esakal | ढिंग टांग : क्रिकेटयोग!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

बासरीच्या मधुर पार्श्वधूनेमुळे आसमंत कमालीचा पवित्र झाला होता. मांडव योगाभ्यासकांनी फुलून आला होता. चटईवर पाय पसरून आम्ही सहजासनात बसलो होतो. पहाटेच्या वेळी घाईघाईने योगशिबिर गाठणे तसे अडचणीचे असते. काही शिबिरार्थी अजूनही जांभया आवरत  होते. मंजनाचा वास अजूनही मांडवात दर्वळत होता. आसपासच्या चटयांच्या दिशेने आणखीही काही (सकाळचे) काही उग्र गंध येत होते. आम्ही ताबडतोब नाक धरले.

ढिंग टांग : क्रिकेटयोग!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बासरीच्या मधुर पार्श्वधूनेमुळे आसमंत कमालीचा पवित्र झाला होता. मांडव योगाभ्यासकांनी फुलून आला होता. चटईवर पाय पसरून आम्ही सहजासनात बसलो होतो. पहाटेच्या वेळी घाईघाईने योगशिबिर गाठणे तसे अडचणीचे असते. काही शिबिरार्थी अजूनही जांभया आवरत  होते. मंजनाचा वास अजूनही मांडवात दर्वळत होता. आसपासच्या चटयांच्या दिशेने आणखीही काही (सकाळचे) काही उग्र गंध येत होते. आम्ही ताबडतोब नाक धरले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमच्या शेजारच्याने संशयाने आमच्याकडे पाहात तसेच काहीसे केले. आम्ही सावरून पद्मासनात बसण्याचा क्षीण प्रयत्न केला. पद्मासनाची एक भानगड असते. एक पाय चढतो, दुजा असहकार पुकारतो. महत्प्रयासाने दोन्ही टाचा वर खेचून मुद्रा धारण केली, तर ती अनलॉक करणे कठीणकर्म होऊन बसते. असो.

तेवढ्यात व्यासपीठावर हालचाल झाली आणि ती प. पू. बाबाजींची दिव्य मूर्ती प्रकटली. अहो आश्‍चर्यम! पू. बाबाजी नेहमीच्या संन्यासी वेषात नव्हते! क्षणभर आम्ही ओळखलेच नाही. पायात खेळजोडे, गुडघ्यापर्यंत प्याड, हातात ग्लोव्ज आणि क्रिकेटची ब्याट, मस्तकी हेल्मेट!!  ती सुप्रतिष्ठित, योगिक दाढी छातीवर रुळत नसती, तर आम्ही पू. बाबाजींना ओळखलेही नसते. पू. बाबाजींनी आल्याआल्या ब्याट उंचावून आमचे अभिनंदन स्वीकारले आणि दोन पावले पुढे येऊन हवेतल्या हवेत हेलिकाप्टर शॉट मारल्याची अक्‍शन केली. टाळ्यांचा कडकडाट झाला! (त्यात आमचीही टाळी होती.) पाठोपाठ स्क्वेअर ड्राइव, हूक, सरळ  ड्राइव अशी प्रात्यक्षिके झाली. आम्ही टाळ्या वाजवीत राहिलो.
‘‘इस देश को यदि तंदुरुस्त रहना है तो दो चीजे अत्यावश्‍यक है!’’ बाबाजींनी अचानक जाहीर केले. आम्ही कुतूहलाने ऐकत राहिलो. योगशिबिरात क्रिकेट कुठून आले? हे न कळून आम्ही हैराण झालो होतो.

‘क्रिकेट और कोरोनिल!,’’ पू. बाबाजी आवश्‍यक चीजें सांगितली. कोरोनिल म्हटल्यावर त्यांनी जीभ कां चावली, हे कुणाला कळले नाही. 

‘अब हम शिविर को प्रारंभ करते हैं!’’ असे म्हणून पू. बाबाजींनी शिरस्त्याप्रमाणे वीस वेळा जोरजोरात उच्छ्वास सोडला. (खुलासा : त्या आधी एकोणीस वेळा तो घेतलादेखील!) मग पोटाची खोळ खळाखळा हालवून दाखवली. पू. बाबाजी पोटाची अशी खोळ हलवतात, तेव्हा का कुणास ठाऊक, आम्हाला खचायलाच होते!  क्रिकेटच्या गणवेषाचा जामानिमा करून एवढे करणे किती कठीण असेल, याची कल्पना केलेली बरी! आम्हाला साधा मास्क लावून धड श्वास घेता येत नाही, पू. बाबाजी ब्याट-प्याड-हेल्मेटनिशी अनुलोम-विलोम करतात! पू. बाबाजींचा विजय असो!!

‘अब हम शिबिर को प्रारंभ करेंगे! पहले ये चटाई और योग का सामान उठाकर फेंक दो! कल से हरेक शिबिरार्थी के लिए स्वयं अपनी बैट और बौल लाना अनिवार्य होगा! अब के बाद यह योगशिबिर नहीं, क्रिकेट प्रशिक्षा का वर्ग होगा!’’ पू. बाबाजींनी व्यासपीठावरून जाहीर केले आणि मांडवात शांतता पसरली. आम्हीदेखील च्याटंच्याट पडलो. आँ? हे काय आता नवीन?

‘अब आईपीएल आ रही है! हम उसका प्रचार करेंगे! क्‍योंकी क्रिकेट यह भी एक योगही है!’’ पू. बाबाजी बोलू लागले. कालपर्यंत पू. बाबाजी आयपीएलला अश्‍लील आणि जुगाराचा खेळ असे संबोधत होते. अचानक क्रिकेट हा योग कसा झाला, हे आम्हाला क़ळले नाही.

पू. बाबाजी म्हणतात, म्हंजे खरे असेल, अशी मनाची समजूत घालून आम्ही पुन्हा नाक धरले.- हे आता शेवटचे!

Edited By - Prashant Patil