esakal | ढिंग टांग : मार्टिन ल्यूथर यांचं स्वप्न!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

मित्रहो, माझं एक स्वप्न आहे... 
एक ना एक दिवस या राष्ट्राला 
येईल घोरनिद्रेतून जाग, 
आणि सनातन सत्य त्याला गवसेल 
ते हेच की जगतातील सर्वच 
माणसे जन्माने समान आहेत.

ढिंग टांग : मार्टिन ल्यूथर यांचं स्वप्न!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मित्रहो, माझं एक स्वप्न आहे... 
एक ना एक दिवस या राष्ट्राला 
येईल घोरनिद्रेतून जाग, 
आणि सनातन सत्य त्याला गवसेल 
ते हेच की जगतातील सर्वच 
माणसे जन्माने समान आहेत. 
माझं एक स्वप्न आहे की, 
एक ना एक दिवस 
जॉर्जियाच्या लाल टेकड्यांवर 
माजी गुलामांची मुले आणि 
माजी मालकांची मुले 
बंधुभावाच्या पंगतीत एकत्र बसतील. 
माझं एक स्वप्न आहे की, 
अन्याय आणि शोषणाच्या धगीत 
होरपळलेल्या मिसिसिपीच्या भूमीत 
समानतेची गीते दुमदुमतील. 
माझं एक स्वप्न आहे...
आय हॅव अ ड्रीम! 
आय हॅव अ ड्रीम टुडे!! 

त्रिखंडात गाजलेल्या या भाषणाच्या 
झेरॉक्‍स कॉप्या आणि 
वर्तमानातल्या बातम्यांची कात्रणे, 
ब्रेकिंग न्यूजच्या चौकटी, 
सोशल मिडियावरच्या व्हिडिओफिती, 
लाइक्‍स-डिसलाइक्‍स, आंगठे बिंगठे 
(फीलिंग अँग्री, लोनली वगैरे वगैरे), 
पुढाऱ्यांची प्रासंगिक भाषणे, 
शब्दबंबाळ क्रांतीगीते, काव्यकढ 
असा सारा गाडाभर मजकूर घेऊन 
थेट गेलोच मग भेटायला 
मार्टिन ल्यूथर किंगसाहेबांनाच! 
खिडकीशी उभे राहून 
उगवता कोरोनासूर्य बघण्यात 
रमलेल्या एमेल्केंना विचारले : 
‘‘सर, तुमचं एक स्वप्न बिप्न होतं ना? 
त्याचं नेमकं काय करायचं, हे 
च्यामारी आम्हाला कळतच नैय्ये!’’ 
ते हसून म्हणाले : मी काय किंवा 
तुमचे ते महात्माजी काय, 
आम्ही एक स्वप्न पाहिलं, आणि 
त्याचं एक गाठोडं करुन 
सुपूर्द केलं पुढीलांकडे... 
त्याचं काय करायचं हे 
तुम्हीच नाही का ठरवायचं?’’ 

बुचकळ्यात पडून पुन्हा 
अस्ताव्यस्त गाडाभर मजकुराकडे 
पाहिलं, तर त्यात ते 
शिंचं स्वप्न कुठे दिसेना, 
जरा शोधाशोध केली ढिगाऱ्यात, 
शेवटी एमेल्केंनाच केली 
अजीजीने रिक्वस्ट, म्हणालो : 
‘‘सर, तुमच्याकडे एखादी 
एक्‍स्ट्रा कॉपी असेल तर द्या ना!’’ 

त्यांनीही शोधलं घरभर, 
माळे-पोटमाळे वगैरे, मग 
म्हणाले : ‘‘नाही रे, सॉरी! 
आम्ही ना असल्या स्वप्नांच्या 
कॉप्या नाही ठेवत संग्रही!’’ 
डोकं खाजवून शेवटी विचारले : 
‘‘मिनिआपोलिसच्या भर रस्त्यात 
जॉर्ज फ्लॉइडच्या मानेवर 
गुडघा रोपून एक़ा गोऱ्या पोलिसानं 
त्याला ठार मारला, ठार! 
तुम्ही बघितलात का तो व्हिडिओ? 
अशाने कसं होणार तुमचं 
स्वप्न साकार?’’  

तेव्हा मात्र त्यांच्या चेहऱ्यावर 
दु:खाचे ढग जमले, मग 
चर्या थोडी कष्टी आणि 
मग थोडी उग्र झाली. 
ते म्हणाले : ‘‘आत्मा
 अविनाशी असतो, 
हे माहीत आहे का तुला? 
तो कुठल्या शस्त्रानं मारला जात नाही, 
तो कुठल्या अग्निने 
जाळला जात नाही, 
काळ्या मानेवर गोरा गुडघा 
आठ मिनिटे ४६ सेकंद चेंदून 
तर मुळीच मारला जात नाही. 
सबब, माझं ते जुनं स्वप्न 
बर्करार आहे अजूनही.’