ढिंग टांग : भाकीत!

Dhing-Tang
Dhing-Tang

‘येवढे सहा महिने जाऊ देत, मग बघा!,’’ हातातल्या रेषांकडे भिंगातून पाहात सुप्रसिद्ध ज्योतिषचंद्र, विख्यात होराभूषण पं. कोल्हापूरकरबुवा म्हणाले. सहा महिन्यांनंतर नेमके काय होईल, हे त्यांच्या मुखातून ऐकण्यासाठी आम्ही अगदी अधीर झालो होतो. पण बुवा मात्र नेमके भाकीत टाळून उगाच आमचा आंगठा, मागल्या बाजूला चेपून बघत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘आयाईग्गं!,’’ आम्ही विव्हळलो.
‘तुमचा स्वभाव थोडा आडमुठा आहे का हो? आंगठा लवचिक नाही...’’  बुवांनी आमची किरंगळी घट्ट धरली होती. आम्ही नाइलाजाने ‘हो’ म्हणालो. किरंगळी मोडली, की ज्यास्त दुखते.

‘सहा महिन्यांनंतर काय होईल?,’’ आम्ही हेका सोडला नाही. ‘‘धनरेषा फार पुसट आहे..,’’ बुवा भिंगात डोकावून म्हणाले. हे सांगायला खरे तर ज्योतिषाची काय गरज  होती? गेल्या बेचाळीस पिढ्यांत आमच्या घराण्यात धनरेषा ठळक असलेला महाभाग जन्मलेलाच नाही, हे दाहक वास्तव क्षणभर जाळून गेले. आम्ही काही बोललो नाही. ‘‘आदरणीय बुवा, हात बघून झाल्यावर तुमच्या हातावर ठेवायला अकरा रुपये काढून देणेही तूर्त शक्‍य नाहीए,’’ हे आत्ताच त्यांना सांगणे इष्ट ठरले नसते. बुवांनी शापलेच असते! 

‘चंद्ररेषा शुक्राच्या उंचवट्याकडे वळली आहे,’’ बुवांनी आता गाडी वेगळ्याच घाटात नेली. आता चंद्ररेषा कुठली आणि शुक्राचा उंचवटा कुठला, याची टोटल आम्हाला लागली असती तर या बुवासमोर हात पसरून कशाला बसलो असतो? तरीही ‘हो ना, हो ना’ असे पुटपुटलो.

‘तुम्ही म्हंटा, सहा महिन्यांनंतर...’’ आम्ही कडक आंगठ्याला जागून आठमुठेपणाने पुन्हा विचारून पाहात होतो. पण- ‘‘हे वेड लागल्याचं लक्षण आहे...’’ बुवा गंभीरपणाने म्हणाले. आँ? मनात वेगवेगळे हिंस्र विचार आले! पण ते वेडाचा झटका आल्याचे लक्षण मानले जाईल, या भयाने स्वत:ला आवरले.

‘ते सहा महिन्यांनंतरचं सांगा की!,’’ आम्ही मोठ्यांदा ओरडलो. चूक आमची नव्हती. बुवांनी आमच्या तर्जनीचे बोट वाकवून बघितले होते.
‘काहीही होऊ शकतं!,’’ बुवा गंभीरपणाने म्हणाले.
‘काहीही?’’ आम्ही.
‘करेक्‍ट...काहीही! वन फाइन मॉर्निंग काहीही होऊ शकतं!,’’ बुवा म्हणाले. आमच्या पोटात बर्फाची लादी बसल्यागत झाले. ‘अनुदिनी अनुतापे तापलो रामराया...’ आम्ही रामरक्षा पुटपुटायला सुरुवात केली.
‘असं कसं?’’ आम्ही अविश्वासाने विचारले.
‘असंच आहे! हा सारा नियतीचा खेळ आहे. ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारा येता येत नाही, आणि ‘मी येणार नाही’ म्हणणारा जाता जात नाही!’’ बुवांनी भविष्याची गाडी तत्त्वचिंतनाकडे वळवली होती. आम्ही ताबडतोब अंतर्मुख झालो. ‘‘थोडक्‍यात, आपल्या हातात काही नाही तर...’’ आम्ही हताशेने म्हणालो.

‘छे, काहीसुद्धा नाही! आज आहेत ते उद्या नाहीत, आणि आज जे नाहीत, ते उद्या असतील! आपण आपलं कर्म करीत राहावं!,’’ बुवांनी निष्काम कर्मयोगाचा फलसफा सांगून टाकला. मन एकाच वेळी विषण्ण आणि निरीच्छ झाले. ‘तुमने क्‍या पाया? जो तुमने खोया? तुम क्‍या साथ लाये थे, जो तुमने खो दिया?...’ शा. मुळजीशेठ एण्ड सन्स (किराणाभुसार व्यापारी) यांच्या दुकानी असलेला गीतासाराचा फलक आठवून आम्ही एक दीर्घ निःश्वास सोडला.
‘सहा महिन्यानंतर तरी ही जीवघेणी साथ जाणारेय का?’’ आम्ही शेवटी उद्वेगाने विचारले.

‘ते कसं सांगणार? आम्ही मध्यावधी निवडणुकांबद्दल बोलत होतो...,’’ बुवांनी खुलासा केला. आम्ही कपाळावर हात मारून घेतला. मनात म्हटले, कुणाचे काय तर कुणाचे काय! चालायचेच.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com