esakal | ढिंग टांग : धमक्‍या आणि टिमक्‍या!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

प्रिय माजी मित्र मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. अतिशय व्यथित मनाने हे पत्र लिहीत आहे. (तरीही) सर्वप्रथम वर्षपूर्तीखातर तुमचे अभिनंदन! (अभिनंदन हार्दिक असावे लागते, पण आम्ही तो शब्द तूर्त टाळला आहे...) वर्षपूर्तीच्या निमित्ताने तुम्ही सामनावीर मा. संजयाजी यांची मुलाखत घेतली, ती वाचली

ढिंग टांग : धमक्‍या आणि टिमक्‍या!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रिय माजी मित्र मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. अतिशय व्यथित मनाने हे पत्र लिहीत आहे. (तरीही) सर्वप्रथम वर्षपूर्तीखातर तुमचे अभिनंदन! (अभिनंदन हार्दिक असावे लागते, पण आम्ही तो शब्द तूर्त टाळला आहे...) वर्षपूर्तीच्या निमित्ताने तुम्ही सामनावीर मा. संजयाजी यांची मुलाखत घेतली, ती वाचली. (तुम्हीच त्यांची मुलाखत घेतलीत ना? की त्यांनी तुमची? कन्फ्यूजन आहे...) या मुलाखतीत आपण ज्या धमक्‍या दिल्यात, त्याने आमच्या पक्षात घबराट उडाली आहे, हे सांगण्यासाठीच हा पत्रप्रपंच.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘तुम्ही एक सूड काढला तर आम्ही दहा काढू!’, ‘सुदर्शन चक्र तयार आहे!’, ‘तुमची खिचडी पकवू!’ ही तुमची मुलाखतीतील वाक्‍ये ऐकून मी तर हादरुन गेलो. आमचे अध्यक्ष मा. चंदुदादा कोल्हापूरकर शेजारीच बसून मुलाखत बघत होते. ऐन नव्हेंबरात त्यांना घाम फुटला! टावेल ओला झाला, आणि चष्म्यावर धुके साचले. मी नेमका तेव्हा कांदेपोहे खात होतो. माझ्या हातातला चमचा गळून प्लेटीतच पडला. इतक्‍या जबर्दस्त धमक्‍या आणि इशारे कधी ऐकले नव्हते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुमची मुलाखत ऐकून बरेच काही आठवले! ‘चुन चुन के बदला लूंगा’, ‘हैं कोई माई का लाल?’, ‘तुम्हारे सरीर में इतने छेद करेंगे की तुम कन्फुज हो जाओगे, की सांस कहां से लें, और... हे सगळे फिल्मी डायलॉग कानात घुमू लागले. पण ते सगळे बुळबुळीत वाटू लागले!

‘धन्नासेठ, तुम्हारे आदमीयों से कहो, की अपने हथियार फेंक दे, वरना...’ हा डायलॉगही तरळला. कांदेपोहे घशाखाली उतरेनात, आणि मा. चंदुदादांची अवस्था तर बिकट झाली होती. वाजत गाजत शिकारीला निघालेल्या मिशाळ शिकाऱ्याची जंगलात पहिलीच डरकाळी ऐकून गाळण उडावी, तसे काहीतरी आमचे झाले आहे.

वास्तविक आपल्या कारभारावर तुफान कोरडे ओढण्याचा आमचा बेत होता. खरपूस टीका करुन आपल्याला दे माय धरणी ठाय करण्यासाठी आम्ही मोठ मोठे प्लॅन रचले होते. ‘शेवटी एक पुस्तिका तेवढी काढावी, ती काही कोणी वाचणार नाही’ अशी नेमस्त सूचना पुढे आली. त्यानुसार पुस्तिका तयार झाली आहे. परंतु, आपण मनावर घेऊ नये. हल्ली कोण पुस्तके वाचते? तेही मराठीत!!

‘वाटतं, आपण यापुढे सामोपचाराने घेतलेलं बरं! उगीच विषाची परीक्षा नको!’’ असे नंतर मा. चंदुदादा (घाम आणि चष्मा पुसत) तीन-चारदा म्हणाले.
‘राजकारण सोडावं काय?’’ खोल आवाजात त्यांचे मत विचारले. त्या घटकेला खरे तर मी वेषांतर करुन अज्ञातवासात जाण्याचाच विचार करु लागलो होतो. कारण एवढा उघड
उघड धमकावणारा दौलतीचा कारभारी मी आजवर पाहिला नव्हता. याआधीही मी विरोधी पक्षनेता होतो. पण तेव्हाही असली दमबाजी ऐकली नव्हती. असो.

आम्ही आमची थोडीशी टिमकी वाजवली, तर तुम्ही इतके चिडलात. आमच्या टिमकीला तुम्ही धमकीने उत्तर दिलेत! रात्री झोप लागलेनाशी झाली आहे. छतावर फिरणाऱ्या पंख्याचा घरघराट ऐकूनही ‘सुदर्शन चक्रा’ची आठवण येत्ये! (हल्ली पंखा बंद करुनच झोपण्याचा प्रयत्न करतो. असो.) साहेब, एकेकाळी आपण जीवश्‍चकंठश्‍च मित्र होतो. तेव्हा जुन्या नात्याला (थोडा तरी) उजळा देऊन आपण आमच्यावर मेहेरनजर करावी, ही विनंती आहे. कळावे. आपला जुना मित्र. नानासाहेब फ.

ता. क. : मी पुन्हा येईन हं! कृपया ही 
धमकी समजू नये!!

Edited By - Prashant Patil

loading image