esakal | रंग नवनिर्माणाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

इतिहासास नेमके ठावें आहे...पुत्रदा एकादशीचा पौषातला दिवस. टळटळीत दुपार होती. (थंडी असो वा पाऊस, मुंबापुरीतील दुपार ही नेहमी टळटळीतच असते.) कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिवाजी पार्काडातली वस्ती आळसावलेली होती. भर माध्यान्ही गडावर मात्र थोडकी गजबज होती. येरव्ही, येथे हल्ली शांत शांत असते.

रंग नवनिर्माणाचा

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

इतिहासास नेमके ठावें आहे...पुत्रदा एकादशीचा पौषातला दिवस. टळटळीत दुपार होती. (थंडी असो वा पाऊस, मुंबापुरीतील दुपार ही नेहमी टळटळीतच असते.) कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिवाजी पार्काडातली वस्ती आळसावलेली होती. भर माध्यान्ही गडावर मात्र थोडकी गजबज होती. येरव्ही, येथे हल्ली शांत शांत असते. राजेसाहेब क्‍वचितच बाहेर पडताती. मोजक्‍या सवंगड्यांसमवेत थोडीबहुत मसलत करावी आणि आपल्या अंत:पुरात अदृश्‍य व्हावे, असा दिनक्रम झाला होता. मोहीमशीर व्हावे कसे? आणि कुठे? शिबंदी सैरभैर, आणि कारभार तसनस! कोठलाच मनसुबा नियतीस मंजूर नाही, ऐसा काळ आला...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परंतु, राजियांनी चिंतनाची बैठक सोडिली नाही. ‘धीर्धरा धीर्धरा तकवा। हडबडूं गडबडूं नकाऽऽ’ ऐसे वेड्या मनांसी समजावत राजियांनी अनेक मास काढिले. हे राज्य राखावे ही तो श्रींची इच्छा! पण नियतीची दाने उलटी पडत गेली, त्यांस काय करावे? येश प्राप्त करण्यासाठी राजियांनी काय करोन पाहिले नाही? गुलामीचे प्रतीक ठरलेल्या फिरंगी भाषेतल्या दुकानांच्या पाट्या फोडिल्या. नादान, हुकूमशाही टोलनाक्‍यांवर झडपा घातल्या. उपऱ्या परप्रांतीयांना ‘दे माय धरणीठाय’ करोन सोडिले. नतद्रष्ट चित्रपटगृहांच्या काचांचा देखता देखता चककाचूर केला. 

म्हाजूर जाहलेल्या गनिमाशी डोळ्याला डोळा भिडवोन आव्हान दिधले. ‘लाव रे तो व्हिडिओ’ ऐसा आवाज देवोन गनिमाची बोलतीच बंद केली. बारामतीचे महानुभावी तीर्थस्वरूप काकांच्या पायाशी जावोन आशीर्वाद घेतले. त्यांची मुलाखत केली. ती. काकांनीही मायेने पोटाशी घेतले. म्हणाले, ‘‘पोरा, गुणी आहेस बाळा! नाहीतर तो तुझा भाऊ! चांगला होता, पण कमळेच्या नादी लागून वाया गेला. तू औटलाइनला जाऊ नकोस! मी आहे ना?’’ कित्ती कित्ती बरे वाटले होते तेव्हा! पण...पण...घडिले भलतेच! ज्या बारामतीकरकाकांनी जवळ केले होते, त्यांनीच ऐनवेळी हात झटकलेन आणि वाया गेलेल्या थोरल्या बंधूंशी जवळीक साधली. हे म्हंजे लहानग्या पुतण्यास यष्टी स्ट्यांडावर बसवून हातात आलेपाकाची वडी देऊन ‘येतोच बाळा इतक्‍यात’ ऐसे सांगोन चुलत्याने काढता पाय घ्यावा आणि पोरगे गर्दीत एकलेच हरवावे, तद्वत घडिले! शेवटी या जगात कुणीही कुणाचे नसते, हेचि खरे! काकांच्या आठवाचा कढ येवोन राजियांनी मिटलेले डोळे आणखीनच घट्ट मिटले. 

हा दैवाचा खेळ निराळा,
नाही कुणाचा मेळ कुणा...
नशिबा आधी कर्म धावते
दु:ख शेवटी पदराऽऽलाऽऽऽ....
...अहह! काय करावयास निघालो होतो, काय होवोन बसले? राजियांनी डोळे मिटून चिक्‍कार विचार केला. जगदंब! जगदंब! काय केले असता पुन:श्‍च चांगले दिवस येतील? पुन्हा रिकिबीत पाय रोवोन सुसाट दौड मारता येईल? पुन्हा मोहीमशीर होता येईल? मनोमन राजियांनी प्रार्थना केली... आई, शक्‍ती दे! बुद्धी दे! युक्‍ती दे! काकांनी नाही दिलीन, निदान तू तरी दे!
...अचानक विजेचा कडकडाट व्हावा, तद्वत प्रकाश पडोन अवघा गड उजळोन निघाला. राजियांना अचानक साक्षात्कार झाला. तात्काळ टाळी वाजवोन त्यांनी आपल्या नवनिर्माणाच्या पाईकांना बोलावोन घेतले आणि फर्मावले, ‘‘चला, पुनश्‍च हरि ॐ करावयाचे आहे! पुन्हा कामाला लागावयाचे आहे!’’  पाईकांनी तात्काळ कमरेच्या तेगी उपसल्या. त्यांना रोखून राजेसाहेब म्हणाले, ‘‘अंहं! तलवारी तूर्त म्यानात ठेवा!’’ ‘‘आपण फक्‍त हुकूम करा, साहेब! आपला बोल, म्हंजे देवावरचे फूल!,’’ एक सळसळता सरदार म्हणाला.
राजे म्हणाले, ‘‘सर्वांत पहिले तो आपला रंगीत झेंडा बदला! राज्य झिरमिळ्यांचे नाही, भगव्याचे आहे!!