esakal | ढिंग टांग!  :  सेपियन्स - एक चिंतन! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग!  :  सेपियन्स - एक चिंतन! 

दीर्घकाळ दाढी अथवा कटिंग न केल्यास सेपियन मानवाला निसर्गदत्त "पीपीइ' अर्थात "पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट' उपलब्ध होईल, या क्रांतिकारक निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहो! त्याबद्दल यथावकाश सांगूच!

ढिंग टांग!  :  सेपियन्स - एक चिंतन! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सुमारे काही अब्ज वर्षांपूर्वी आफ्रिकेतील अज्ञात गुहेत मानव नावाचा प्राणी राहात असे. तेव्हा तो माकडासारखा दिसे. ( "अजूनही दिसतो' असे कुणी आम्हाला कुत्सितपणे म्हणेल! पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू! ) माकडापासून उत्क्रांत झालेली ही मानव नामक प्रजाती झाडावर मात्र चढत नसे. झाडावर चढणे हे हातपाय मोडून घेण्याचे दळभद्री लक्षण आहे, असे आद्यमानव आईने आपल्या आद्यमानव कार्ट्याला सुनावले असणार. असे आमचे या संदर्भातील संशोधन सांगते. पण ते जाऊ दे. आपला आजचा विषय अधिक गंभीर व गहन आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुहेतील आदिमानव हा स्वभावतःच क्वारंटाइन होता, असे मानण्यास जागा आहे. अशा क्वारंटाइनावस्थेत आदिमानव दाढी आणि कटिंग कशी बरे करत असेल? असा यक्षप्रश्‍न सोडविण्यासाठी तूर्त आम्ही बसलो आहोत. 

साधारणतः मानववंशशास्त्रानुसार माणसाच्या... सॉरी... मानवाच्या उत्क्रांतीचे चार टप्पे पडतात. झिन्झॅप्रोपस, ऑस्ट्रेलोपिथॅक्‍स, होमो इरेक्‍टस आणि होमो सेपियन! (खुलासा ः हे चार टप्पे वेगवेगळ्या पुस्तकांत वेगवेगळ्या नावाने आढळतात. इथे त्यांचा उल्लेख फक्त वाचकांवर इम्प्रेशन मारण्यासाठी आणि मारण्यापुरता केला आहे! असो!!) यापैकी पहिल्या दोन टप्प्यांतील मानवप्राणी दाढीबिढी करण्याच्या भानगडीत पडत नसावा! कारण त्याकाळात ब्लेड-वस्तरा आदी हत्यारेच नव्हती. होमो इरेक्‍टसच्या काळात अश्‍मयुगीन हत्यारे उपलब्ध होऊ लागली. या काळातील अनेक हत्यारे उत्खननात सापडलेली आहेत. उदा. दगडाचा भाला, बाण वगैरे. परंतु दगडाचा वस्तरा अद्याप कोणत्याही उत्खननात सापडलेला नाही, याकडे आम्ही लक्ष वेधू. चौथ्या टप्प्यातील होमो सेपियनने चकमकीने आग पेटवण्याची कला सिद्ध केली. इथून पुढे गरम पाणी मिळू लागले असणार हे उघड आहे!! दाढी करण्यापुरते (वाटीभर) गरम पाणी तरी नक्कीच मिळत असेल, असा निष्कर्ष काढायला कुणाची हरकत नसावी. 

पुढे या सेपियन प्राण्याने प्रचंड प्रगती साधून पोलादाचा शोध लावला. ब्लेड, वस्तरा आदी सामग्री सिद्ध करण्यासाठीच मानवाने प्रारंभी पोलादाचा शोध लावला असणार, असे आमचे संशोधन सांगते. इथवर सारे उत्क्रांतीच्या नेमस्त वेगाने घडले. खरे नाट्य पुढे सुरू झाले... 

दाढी स्वतःची स्वतः करणे एकवेळ शक्‍य आहे. परंतु स्वतःची कटिंग स्वतःच करणे अतिशय अवघड असल्याचे सेपियन प्राण्याला याच टप्प्यावर कळून आले. इथून पुढे अनेक कर्तनालये, सलून आदी सुरू झाली. उत्क्रांतीचा हा खरा टप्पा मानायला हवा. पण आमचे कोण ऐकतो? असो. 

याच टप्प्यावर रिकाम्या बसलेल्या सेपियन पतीस सेपियन पत्न्या विनाकारण आंघोळीस पिटाळू लागल्या असाव्यात! आंघोळ ही सेपियन प्रजातीची अतिशय वाईट्ट खोड आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. 

दीर्घकाळ दाढी अथवा कटिंग न केल्यास सेपियन मानवाला निसर्गदत्त "पीपीइ' अर्थात "पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट' उपलब्ध होईल, या क्रांतिकारक निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहो! त्याबद्दल यथावकाश सांगूच! तूर्त इतकी ज्ञानभंकस पुरे! इति.