ढिंग टांग : मग काय झालं?

ढिंग टांग : मग काय झालं?

इतिहासाला नेमकी तीथ ठावकी नाही. कां की घटना घडली, तेव्हा नेमका इतिहासास डोळा लागला होता. सकाळी उठावे. मुखमार्जन करोन मग भरुन चहा ढोसावा, आणि लेखणीबोरु घेवोन बखर नोंदणीस लागावे, हा इतिहासाचा परिपाठ. परंतु, त्या दिशी नेमका घात झाला. इतिहासाचा डोळा चुकवोन घटना घडोन गेली...

तुम्ही म्हणाल, मग काय झालं? चालायचेच! परंतु, तसे नाही!! काळ आला होता, परंतु, वेळ आली नव्हती...

अहह! डोळे चोळीत जागा झालेला इतिहास हळ हळ हळ हळ हळहळला! अरेरे, हे काय जाहले! क्‍येवढा हा प्रमाद. येवढा दिव्य चमत्कार घडोन गेला आणि आपला कागद कोराच्या कोरा!! आता काय लिहावे? कसे लिहावे? किती लिहावे?

तो दिव्य चमत्कार घडला मराठी भाषा दिनाच्या पवित्र दिवशी. ही अशी टळटळीत सकाळ होती. (खुलासा : मुंबईत सकाळदिखील दुपार्सार्खी टळटळीतच असत्ये!!) महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ओनामा जेथ घडला, त्या शिवाजी पार्काडाच्या उशाला उत्तुंग उभ्या असलेल्या कृष्णकुंजगडाला अंमळ लौकरच जाग आली होती. खुद्‌दंखुद्‌द राजियांनी जातीने खोक्‍यात एक गुप्त वस्तु ठेवोन आपल्या निवडक शिलेदारांचे घरी तांतडीने रवाना केली.

‘‘दरोबस्त घेवोन जाणे. सांडलंवड न करणे. दगाफटका केलीया गय केली जाणार नाही. जाणिजे! चीजवस्त नायाब असोन ज्याचे नाव, त्याचे हाती बहाली करणे. हयगय केलीया गर्दन मारली जाईल...’’ असा जोरकस टग्या दम भरोन राजियांनी आपली खासगीतील शिबंदी रवाना केली. 

आम्ही नवनिर्माणाचे प्रथमपासूनचे शिलेदार! राजियांनी जेव्हा नवनिर्माणाचे तोरण लावियले, त्या तोरणाखालून गुजरलेल्या पहिल्या पांच नामचीन शिलेदारांपैकी आम्ही. (खुलासा : आमचे पुढे केवळ बाळाजीपंत अमात्य नांदगावकर हेच होते, दुसरे आम्हीच! असो.) दंतमार्जन करोन आम्ही नुकतीच सैपाकघराचे दिशेने तोंड करोन ‘चहाऽऽऽ’ अशी आरोळी देणार होतो, येवढ्यात राजियांच्या खाजगीतील दूत दाराशी हजर जाहला. त्याणे अदबीने पिशवीतील नायाब चीजवस्तु काढोन आमचे हाती ठेवली. आम्ही खोका उघडला. पाहातो तो काय! आतमध्ये एक सुंदरसा चाकलेटी रंगाचा दंडगोलाकार चषक होता. सोबत चिठी : 

‘‘मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. या पवित्र दिशी आपणांस एक भेट पोचवीत आहोत! खोक्‍यात दुर्मीळ तऱ्हेचा मग असून त्यात गरम चहा वा कॉफी वा पाणी वोतताच चमत्कार होईल! तो चमत्कार मगाचे बाह्यरंगी उमटेल! महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे आपण येकनिष्ठ पाईक असाल, तर मगाचे बाह्य बाजूस शिवमुद्रा उमटेल... नच उमटल्यास आम्हांस मुख दाखवो नये! बाकी समजोन असावे. जाणिजे. राजे.’’

...खुद्द राजियांनी आपणांस शिलेदार म्हणोन मान्यता दिल्याचे वाचोन आमची छाती फुग फुग फुगली, त्याचचेळी पोटात वायगोळादेखील आला. या कठोर परीक्षेस पात्र ठरलो नाही तर आफतच आली म्हणायची, या विचाराने आमची मती कुंठित जाहली. तरीही आम्ही मनाचा हिय्या केला. आमची परीक्षा पाहण्यासाठी राजियांचा खास दूत पुढ्यात उभाच होता...

गरमागरम तयार चहा आम्ही धडधडत्या छातीने त्या मगात वोतला. बया, दार उघड, बया दार उघड!! सखूबाई ये, साळूबाई ये! काळूबाई ये, बाळूबाई ये! ये गे ये... लेकराच्या संरक्षणाला धावूं धावूं ये!!

घटिका गेली, पळे गेली... आणि अखेर आमच्या मगावर शिवमुद्रा उमटली! अहाहा! काय अवर्णनीय प्रसंग होता म्हणोन सांगू? भरोन पावले! पुण्य फळां आले...

...येवढी ऐतिहासिक घटना घडली, आणि इतिहासाला नेमका डोळा लागलेला! या नशिबाला काय म्हणावे? बोला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com