ढिंग टांग : सेवकाची खुर्ची!

ढिंग टांग : सेवकाची खुर्ची!

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक.
वेळ : रात्रीची. प्रसंग : निजानीज!
पात्रे : प्रचंड कामसू!
.......
चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर बॅब्स... आय कम इन?

उधोजीसाहेब : नोप! मी कामात आहे!!

विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) बट व्हाय? मी आत्ताच साबणानं वीस सेकंद हात धुऊन आलोय! आणि कामात कुठे आहात? झोपायची तयारी तर करताय!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उधोजीसाहेब : (करड्या सुरात) तोंडावरचा मास्क वर कर आधी, मग बोल! मी घरात असलो तरी सतत कामं करत असतो! त्याचीच फळं आता महाराष्ट्र बघतो आहे!! भूमिपूजनाचे कार्यक्रम, उद्घाटनं काही उगीच होत नाहीत!! त्यासाठी घरात बसून कामं करावी लागतात!

विक्रमादित्य : (उत्साहात) तुस्सी ग्रेट हो बॅब्स! वर्क फ्रॉम होम चळवळीचे पायोनीअर आहात तुम्ही!!

उधोजीसाहेब : (पोक्तपणाने) ऑफिसपेक्षा घरातून जास्त काम करता येतं, हे मी सिद्ध करुन दाखवलंय!! (दात ओठ खात) मी घरकोंबडा आहे, अशी माझी बदनामी करत होते नाही का हे विरोधक? त्यांचे दात त्यांच्याच घशात घातले!! घरातल्या घरात साध्याशा खुर्चीत बसून मी जनतेची कामं केली!

विक्रमादित्य : (खांदे उडवत) तसंही तुम्हाला बाहेर फिरायला फार आवडत नव्हतंच म्हणा!!

उधोजीसाहेब : (नापसंतीच्या सुरात) असं काहीही नाही!! वाट्टेल तो अपप्रचार करु नका!! मी लोकांना भेटत नाही, त्यांचे फोन घेत नाही, असं बोलणारे लोक आता कुठे आहेत? बेरोजगार होऊन फिरताहेत बाहेर!! आणि मी बसलोय खुर्चीत!

विक्रमादित्य : (हट्टानं) तेच! खुर्ची तुमची लाडकी! हो की नाही? बाहेर कशाला जाल?

उधोजीसाहेब : (नाक मुरडत) हुं:!! बाहेर लोक साधा मास्कसुद्धा नीट लावत नाहीत! आपल्या मराठी लोकांना मास्क हनुवटीला लावला की कोरोना पळतो, असं वाटतं की काय कुणास ठाऊक!! कमालच आहे! औरंगाबादेत गेलो होतो तिथेही बहुतेकांचे मास्क हनुवटीला नाही, तर गळ्याला!! संकट अजून टळलेलं नाही, हे आपल्या लोकांना कधी कळणार?

विक्रमादित्य : (उत्साहात) बाय द वे, ते औरंगाबादच्या कार्यक्रमात खुर्चीचं काय प्रकरण झालं हो?- टीव्हीवर दाखवत होते! बाकी तुम्ही ती सिंहासनासारखी खुर्ची बदलून साधीशी घेतलीत, ते लोकांना जाम आवडलं हं बॅब्स! नेता पाहिजे तर असा!!

उधोजीसाहेब : (कर्तव्यकठोरपणे) मी छोटी खुर्ची घेतली कारण शेवटी मी लोकांचा सेवकच आहे!! सेवक नेहमी छोट्या खुर्चीवरच बसतो!

विक्रमादित्य : (स्वप्नाळूपणाने) ती खुर्ची सॅनिटाइज केलेली नव्हती का? खरं तर तुम्ही स्टूल मागवलं असतं तर जास्त इफेक्‍टिव झालं असतं!

उधोजीसाहेब : (खुशीत येत) लोकांचा लाडका कारभारी असलो तरी मी स्वत:चे भलते लाड करत नाही कधी! लोकांच्या हृदयातली खुर्ची महत्त्वाची!

विक्रमादित्य : (निर्धाराने) मीसुद्धा लोकांच्या हृदयातली खुर्ची मिळवणार बॅब्स!

उधोजीसाहेब : (कौतुकानं) मिळव हो मिळव! तो दिवस दिसावा, म्हणून तर सारी धडपड आहे!!

विक्रमादित्य : (भविष्याचा विचार करत) पण मी रिवॉल्विंग खुर्ची मिळवीन! गरागरा फिरणारी! त्याला चाकंसुद्धा लावून घेईन! सर्रर्रकन फिरण्यासाठी!! मॉडर्न सेवकांची खुर्ची तशीच तर असते!! उंच पाठीच्या खुर्च्या बॉस लोकांच्या असतात! हो की नाही? कुछ समझे?

जय महाराष्ट्र!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com