ढिंग टांग : (कं)दिल की बात!

ढिंग टांग : (कं)दिल की बात!

बेटा : (वेगळ्याच ढंगात, पण उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण टढॅण! मम्मा, आयम बॅक! 
मम्मामॅडम : (कामाच्या घाईत लक्ष न देता) हं!
बेटा : (हातात कंदिल आणि दुसऱ्या हातात काठी!) हमका पहचानत नाही का?
मम्मामॅडम : (लक्ष जाताच... ) ओह गॉड! आप कौन?
बेटा : (अभिमानाने) हम बिहारसे हईं! का हाल बा?
मम्मामॅडम : (विचित्र नजरेने बघत) सब बढिया बा!...तोहार नाम का ह?
बेटा : (तोंडावरचा गमछा दूर करत) नाम में का बा?..ऐसन  शेक्‍सपीअर कहत बा!!हाहा!!
मम्मामॅडम : (कपाळाला हात मारत) ईश्‍श! काय हा अवतार! क्षणभर ओळखलंच नाही मी!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेटा : (काठीवर रेलत) सध्या आपण बिहारला असतो!! तिथूनच आलो!!
मम्मामॅडम : (इशारा देत) जरा जपून! मागल्या खेपेला उत्तर प्रदेशात काय झालं होतं! आठवा जरा!
बेटा : (उडवून लावत) हॅ!! तेव्हा ती बंडल सायकल होती, माझ्याकडे! यावेळी आपल्या हातात चांगल्या कंडिशनमधला कंदिल आहे, कंदिल! हा बघ!!
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) कर्म माझं!! मी सांगते, फार आटापिटा करु नका! असल्या भानगडीत वेळ वाया जातो फक्त!  पक्षाकडे लक्ष द्यायला हवं आता!...कधी एकदा सगळं तुम्हा लोकांच्या हातात सोपवून निवृत्त होते, असं झालंय बघ मला!
बेटा : (दिलासा देत) डोण्ट वरी! मला मार्ग जवळ जवळ सापडला आहे, असं समज!! बिहार जिंकलं की पुढची लढाई एकदम  सोप्पी आहे! बघशीलच तू!!
मम्मामॅडम : (हताशेनं) कसला मार्ग? गेली सहा वर्ष नुसता अंधार आहे! एक गोष्ट धड होत नाही आपल्या पक्षात! चांगली रिटायर झाले होते, परत यावं लागलं!
बेटा : (कंदिल वर करत) म्हणून तर मी हा कंदिल घेऊन फिरतोय!  हा कंदिल मी पेटवणार, तो पेटला की, वाट शोधणार! वाट मिळाली की पोचलोच बघ मंजिलपर्यंत!! एवढी बिहारची मोहीम पार पडू दे, मग सगळं ठीक करीन मी!!
मम्मामॅडम : (अनिश्‍चिततेने) फारच जवळची वाट आहे तुझी!!
बेटा : (दुर्लक्ष करत) मम्मा, तिथं मला एक तेजस्वी मित्र भेटला!
मम्मामॅडम : (आश्‍चर्यानं) तेजस्वी मित्र? कुणी राजपुत्र आहे का?
बेटा : (खांदे उडवत) हंऽऽ...जंगलराजचा युवराज म्हणतात त्याला! रॉबिन हुडसारखा आहे! पण तिथं जंगल कुठे दिसलं नाही मला! तरीही त्याला जंगलराज का म्हणतात कुणास ठाऊक!
मम्मामॅडम : (घाईघाईने) ओह! तू त्या कमळवाल्यांच्या बडबडीकडे बिलकुल लक्ष देऊ नकोस! मेले असलीच काहीतरी विशेषणं लावतात, आणि नंतर निवडणुका जिंकतात! कोण हा युवराज?
बेटा : (बालसुलभ उत्साहात) त्यानंच मला हा कंदिल दिला! दाणकन उडी टाकून आला, आणि म्हणाला : का बा? लालटेन चाहिबा? मी म्हणालो, होयबा! तो म्हणाला, ‘ अन्हार गुरु, बहिर चेला, गुड मांगे तो देवें ढेला!!’ हाहा!!
मम्मामॅडम : (मटकन खुर्चीत बसून) ओह गॉड!
बेटा : (दुर्लक्ष करत) मग मला म्हणाला, ‘हा जादूचा कंदिल आहे,  याच्या प्रकाशात तुला रस्ता सापडेल!! डोळ्यात तेल घालून नजर ठेव!’
मम्मामॅडम : (कोरडेपणाने) डोळ्यात तेल वगैरे ठीक आहे, त्या कंदिलात आहे का ते बघा आधी!! 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com