esakal | ढिंग टांग : शिलंगणाचे सोने!
sakal

बोलून बातमी शोधा

dhing-tang

‘सोने लुटा, पण वर्च्युअल मार्गाने! व्हिडिओ कॉल हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे! विचारांचे सोने व्हिडिओवरुन लुटता येते, तर दसऱ्याच्या सोन्याने काय घोडे मारले आहे?,’मोरुने अतिशय मौलिक सूचना केली.

ढिंग टांग : शिलंगणाचे सोने!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सकाळ झाली, पण मोरू उठला नाही. लेकाचा घोरत पडून राहिला. ते पाहून मोरुच्या बापाचे पित्त खवळले. दात ओठ खाऊन तो ओरडला, ‘मोऱ्या लेका ऊठ, दसरा उद्यावर आला. दाढी, आंघोळ, स्वच्छता काही आहे की नाही? आज सात महिने झाले, नुसता लोळत पडलाहेस!’ उत्तरादाखल मोरुने मुखातून ‘फुर्रर्र...न्यम न्यम न्यम’ असे ध्वनी काढिले, आणि डोकीवरुन पांघरुण घेऊन तो पुनश्‍च घोरु लागला. मोरुचे पांघरुण खसकन खेचून, त्याचे बखोट धरुन अंथरुणातून खेचावे, अशी उबळ मोरुच्या बापास आली, परंतु, त्याचे धाडस मात्र झाले नाही. पांघरुणातून बाहेर आलेल्या मोरुच्या पायांस गुदगुल्या कराव्यात असा कट त्याच्या मनीं शिजू लागलेला असतानाच आकाशवाणी झाल्याप्रमाणे खोलीत आवाज घुमला...

‘‘बाप हो, उगीच कशाला गरीबास उठिवता? गरीबास जाग आली की भूक लागत्ये. भूक लागली की खावे लागते. खावयास घरात आहेच तरी काय? घरात दाणा शिल्लक नाही...‘‘ ही आकाशवाणी नसून पांघरुणा आतील मोरुच बडबडतो आहे, हे कळावयास मोरुच्या बापास अंमळ थोडा विलंब लागला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘असाच पोळासारखा लोळत राहिलास तर अठराविश्वे दारिद्रय येईल!! ऊठ, आणि हातपाय हालीव! पुरे झाला तुझा लॉकडाऊन! शिलंगणासाठी तयार हो! दसरा उद्यावर आला! आप्तजनांस सोने वाटायचे आहे ना? मेल्या, आळशास कसले सोने?,‘ मोरुच्या तीर्थरुपांनी वाक्ताडन केले.

‘बाप हो! तुम्ही सावधानतेचा इशारा देत आहा की शाप? सोने वाटावयास बाहेर जाऊ? मी तुमच्या वंशाचा दिवा आहे, हे लक्षात ठेवा!, ’ मोरुने चखोट युक्तिवाद केला.

‘हातास सॅनिटायझर लाव, मास्क लाव, आणि दोन गज दूरीवरुन सोने वाट हो!,’मोरुच्या बापाने उपयुक्त सूचना केली.

‘ औंदा सोने वाटणे रद्द करण्यात आले आहे, बाप हो! कोपऱ्यावरील किराणावाला उधार देईनासा झाला आहे! पगारपाणी बंद आहे, आणि हपिसे कचेऱ्याही!,’मोरुने जाहीर केले.

‘ तरीही सोने वाटलेच पाहिजे! परंपरा नावाची काही गोष्ट आहे की नाही?’मोरुच्या तीर्थरुपांनी तावातावाने बाजू मांडिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘सोने आणि माती, आम्हां समान हे चित्ती! मृत्यूपुढे सारे काही फिजूल आहे, बाप हो!’

मोरुने पांघरुण चिलखतासारखे अंगाभोवती आणखी घट्ट लपेटून घेतले. ‘म्हंजे यावर्षी सीमोल्लंघन नाही, सोने नाही नि काही नाही? मोरुच्या बापाने हिरमुत्सात्या आवाजात विचारले.

‘सोने लुटा, पण वर्च्युअल मार्गाने! व्हिडिओ कॉल हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे! विचारांचे सोने व्हिडिओवरुन लुटता येते, तर दसऱ्याच्या सोन्याने काय घोडे मारले आहे?,’मोरुने अतिशय मौलिक सूचना केली. परंतु, त्याच्या बापाने त्याची कवडीइतकीही दखल घेतली नाही.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘मोऱ्या, मोऱ्या, अरे, आंघोळ तरी कर! ती दाढी केवढी वाढली आहे, पहा आरशात!

 ‘शी:!!,’ मोरुचा बाप विव्हळून म्हणाला. त्याच्या आवाजात विनंती आणि वेदना दोन्हीचा संगम होता.

‘दाढी युगपुरुषांचीच वाढते बाप हो! दाढी हे उच्च जिजीविषेचे, समर्थ नेतृत्त्वाचे आणि उत्तुंग प्रतिभेचे प्रतीक आहे, हे तुम्हाला एव्हापर्यंत कळावयास हवे होते!,’मोरु उन्मनी आवाजात म्हणाला. ते ऐकून मोरुपिता किंचित ओशाळला. लॉकडाऊनच्या काळात आपणही दाढी वाढवायास हवी होती, असे त्यांस वाटून गेले.

...घोरणाऱ्या व पारोशा वंशाच्या दिव्याकडे आत्मीयतेने पाहात त्यांनी वर्च्युअल शिलंगणाची तयारी सुरु केली.