ढिंग टांग : आपली निवड...!

Dhing-Tang
Dhing-Tang

डिअर मि. पाटील, महाराष्ट्रात पक्षाध्यक्ष 
बदलण्याच्या हालचाली कराव्या लागणार आहेत. सध्या तेथे मि. थोरातसाहेब म्हणून आहेत, ते एकटेच ही जबाबदारी पार पाडत आहेत. मला त्यांची दया येते. त्यांना फार काम पडते. त्यांच्याकडे एकाच वेळी अनेक पदे आहेत. त्यांना कुठल्या तरी एका जबाबदारीतून मुक्त केले तर बरे पडेल. ते स्वत: अतिशय कार्यक्षम आहेत. पण अध्यक्ष बदलावा, असे आता वाटते. खूप दिवसात भाकरी फिरवली नाही.

मला वाटतं, की महाराष्ट्रातील आपला नवा अध्यक्ष खालील गुणांनी युक्त असा असावा : 
नवा अध्यक्ष तरुण, ताज्या दमाचा असावा. 
तो आक्रमक असावा.
तो निर्भीड आणि नव्या विचारांनी प्रेरित असावा. 
पक्षाला सत्तेपर्यंत नेणारा धडाकेबाज असावा.
कळावे. महामॅडम. (नवी दिल्ली)
ता. क. : वरील सूचना आपल्या पक्षाचे वायनाड (केरळ) येथील खासदारांच्या फर्मानानुसारच केलेली आहे!

आ. ना. बाळासाहेबगारू (सध्या पक्षाध्यक्ष) स. नमस्कार विनंती विशेष. गेल्याच आठवड्यात भेटलो होतो, पण तोंडावर सांगणे जिवावर आले. आता सांगतो! आदरणीय महामॅडम यांनी महाराष्ट्रात नेतृत्त्व बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. (तुमच्याजागी) नवा नेता निवडायची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. तरी आपण नावे सुचवावीत. स्वत:चेच सुचवू नये! मी स्वत: सर्व आमदारांना येऊन भेटलो. सर्वांनी स्वत:चेच नाव सुचवले! अध्यक्षपदासाठी  इच्छुकांची यादी आ. महाम्याडमपुढे ठेवताना छातीत धडधडत होते. पण त्यांनी त्याकडे पाहिलेसुध्दा नाही! ‘ वायनाडचे खासदार आले की ते लक्ष घालतील’. असे त्या म्हणाल्या.
 कळावे. एचकेपा ऊर्फ हुलकोटीचा वाघ.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रिय नानासाहेब, अतिशय घाबऱ्याघुबऱ्या ही चिठ्ठी पाठवत आहे. आ. महाम्याडमनी अचानक भाकरी फिरवण्याचे ठरवले असून नवा अध्यक्ष निवडीचा फतवा जारी केला आहे. नवा अध्यक्ष तरुण, ताज्या दमाचा, आक्रमक आणि नवविचारांचा असला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. हे माझेच वर्णन नाही का? कळावे. 
आपला विजयभाऊ वडेट्टीवार.

प्रिय विजयभाऊ, कळविण्यास अतिशय खेद होतो की ‘तरुण, ताज्या दमाचा, आक्रमक आणि नवविचारांचा’हे आपलेच वर्णन आहे, असे आपल्या पक्षातील किमान चव्वेचाळीस आमदारांना वाटते. वास्तविक हे वर्णन माझेच आहे, हे तर कोणीही सांगेल! वायनाडच्या खासदारांशी मी ऑलरेडी बोललो आहे. तुम्ही तूर्त थंड घ्या. 
आपला. नानासाहेब.

प्रिय मि. पाटील, सादर प्रणाम. आपली जुनी ओळख आहे. तरुण, ताज्या दमाचा, आक्रमक, नवविचारांचा असा मी आहेच, शिवाय अनुभवीदेखील आहे, हे वेगळे काय सांगायचे? अनुभव आणि निष्ठा या दोन्ही गुणांमध्ये मी सगळ्यांना मागे टाकीन. माझ्या नावाचा विचार व्हावा. 
आपला पक्षनिष्ठ. अशोक्राव.
प्रिय पाटीलसाहेब, मागल्या आठवड्यात आपण मुंबईत येऊन गेलात. नव्या विचारांचा, तरुण, आक्रमक वगैरे दुसरा माझ्याशिवाय कोणीही असू शकत नाही, हे तुम्ही पाहिलेच आहे. आणखी काय सांगू? मी स्वत: वायनाडच्या खासदारांचा जवळचा माणूस आहे, हेही लक्षात ठेवावे. कळावे. राजीवजी सातव. 
(खुलासा : मी इतका पक्षाशी आणि परिवाराशी एकनिष्ठ आहे की स्वत:चे नावही ‘जी’ म्हटल्याशिवाय घेत नाही. - राजीवजी!)

आदरणीय महामॅडम, दंडवत. तरुण, ताज्या दमाचा, आक्रमक अध्यक्ष म्हणजे आपले वायनाडचे खासदारच. दुसरे कोण? त्यांनाच महाराष्ट्राचे पक्षाध्यक्ष नेमले तर? विचार व्हावा!! 
कळावे. 
आपल्या महान पक्षाचा एक निष्ठावान (निनावी) कार्यकर्ता.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com