईल. पण दुर्लक्ष करा!! त्यापैकी आपली लस कुठली, या विचारात आपण सध्या पडू नये. क्‍योंकी हर लस लस पे लिख्खा है टोचून घेणारे का नाम!!

आम्हाला मान्य आहे की परिस्थिती गंभीर आहे. (कधी एकदाची) ती लस टोचून घेऊन तोंडावरचा मास्क फेकून देतो, असे अनेकांना झाले असणार. आम्हीही त्याच मनःस्थितीत आहोत. पण सध्या सिच्युएशन थोडी टाइट आहे. कुठली लस कुणाच्या देहात कुठे टोचली जाणार, हे अजून ठरायचे आहे. लसींचीसुद्धा एकमेकांमध्ये भांडणे सुरु आहेत. ती मिटली की झाले! मग काही चिंता नाही. तेव्हा सबूर, मंडळी सबूर! सब्र का फल मीठा होता है...

...एखाद्या लेखकाला वाचकांची नस सांपडत्ये! तशी काही शास्त्रज्ञांना बीमाराची लस अचूक सापडते, यावर विश्वास ठेवा! तुम्हीही सदऱ्याच्या बाह्या अर्ध्या करा, आणि पाटलोणीत इलाष्टिक भरुन ठेवा! त्यातच आपले भले आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com