ढिंग टांग : कागदी घोडे!

editorial article dhing tang
editorial article dhing tang

मा. जिल्हाधिकारी, नांदेड.
विषय : कार्यालय परिसरात घोडा बांधणेस परवानगी मिळणेबाबत.
महोदय, सविनय कळविण्यात येते की आपल्या रोहयो विभागात कार्यरत असलेल्या मा. लेखाधिकाऱ्यांना पाठकण्याचा त्रास होत असून टू व्हीलरच्या साह्याने कार्यालयात येणे जिकिरीचे होत आहे. म्हणून त्यांनी घोडा खरेदी करण्याचे ठरविले आहे. कार्यालयाच्या परिसरात घोडा बांधण्यास परवानगी मिळणेबाबत त्यांनी रीतसर विनंतीअर्ज केला असून त्याचा सहानुभूतीने विचार व्हावा, ही विनंती.
आपला आज्ञाधारक. मुख्य लेखाअधिकारी.
प्रतिलिपी : १ .मूळ अर्जाची प्रत. २. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय.
मा. मुख्यलेखाधिकारी, नांदेड.
विषय : घोड्यावरुन कार्यालयात येणेबाबत.
सविनय स्पष्ट करण्यात येते की, घोड्यावर बसून कार्यालयात येणे पाठीच्या कण्यास अधिक त्रासदायक ठरु शकते. घोडेस्वारीमुळे आणखीन आदळआपट होते व पाठीचा मणका व मणक्याच्या गादीस (खुलासा : ही गादी वेगळी.) दुखापत होऊन पाठीचे दुखणे बळावू शकते. योग्य त्या कार्यवाहीसाठी सविनय.
आपला. अस्थिव्यंगोपचारतज्ञ, जि. नांदेड.
प्रतिलिपी : मा. अधिष्ठाता. सरकारी रुग्णालय.

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
विषय : घोड्यावरुन कार्यालयात येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांस विशेष सवलतींबाबत. महोदय, सविनय निवेदन करण्यात येते की, आमचे कार्यालयातील एक कर्मचारी यांनी वैद्यकीय कारणास्तव घोड्यावरुन कार्यालयात येण्याची परवानगी मागितली होती.
अस्थिव्यंगोपचारतज्ञाचा अभिप्रायदेखील प्रतिकूल प्राप्त झाला आहे. तरीही इंधन दरवाढ व कोरोनाविषयक निर्बंध यांचा एकत्रित विचार करता, सदरील कर्मचाऱ्यास घोडावापराची परवानगी द्यावी, असे वाटते. आपले मार्गदर्शन प्रार्थनीय आहे. पुढील सूचनांसाठी सविनय सादर. आपला. जिल्हाधिकारी.
सोबत : १. मूळ अर्ज प्रत. २. अस्थिव्यंगोपचारतज्ञांचा अभिप्राय.

मा. दादासाहेब, उपमुख्यमंत्री,
विषय : हे काय चालले आहे? हरहर महादेऽऽव!
प्रिय दादा, नांदेड येथील एका सरकारी कर्मचाऱ्याला कार्यालयात येण्यासाठी घोडा खरेदी करावयाचा आहे. त्यासंदर्भातील नस्ती (फाईल) विचारार्थ माझ्याकडे आली आहे. हे काय चालले आहे? हे कागदी घोडे का नाचवले जात आहेत? पूर्वीच्या काळी सांडणीस्वार असत. सांडणी म्हणजे काहीतरी विचित्र प्रकार असणार असे मला बरीच वर्षे वाटत होते, परंतु, सांडणी म्हणजे उंटीण हे खूप उशीरा कळले! जाऊ दे. घोडा आणल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो! आज घोडा आणण्याची परवानगी मागितली जात आहे, उद्या एखाद्याने वाघावरुन येण्याचे ठरवले तर काय उत्तर द्यायचे? सरकारी कार्यालयात घोडा चालणार नाही, असा अध्यादेश जारी करावा.
उ. ठा. (मा. मु. म. रा.)

मा. उधोजीसाहेब -
आपले पत्र मिळाले. प्रकरण नांदेडचे दिसते. (म्हणून) मी ताबडतोब आपल्या मा. आशुक्राव नांदेडकरसाहेबांना फोन लावून विषय समजावून घेतला. त्यांना काहीच माहीत नव्हते. कारण ‘हायकमांडला विचारावे लागेल’ असे ते पुटपुटले. मी फोन ठेवून दिला. सरकारी कार्यालयात घोडा आणणे हा शुद्ध गाढवपणा आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. पण कुणी कशावर बसून यायचं आणि जायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोकशाहीने तो अधिकार त्या व्यक्तीस दिला आहे. घोडा, गाढव, खेचर, उंट, हत्ती, रेडा आदी पाळीव प्राण्यांना वाहनप्राणी म्हणून मंजुरी द्यावी का किंवा कसे? यावर पुढील क्याबिनेटमध्ये चर्चा करावी, अशी माझी सूचना आहे. तोवर सदरील घोडावापराच्या मागणीस स्थगिती देत आहे. सविनय सादर.
आपला. दादासाहेब बारामतीकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com