ढिंग टांग : काम की राजनीती!

Dhing-Tang
Dhing-Tang

अखिल जगतातील एकमेव आम आदमी श्रीमान डॉक्‍टर अरविंदस्वामी केजरीवाल यांनी दिल्लीचे तख्त राखले, या घटनेची नोंद जागतिक पातळीवर घेणे क्रमप्राप्त आहे. नुसतेच क्रमप्राप्त नसून अभ्यासक्रमप्राप्तदेखील आहे, असे आम्ही ठासून सांगू. कां की, या घटनेमुळे देशात ‘काम की राजनीती’ नावाच्या नवीन राजकीय विचारधारेचा जन्म झाला. राज्यशास्त्राच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी सोडल्या तर सर्व मानवजगतासाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्यशास्त्रात मात्र सिलॅबसमध्ये बदल करावा लागणार आहे. कारण ‘काम की राजनीती’ ही संकल्पनाच नवी आहे. परीक्षेचा प्याटर्नसुद्धा काहीसा बदलणार असल्यामुळे विद्यार्थीवर्गासाठी (आणि प्राध्यापकांसाठीही) कटकट वाढणार आहे. एकंदरीत विषय बराच व्यापक, खोल आणि गंभीर आहे.

दिल्लीत निकालानंतर अन्य राज्यांतील सरकारांनी ‘काम की राजनीती’ स्वीकारण्याची तयारी सुरू केली आहे. सर्वसाधारणपणे आपल्याकडे राजनीतीचे तीन प्रकार दिसून येतात. एक, काम की राजनीती. दोन, दाम की राजनीती आणि तीन, राम की राजनीती. पैकी पहिला प्रकार आपल्यासाठी नवा आहे. उरलेले दोन राजनीतीचे प्रकार आपल्या अंगवळणी पडले आहेत. कसे ते पाहूया :

दाम की राजनीती : दाम म्हंजे पैसा. अप्रंपार पैसा ओतून निवडणुका जिंकता येतात, हे या टाइपच्या राजकारणाचे मुख्य सूत्र आहे. ते आपल्या सर्वांना परिचित आहेच. त्याबद्दल जास्त काय सांगावयाचे?

राम की राजनीती : मतांचे ध्रुवीकरण साधणे, हे या राजकारणाचे मुख्य सूत्र असते. गेली काही वर्षे आपण याचा परिणाम पाहातोच आहो! त्याबद्दल जास्त काय सांगावयाचे?

राहता राहिले ‘काम की राजनीती’ नावाचे नवे राजकारण!
काम की राजनीती : हा मात्र संपूर्णत: नवा प्रकार आहे. तसे पाहू गेल्यास हा राजकारणातला एक शॉर्टकट मानावा लागेल. कारण या टाइपच्या राजकारणात लोकांची कामे करून मते मागण्याला प्राधान्य दिले जाते. कामे करून मते काय कोणीही मिळवील? त्यात काय येवढेसे!! ही एक प्रकारे लोकांना घाऊकरीत्या दाखवलेली लालूच म्हणावी लागेल. 

दिल्लीमध्ये निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाच्या सरकारने अशा शॉर्टकटचा अवलंब केला. झोपड्या-झोपड्यांमध्ये फुकट पाणी दिले. विजेच्या बिलांमध्ये कटौती केली. महिलांना फुकट प्रवास देऊ केला. शाळाबिळा सुधारल्या. मोहल्ला क्‍लिनिक नावाचे दवाखाने सुरू केले. असे बहुतेक सारे फुकट देण्याकडे कल ठेवला. आता फुकट म्हटले की माणसे गर्दी करणारच. डोक्‍यावर गरगरणारा पंखा फुकट फिरतो आहे, ही कल्पनाच थंडगार झुळकेसारखी सुखद आहे. हो की नाही? साहजिकच लोकांनी त्यांना मते दिली. एका अर्थाने गेली पाचेक वर्षे दिल्लीतील सरकार आपल्या मतदारांना कामे करून फितवत होते, असेच म्हणावे लागेल!! 

‘राम की राजनीती’ आणि ‘दाम की राजनीती’ या उर्वरित दोन राजकारणाच्या प्रकारात लोकसेवेला स्थान नसते. आमिषे दाखवणे तर पूर्णत: मना असते. राजकारण हे विचारधारांवर खेळायचे असते, या विचाराला तेथे प्राधान्य असते. याउलट, ‘काम की राजनीती’ लोकांची कामे करून देण्यावर भर देणारी असते. मतांचे ध्रुवीकरण किंवा अमाप पैसा खर्च करून निवडणुका लढणे, हे त्यांना अभिप्रेत नसते. 

‘काम की राजनीती’ या राजकारण प्रकाराला इतके यश मिळाल्याचे पाहून देशोदेशीचे राज्यशास्त्राचे अभ्यासक व विचारवंत हबकून गेले आहेत. हे नवे लचांड कुठून निर्माण झाले? हा आता देशासमोरचा व्यापक, खोल व गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com