Dhing-tang
Dhing-tang

ढिंग टांग : चिनी लोगों नेऽऽ…!

‘‘कोणीही सांगेल, एरवी आपल्यासारखा जंटलमन कोणी नाही. पण कुणी खोड काढली तर त्याला उल्टा टांगायला आपण कमी करत नाही. तुम्ही असाल, मोठे लॉर्ड फॉकलंड, आपण ‘आपण’ आहोत! डोळे दाखवले तर काढून हातात ठेवीन! हाँऽऽ…!’’ देशभक्त मन्याने हाताचे बोट आमच्या नाकासमोर नाचवून टग्या दम भरला. आम्ही निर्विकार राहिलो. दे. भ. मन्याचे हे नेहमीचे आहे. कुठेतरी काहीतरी पेपरात वाचतो, आणि घरी, आमच्या समोर येऊन तावातावाने भांडतो. यावेळी मन्याच्या हातात एक वर्तमानपत्र आणि दुसऱ्या हातात मोबाईल फोन होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘च्यामारी या चिन्यांच्या…!’’ दे. भ. मन्याने ओठांच्या भेदक हालचाली करून दातओठ खाल्ले. मनातल्या मनात त्याने किमान वीसबावीस चिनी सैनिक लोळवले असणार, यात शंका नव्हती.
‘‘....कान फाडून ऐका! गलवान खोरे आमचे होते, आहे आणि राहील!,’’ दे. भ. मन्याने आम्हाला पुन्हा एकदा जबर्दस्त दम दिला. त्याच्या वाक्ताडनाने आम्हाला उगीचच, आपण चिनी वंशातले आहोत, असे वाटू लागले. आता नाही म्हणायला नाकाचे भजे सोडले तर चिनी वंशाचे असल्याचा कोणताही पुरावा आमच्यापास नाही. आमचे नाक अंमळ चपटे आहे हे मान्य, पण तेवढ्यावरून मन्याने आम्हाला चिनी समजावे, हे अन्यायकारक होते... 

‘‘अरे, भेकडांनो, खिळ्यांच्या काटेरी दांडक्याने मारामाऱ्या करता काय! दाखवतोच आता इंगा!!,’’ असे म्हणत क्रुद्ध नजरेने आम्हाला जागच्या जागी भस्मसात करत दे. भ. मन्या इकडे तिकडे काही शोधू लागला. आम्ही सावध झालो! अशा प्रसंगी मन्याच्या हाती कुठलीही वस्तू लागणे थोडे धोक्याचे असते. सर्जिकल स्ट्राइकच्या वेळेला विजयी मुद्रेने दे. भ. मन्याने हँडग्रेनेडची पिन तोडण्याच्या आविर्भावात सफरचंदाचा डासा काढला होता.

‘‘अरे मन्या, गेले तीन महिन्यात दाढी नाही केली आम्ही! खिळे कसले घेऊन बसलास?’’
आम्ही क्षीण सुरात म्हणालो.
‘‘हेच…हेच चुकतं तुम्हा काँग्रेसवाल्यांचं! तुम्हाला लेको, आपल्या सैनिकांबद्दल सहवेदना नाही! तिथे आपल्या एका सैनिकाला बुटात खडा टोंचला तरी आम्ही इथं विव्हळतो!,’’बाकी, मन्या भडकला की बरे बोलतो, पण खरे बोलतोच असे नव्हे!
‘‘बरं झालं, त्या चिन्यांना दणका दिला ते! लेकाचे चीची करत पळत गेले!’’ मन्या फुत्कारला. चिनी लोक चीची करत कां पळतात? हे आम्हाला पूर्वीपासूनचे कोडे आहे.
‘‘जाऊ देना, मन्या, आपण इकडे तोंडाला मास्क लावून बसलेले! आपण काय करणार?’’
आम्ही नेहमीच्या मवाळपणाने म्हणालो.

‘‘हेच…हेच तुमचं बुळबुळीत धोरण आम्हाला पसंत नाही! काय करणार म्हंजे? त्या चिन्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घालता येतो की नाही? मग घाला ना!’’ दे. भ. मन्याने प्रखरपणे स्वदेशीचे…सॉरी…आत्मनिर्भरतेचे समर्थन केले. त्याच्या बोलण्यात तथ्य आहे, असे आम्हालाही वाटत होते. तेवढ्यात -
‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी’’ असे ओरडत दे. भ मन्याने त्वेषाने हातातला चिनी बनावटीचा मोबाईल फोन थाडकन भिंतीवर हापटून फोडला.

‘‘अशी डोक्यात राख घालू नये, स्वस्त का असतो मोबाइल फोन? झालं की नाही आता नुकसान?’’ आम्ही त्याला शांत करण्यासाठी म्हणालो. मोबाईल फोन चिनी बनावटीचा असला तरी त्यासाठी आपलेच घामाचे देशी पैसे खर्च झालेले असतात, हे सत्य आम्हाला माहीत होते.
‘‘तुमचाच होता फोन! माझा नाही…,’’ मन्या पडेल सुरात म्हणाला, आणि आम्ही हाताला एखादी काटेरी वस्तू लागते का, ते शोधू लागलो. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com