ढिंग टांग : विचारांचे सोने!

ढिंग टांग : विचारांचे सोने!

(स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक.)
चि. विक्रमादित्य : (उत्साहात दार ढकलत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन!
उधोजीसाहेब : (कर्तव्यकठोरपणे) नोप! मी महत्त्वाच्या कामात आहे! गुड नाइट!!
विक्रमादित्य : (बेपर्वाईने दार ढकलून आत येत) कुठलं महत्त्वाचं काम? आम्हाला नाही सांगणार?
उधोजीसाहेब : (हातातला गुळण्यांचा गिलास तस्साच...) मी गरम पाण्याच्या गुळण्या करतोय!
विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) वॉव!
उधोजीसाहेब : (थिजून) हद्द झाली! आता गुळण्यांमध्ये काय ‘वॉव’ असतं? भाषण करुन करुन घसा दुखू नये म्हणून करतोय गुळण्या! कळलं?
विक्रमादित्य : (आंगठा आणि तर्जनी जुळवत) तुमचं भाषण तुफ्फानी झालं, तुफ्फानी!! आपले सगळे लोक खुश आहेत! संजयकाका तर म्हणाले, ‘विचारांचं सोनं म्हंटात हे हेच!’ क्‍या बात है! तुस्सी ग्रेट हो बॅब्स!
उधोजीसाहेब : (खुशालून) चल, काहीतरीच!
विक्रमादित्य : (खदाखदा हसत) मला तर असं फीलिंग आलं की तुम्ही आपट्याच्या पानांची आख्खी जुडीच्या जुडी त्या कमळवाल्यांच्या पाठीत घालताय की काय!! त्यांचं दुपारी खाल्लेलं श्रीखंड हजम झालं असेल तुमच्या भाषणानं! हाहा!!
उधोजीसाहेब : (छाती फुगवून) मॅग! मला लेचापेचा समजू नका म्हणावं! आडवे याल तर लंबे करीन, असं मी आधीच म्हटलं होतं! केलं की नाही लंबे!!
विक्रमादित्य : (चेकाळत) मुंगळ्यांचं डसणं काय, टोपीखालचा मेंदू काय, गोमुत्राच्या गुळण्या काय...आहा!! ‘आडवा येणाऱ्याच्या छाताडावर गुढी पाडवा करीन’ हा डायलॉग तर सुप्परडुप्पर हिट आहे!! आडव्या छाताडावर गुढी पाडवा! हाहा!!.. वॉव! कसं सुचतं हो तुम्हाला बॅब्स!!
उधोजीसाहेब : (आणखी छाती फुगवून) मावळ्यांची भाषा आहे ती! मर्दानं जिभेवर खेळवायची असते ती...लेच्यापेच्या, टाळ्या-थाळ्या वाजवणाऱ्यांचं काम नाही ते!!
विक्रमादित्य : (शंकेखोर स्वभावाने) बाय द वे, तोंडात शेण आणि गोमुत्राच्या गुळण्या म्हंजे नेमकं काय हो?
उधोजीसाहेब : शू:...ऽऽ...हळू बोल!
विक्रमादित्य : (विषय बदलत) ते जाऊ दे! गांजाची शेती कुठे होते, ते सांगा!!
उधोजीसाहेब : (खवळून) मला काय माहीत? इथे मुंबईत होत नाही एवढं नक्की!!
विक्रमादित्य : (कपाळाला आठी घालत) तुम्हीच म्हणालात की आमच्या मुंबई आणि महाराष्ट्रात घराघरात डालडाच्या फुटक्‍या डब्यात तुळस येते, गांजा नव्हे! मग गांजा कुठे लावतात ते सांगा ना!!
उधोजीसाहेब : (उडवून लावत) ते आम्हाला माहीत नाही! जे गांजा लावतात, त्यांना विचारा!
विक्रमादित्य : ओके! पण त्यांना म्हंजे कोणाला?
उधोजीसाहेब : मुंबईला पीओके म्हणणाऱ्यांना! मुंबईला बदनाम करणाऱ्या निमकहरामांना! महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करणाऱ्यांना! (दात ओठ खात) महाराष्ट्राच्या सुपुत्राची बदनामी करता? एका सच्छील, सज्जन गृहस्थावर नाही नाही ते आरोप करता? एकेकाला बघून घेईन!!
विक्रमादित्य : कोण महाराष्ट्राचा सुपुत्र?
उधोजीसाहेब : (डोक्‍यावर टप्पल मारत) चल, चावट कुठला!! झोपायला जा बघू!
विक्रमादित्य : (नम्रपणे खिश्‍यातून आपट्याची पानं काढत) बरं झालं आठवण झाली! हे घ्या सोनं!!
उधोजीसाहेब : (प्रेमभराने) शाब्बास! अशीच परंपरा जप हो!! परंपरा राहिली तर आपण राहणार! थांब, तुलासुध्दा देतो हं सोनं!
विक्रमादित्य : (एक पॉज घेत) हो! पण हे असंच ग्रीन गोल्ड द्या हां! तुमचं विचारांचं सोनं...सम अदर टाइम!! ओके? जय महाराष्ट्र!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com