ढिंग टांग : आत्मनिर्भर कसे व्हावे?

Dhing-Tang
Dhing-Tang

मुलांनो, आज आपण आत्मनिर्भर कसे व्हावे?  या विषयावर थोडके चिंतन करणार आहो. सध्याच्या प्रथेप्रमाणे आम्ही एखादा वेबिनारच घेणार होतो. फेसबुक लाइव करुन लोकांसी प्रबोधन करण्याचा मार्गही कुणीतरी सुचविला होता. गेला बाजार यूट्यूबवर चांगलेसे ऑनलाइन व्याख्यान देण्याची नवी कल्पना कुणीतरी सुचविली होती. पण सारे जग कसे या तंत्रज्ञानाच्या आहारी गेले आहे. आम्ही म्हटले की आपण कशाला उगीच तंत्रावर अवलंबून रहा? आपण आत्मनिर्भर असायला हवे!

मुलांनो, सध्या आत्मनिर्भर होण्यासाठी सारा देश धडपडत आहे, आणि यापुढेही धडपडत राहील. काही वर्षांपूर्वी आपला देश विश्वगुरु होण्यासाठी धडपडू लागला होता. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये त्या धडपडीला चांगले यश आल्याचे दिसत आहे. आज आपला देश विश्वगुरु होऊन साऱ्या जगतास हायड्रोक्‍लोरोक्किनच्या गोळ्या प्रसाद म्हणून वाटत आहे, याचा विलक्षण अभिमान आम्हाला वाटतो. प्रयत्नांती परमेश्वर होता आले नाही, तरी विश्वगुरु नक्की होता येते, हे आता साऱ्या जगाला कळून चुकले आहे.

विश्वगुरु होण्याचे कलम साध्य झाल्याने आता आपण सारे आत्मनिर्भर होण्याकडे वळू! वळूया ना? मुलांनो, आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न अतिसुंदर आहे. प्रत्येकाने ते पाहिलेच पाहिजे व ते पाहण्यासाठी पुरेशी झोपदेखील घेतली पाहिजे. आता तुम्ही विचाराल, माणसाला किती झोप पुरेशी असते? आमच्या मते दिवसा दोन किलो, आणि रात्री दहा ते बारा किलो झोप पुरेशी ठरावी. तासाला एक किलो असा हिशेब पडतो. लॉकडाऊनच्या काळात काही महाभाग दिवसरात्र मिळून वीस-बावीस किलो झोप घेतात, असे कळले आहे. हे अस्वलापेक्षा भयंकर आहे! अस्वले दीर्घनिद्रेच्या काळात महिनोनमहिने झोपतात, असे आम्ही कुठेतरी वाचले होते. असो. आपला मुद्दा आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न बघण्याचा आहे. 

मुलांनो, आत्मनिर्भर होण्यासाठी आधी संकल्प करावा लागतो, बरं का! आत्मनिर्भर होणारच! असे ठाम्पणे ठर्वावे लागते. आत्मनिर्भर होणे म्हणजे स्वावलंबी होणे, असे मात्र  नव्हे हं! आत्मनिर्भर माणसाला स्वावलंबनापेक्षाही झोपेची गरज जास्त असते. माणूस जितका झोपलेला, तितका त्याचा जगाला त्रास कमी. कां की, झोपलेला माणूस कमी अन्न खातो. सामाजिक अंतर आपोआप पाळले जाते व पांघरुण डोक्‍यावर घेऊन घोरणाऱ्या मनुष्याला तर कोरोनाची लागण लागणे दुरापास्तच असते. कारण डोकीवरचे पांघरुण हाच आपादमस्तक मास्क असतो. घोरणाऱ्या माणसाच्या खोलीत झोपण्याचा खटाटोप करणाऱ्यास चडफडत उठून दुसरी खोली गाठावी लागते. परिणाम? लागण लागण्याची शक्‍यताच नष्ट होते. दो गज की दूरी नव्हे, दो रुम की दूरीचा नियम आपापत: पाळला जातो. 

मुलांनो, एकदा आपण विश्वगुरु झालेलो आहोत, त्यामानाने आत्मनिर्भर होणे अगदीच सोपे जावे! हे म्हंजे एम्बीबीएस डागतरी शिकलेल्याने मनरेगा योजनेअंतर्गत नाव नोंदवण्याइतके सोपे आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी थोडा फार झोपेचा सराव लागतो. तो लॉकडाऊनच्या काळात पुरेसा मिळाला आहे. साऱ्यांनी यथेच्छ झोपा काढून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल ऑलरेडी सुरु केली आहे. काही अज्ञ लोक तो बहुमोल वेळ आत्मचिंतन आणि ज्ञानार्जनात फुकट घालवीत आहेत. हे सर्वथा गैर आहे. अशाने माणूस एकवेळ अंतर्मुख आणि चिंतनशील होईल, पण आत्मनिर्भर कसा होणार? मुलांनो, आता लौकरच आपला लॉकडाऊन उठेल. तो उठला तरी आपण बिछान्यातून अजिबात उठायचे नाही. आत्मनिर्भर व्हायचे आहे ना? झोपा तर मग शुभस्वप्ने म्हंजे स्वीट  ड्रीम्स हं का मुलांनो! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com