विषकिरीटबाधा : एक संशोधन!

विषकिरीटबाधा : एक संशोधन!

वाचकहो, गेले काही दिवस प्रचंड धावपळीचे गेले. सारे जग निवांत घरी (कोपरा पकडून) बसले असताना तुम्ही धावपळ कशापायी केलीत, असा प्रश्‍न साहजिकच आम्हाला (पुण्यातून) विचारला जाईल. त्याला आम्ही यथायोग्य रितीने (पुण्यातूनच) उत्तर देऊ!! धावपळ केल्याबद्‌दल नाक्‍यावरील मास्कधारी पोलिसांनी आमच्या पाठीमागील बाजू शेकली कशी नाही, अशीही पृच्छा काही लोक करतील. पण वाचकहो, आम्ही सर्व बाजूंनी शाबूत आहो! कारण, आमची ही धावपळ बौध्दिक होती.

कांकी आम्ही येरव्हीही घरीच लॉकडाऊन असतो. महिनाभर केलेली उसनवारी वसूल करण्यासाठी काही समाजकंटक आमच्या मागे लागलेले असतात. त्यांची तोंडे चुकवण्यासाठी आम्हास बराच काळ घरीच दडून बसावे लागते. परंतु, सध्या अभयकाळ चालू आहे! समाजकंटक त्यांच्या त्यांच्या घरी ठाणबंद आहेत. साहजिकच मनाला थोडी उसंत लाभल्याने एका महत्त्वाच्या संशोधनाला वाहून घेणे आम्हाला शक्‍य झाले.
जगभर थैमान घालणारा कोरोना नावाचा नूतन विषाणू हा जगासाठी नवा असेल, पण आमच्यासाठी नाही. हा अतिप्राचीन विषाणू आहे, याचे पुरावे आम्ही गेल्या काही दिवसात जमा केले आहेत. त्यासाठीच प्रचंड बौध्दिक धावपळ आम्हाला करावी लागली, बसल्याजागी येश मिळाली, ही ईशकृपाच म्हणायची. (कोरोनाबद्‌दल पुड्या सोडण्याची एक जबर्दस्त साथ सध्या पसरलेली दिसून येत आहे. आम्हीच काय घोडे मारले आहे?) असो असो!

कोरोना विषाणूविषयी थोडेसे : हा विषाणू चीनमधल्या वुहान येथील एका सामिष आहाराचे जिन्नस विकणाऱ्या बाजारात मिळाला, असे जगजाहीर झाले आहे. चीनमधले लोक वटवाघळापासून मांदेळीपर्यंत वाट्‌टेल ते खातात. एका चिनी माणसाला आम्ही वालाच्या उसळीबद्‌दल सांगितल्यावर त्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले होते. वालाची उसळ खातात हे त्यास माहीतच नव्हते! पण ते एक असो. या विषाणूस अटकाव करणारी लस वा औषध अजून तयार झालेले नाही, असे ‘हू’ने सांगितले आहे. ‘हू’ हा कुणी चिनी इसम असावा, असा आमचा सुरवातीला वहीम होता. परंतु, हे काही चिनी नाव नसून जागतिक आरोग्य संघटनेला हू असे म्हणण्याची चाल आहे, असे मागाहून कळाले.

कोरोनाच्या इतिहासाविषयी थोडेसे : सांगण्यास समाधान वाटते की कोरोना विषाणूचे उल्लेख प्राचीन संस्कृत साहित्यात सापडतात. ‘विषकिरीटबाधेने इत्यलम ऋषींच्या आश्रमात हाहाकार उडाला’ असा उल्लेख आम्हाला (इतिकर्तव्य संहिता, पृ. १२) सांपडला. सदर संहितारुपी पोथी कालौघात नष्ट झाली आहे. (रिकाम्या वेळेत) जुनी रद्‌दी चाळताना आम्हाला सदर पोथीची काही सुटी पाने सापडली. त्यात हा उल्लेख आहे. पोथी अर्थात जीर्ण असणार. तिच्या पानाच्या मागील भागावर ‘जाडा रवा एक कि., म्यागी नूडल फ्यामिली प्याक १, मोनॅको दोन पुडे’ अशी नोंददेखील आढळते. याचा अर्थ उपनिषत्काळात जाडा रवा, म्यागी नूडल आणि मोनॅकोदेखील उपलब्ध होते, असे मानण्यास जागा आहे.

विषकिरीटबाधेचेच आधुनिक नाव कोरोना विषाणूचा ताप असे आहे, याबद्‌दल आमच्या मनीं तरी शंका नाही. कोरोना म्हंजे लॅटिन (की ग्रीक?)मध्ये किरीट होय! उपनिषत्काळात या रोगाचा प्रादुर्भाव असणार, असे आमचे संशोधन आहे. कोणी यास रिकामटेकड्याने सोडलेल्या पुड्या, असे म्हणेल. म्हणोत बापडे! उपनिषत्काळात विषकिरीटबाधेवर काहीतरी औषध निघाले असणारच! ते आम्ही सध्या शोधत आहो! मिळाले की लगोलग नोबेल पुरस्कारासाठी अर्ज करणार आहो!! तोवर (विश्‍वाने) प्रतीक्षा करावी, ही विनंती. इत्यलम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com