ढिंग टांग : ‘दुपारी या’ आणि ‘उद्या या’!

Dhing-Tang
Dhing-Tang

त्वरित कार्यवाहीसाठी-
सदरील परिपत्राद्वारे निर्देशित करणेत येत आहे की कोरोना साथरोग कायदा, अधिनियम- अंतर्गत नवीन नियमावली जारी करणेत येत असून त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे नियोजन करावे, असे सूचित करणेत येत आहे. सरकारी कार्यालयांच्या वेळांची पुनर्रचना करणेत येत असून दोन पाळिकां(शिफ्ट) मध्ये कार्यालयाचे कामकाज सुरु राहील. या उपरिर्निर्दिष्ट काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी आचार संहिता लागू करणेत येत असून त्यानुसार वर्तणूक न केलेचे दिसून आल्यास सदरील कर्मचाऱ्याच्या गोपनीय अहवालात लाल शाईने शेरा लिहिणेत येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली पुढीलप्रमाणे -
१. सरकारी कार्यालयात कर्मचारीसंख्या अचानक वाढीस लागलेली दिसून आली असून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सूचित करणेत येत आहे की कार्यालयात विनाकारण उपस्थित राहू नये! अन्यथा कायदेशीर कारवाई करणेत येईल.
२. काही कर्मचारी कार्यालयात येऊन टेबलाशी बसून निमूटपणे मान मोडून काम करतात. अशाने कामे घेऊन येणाऱ्या अभ्यागतांची संख्याही वाढते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा वारंवार भंग होतो. या वर्तणुकीस वेळीच आळा घातला पाहिजे.
३. सदरील सरकारी कर्मचारी घरातील कामे टाळण्यासाठी उगीचच कार्यालयात येऊन बसतात, व कामाचा निव्वळ अभिनय करतात, असे आढळून आले आहे. विनाकारण हपिसात येऊन टंगळमंगळ करणाऱ्या कर्मचाऱ्यास तात्काळ घरी पाठवणेत येईल व दोन्ही वेळची भांडीकुंडी घासणेचे काम देणेत येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
४. काही कर्मचारी मीटिंग ‘आहे, तू जेवून घे’ असे स्वपत्नीस फोनवरुन सांगून सायंकाळी कार्यालयातून परस्पर ठराविक मद्यपानगृहात जातात, असे निष्पन्न झाले आहे. मद्यपानगृहांवर वेळोवेळी छापे मारुन चुकार कर्मचाऱ्यांना ‘उचलण्या’चे आदेश पोलिसांना देणेत आले आहेत, याची नोंद घ्यावी.
५. कार्यालयीन वेळेत कोणताही सरकारी कर्मचारी काहीही कारण नसताना लोकहिताची कामे करताना आढळल्यास त्याची लागलीच विभागीय चौकशी आरंभ करणेत येईल, तसेच चौकशी अंती दोषी आढळल्यास कडक कारवाई करणेत येईल.
६. मा. मुख्यमंत्र्यांच्या आग्रहानुसार ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेचा अंगिकार करण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले असून २५टक्के सरकारी कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील, २५टक्के कर्मचारी प्रवासात राहतील, २५टक्के कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करतील व २५टक्के कर्मचारी घराच्या सज्जात मुकाट्याने बसून राहतील.
७. सकाळी दहा ते दुपारी दोन व दुपारी तीन ते सायंकाळी सात या दोन पाळ्यांमध्ये कार्यालयीन कामकाज पार पडेल. दु. दोन ते तीन लंच टाइम असेल. कार्यालयीन वेळेत डुलकीची सवलत तूर्त काही काळासाठी रद्द करणेत आली आहे.
८. क्‍यांटिनमध्ये भोजन अथवा भजी खाण्यासाठी बसले असताना, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन काटेकोरपणे करणे अनिवार्य आहे. एकमेकांना आपापल्या डब्यातील अन्नपदार्थ देऊ करणे टाळावे, असा आग्रह आहे. पाच व्यक्तींमध्ये एक प्लेट भजी मागविण्यास मनाई आहे.
९. सरकारी कार्यालयात सीसीटीव्ही बसविणेत आले आहेत. कर्मचाऱ्याने आल्या आल्या आपल्या तोंडावरील मास्क किंचित हटवून आपली ओळख पटवून देणे अनिवार्य राहील. कारण सरकारी कार्यालयामध्ये मूळ कर्मचाऱ्याऐवजी दुसराच कुणी काम करुन गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
१०. सकाळच्या पाळीतील कर्मचाऱ्याने अडल्यानडल्या नागरिकास ‘दुपारी या’ असे सांगावे व दुपारी दोननंतर आलेल्या अडल्यानडल्या नागरिकास ‘उद्या या’ असे सांगावे!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com