ढिंग टांग : ...राह बनी खुद मंझिल!

Dhing-Tang
Dhing-Tang

बेटा : (खळखळत्या उत्साहात) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक! मला खूप भूक लागली आहे!!
मम्मामॅडम : (कामात व्यग्र...) हंऽऽ...फ्रिजमध्ये पास्ता असेल, गरम करुन घे!
बेटा : (उजळ चेहऱ्याने) नो पास्ता मम्मा, आय वाँट पिठलं भाकरी! मी शेतकरी झालोय!!
मम्मामॅडम : (दचकून) व्हॉट...पिठलं भाकरी?
बेटा : (खुलासा करत) रोस्टेड अँड कुक्ड ग्राम फ्लाऽऽर फ्लेवर्ड विथ हॉट गार्लिक टेम्परिंग! इट गोज वेल विथ रुरल इंडियन ब्रेड कॉल्ड भाकरी! दॅट्स पिठलं भाकरी!!
मम्मामॅडम : तू राजस्थानात जाणार होतास, असं ऐकलं होतं मी?
बेटा : येस, राजस्थानातूनच येतोय! परवा आसामात होतो, आज इथे! उद्या आणखी कुठे तरी जाईन! माझा नियोजित कार्यक्रम मिळाला नाही का तुम्हा लोकांना?
मम्मामॅडम : (अचंब्याने) कसला कार्यक्रम? आत्ता तर परदेशातून परत आलास ना?
बेटा : (घड्याळाकडे बघत) हे बघा, माझे कार्यक्रम ठरलेले असतात, आणि घड्याळाच्या काट्यावर सगळं चाललेलं असतं! स्पीचेस, रॅलीज, रोड शोज, प्रेस कॉन्फरन्सेस...
मम्मामॅडम : फार भाषणं करु नकोस रे बाबा! तुझे व्हिडिओ नंतर खूप व्हायरल होतात, प्रॉब्लेम होतो!
बेटा : गेले ते दिवस मम्मा! आज सकाळीच मी चायनाच्या शी जिनपिंग यांना फोन करुन मुकाट्यानं सैन्य मागे घ्या, असं ठणकावलं! मी काही त्या मोदीजींसारखा डरपोक नाही, भलतंसलतं खपवून घेणार नाही, असं सांगून टाकलं! ते पलिकडून नुसते चिवचिवत होते, म्हटलं नथिंग डुइंग...आमची एक इंच जमीन घेऊ देणार नाही!
मम्मामॅडम : (घाईघाईने) अरे, पण-
बेटा : जिनपिंग सोड, आसामात सीएए का काय तो कायदा वगैरे काहीही लागू करायचा नाहीए, असं सांगून आलोय मी! बाय दवे, त्या कृषि कायद्याची कॉपी शोधतोय मी, आपल्याकडे आहे का?
मम्मामॅडम : असेल की कुठेतरी इथेच, पण-
बेटा : डोण्ट बॉदर...मी मागवलीये! फाडून टाकणारेय चारचौघात! हा असला कायदा तुम्हाला मागे घ्यावाच लागेल, असं मी परवाच मोदीजींना सांगून टाकलंय! भयंकर प्रकार सगळा! गेल्या आठवड्यात हाऊसमध्ये मी सरळ सांगून टाकलं, तुमच्या बजेटफिजेटवर चर्चाबिर्चा काहीही करणार नाही, आंदोलनात बळी पडलेल्या दोनशे शेतकऱ्यांना मिनिटभर शांतता पाळून श्रद्धांजली वाहा, आणि सत्र गुंडाळा! तसं मी केलंसुद्धा! (चिडून) बजेटवर चर्चा हवीये या लोकांना! फू:!!
मम्मामॅडम : (हताशपणे खुर्चीत मटकन बसत) श्वास तरी घेऊ दे रे आम्हाला!
बेटा : (कर्तव्यकठोरपणे) अरे बजेटवर कसलं बोलता? शेतकऱ्यांवर बोला! देशभर जे अराजक पसरत चाललंय, त्याच्यावर बोला! मुळात बोलताच कशाला? मी सांगतो तसं करा, सगळं नीट होईल!!
मम्मामॅडम : (हतबल सुरात) मी कुठे काय बोलतेय?
बेटा : (खुलासा करत) मी प्रातिनिधिक स्वरुपाचं बोलतोय! हल्ली मी देशवासीयांना उद्देशूनच बोलतो!
मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) कुछ लेते क्यूं नहीं?
बेटा : (निर्णायक आवाजात) आता मी ठरवलंय!
मम्मामॅडम : (घाबरुन) ओह गॉड! काय ठरवलंय?
बेटा : (निक्षून सांगत) पीएम होण्याची वाट न पाहता, पीएम असल्यासारखंच वागायचं! हाहा!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com