ढिंग टांग : घोडदौड!

ढिंग टांग : घोडदौड!

संधी कधी कधी पंचकल्याणी घोड्यासारखी टॉक टॉक करत येते. आमचे तसेच झाले!! महामंदीच्या काळात जिथे दोन टाइम खायचे वांधे होते, तिथे हरभऱ्याचे तोबरे मिळाले!! आंधळा घोडा मागतो दोन नाली आणि देव देतो चार!! कुंडलीत चांगले ग्रह एकत्र आले आणि थेट माथेरानवरून बॉम्बेत बदली झाली. टांगेवाल्याचा फौजदार झाला! कुदरत की करनी कुछ अजीबही है!!

होय, आपण आता मुंबई पोलिसांच्या घोडदळाचा शिपाई आहोत! गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नवे घोडदळ मुंबई पोलिसांनी तयार केले आहे. त्या दळात तीस घोडे भर्ती आहेत. तीस घोडे आहेत, त्याअर्थी तीस पोलिस शिपाईदेखील आहेत, हे ओघाने आलेच. घोडा काही स्वत: गर्दीत घुसून नियंत्रण करणार नाही. त्याच्या पाठीवरील शिपाई ते काम करेल, अशी अपेक्षा आहे. पण कुणी सांगावे? 

काहीही म्हणा, मुंबईच्या रस्त्यावरून आपण टकाक टकाक निघालो आहोत, हे स्वप्न कुठल्याही मुंबईकराला पडणे इंपॉसिबल आहे. पण, आपल्या बाबतीत तकदीरवर घोडा महरबान झाला!!

आपली पैदाइश माथेरानचीच. यापूर्वी माथेरान या नेरळनजीकच्या थंड हवेच्या ठिकाणी कार्यरत होतो. दस्तुरीपासून मार्केट आणि मार्केटपासून पॅनोरामा पॉइण्ट, लुईस पॉइण्ट, मंकी हिल पॉइण्ट, वन ट्री हिल पॉइण्ट अशा सवाऱ्या घेऊन जाण्याचे कार्य आम्ही करत असू. पुढे पोलिस दलात दाखल झालो. आपली बॉडीगिडी चांगली होती. खानदान भारीतले होते. आपले पूर्वज अरबस्तानातून आल्याचे सांगतात. खरंखोटं कोणाला माहीत? असेल! माथेरानला मार्केट रोडला उभे राहून टूरिस्ट लोकांची वाट बघत साडेतीन पायावर खडे राहायचे आणि भप्पच्या भप्प ढेलपोट्या सवाऱ्या घेऊन पॉइण्ट टू पॉइण्ट सर्विस देयाची, हे काही खरे नव्हते. पण, नशीब बदलले, हे सच आहे... 

ब्रिटिश साहेबाचे राज्य होते, तेव्हा बॉम्बेच्या पोलिसांकडे घोडे होते म्हणतात. १९३२ ला शेवटचा घोडा पोलिसातून गेला. उरले फक्‍त व्हिक्‍टोरियावाले! एक व्हिक्‍टोरियावाला घोडा तर नंतर बदली होऊन आमच्या माथेरानला आला होता... जाऊ दे. कुणीतरी म्हटलेच आहे, इतिहासात किती टाइम घालवणार?

मुंबईत हल्ली आंदोलने फार होतात. हर दो दिन बाद मोर्चे निघतात. या आंदोलनांचा घोड्याशी संबंध पूर्वापार आहे. पूर्वीच्या काळी मोर्चे काळा घोडा या ठिकाणी अडवले जात, हा निव्वळ योगायोग नव्हे. कुठलाही मोर्चा अडवण्यासाठी घोडा हा प्राणी पुतळ्याच्या रूपात असला तरी उपयुक्‍त ठरतो, हेच यावरून सिद्ध होते. योगायोगाने आपला रंगसुद्धा काळाच आहे. 

बॉम्बेमध्ये गर्दी कंट्रोल करण्यासाठी घोडदळ पायजे, असे कुठल्यातरी मिनिस्टरच्या दिलात आले. सध्या महाराष्ट्रात शिवशाही आहे... घोडदळाची आयडिया तिथूनच आली असणार! आपला सहकारी शिपाई झुंजार काल म्हणाला, की तान्हाजी पिक्‍चर बघून कोणाला तरी आयडिया सुचली असणार! जे काय असेल ते, आपल्याला नोकरी तर भेटली!!

पण मुंबईतली गर्दी कंट्रोल करणे जोक नाही. पब्लिकसुद्धा पब्लिकमध्ये जायला डरते. त्यात घोड्याने घुसायचे म्हंजे जरा जादाच झाले. माथेरानला ट्राफिक नव्हते. बॉम्बेत पहिल्यांदा आलो तेव्हा उलटटापांनी परत नेरळकडे दौडावे असे वाटले. केवढी गर्दी! केवढी वाहने! कितने कितने आदमी!!

पण हीच गर्दी कंट्रोल करायची ड्यूटी आपल्याकडे आहे, हे कळल्यावर हैराणच झालो! आता काय मोटारगाड्यांच्या टपावरून टपाटपा जाऊ?

बॉम्बेतल्या गर्दीची जाम तकलीफ होते, अशी तक्रार पोलिसात द्यावी? की डायरेक्‍ट काळा घोड्यापर्यंत घोड्यांचा मोर्चाच काढावा? सोचना पडेंगा! घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो कैसा चलेंगा?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com