ढिंग टांग : नाणार होणार की जाणार?

Dhing-Tang
Dhing-Tang

दादू : (सावधपणाने फोन फिरवत हळू आवाजात) सद्याऽऽ... सदूराया... ऊठ, उठ की रे! सकाळपास्नं फोन करतोय मी तुला!
सदू : (झोपेतच फोनमध्ये) घुर्रर्र...गुरुर्रर्र...!
दादू : (अजीजीने) उठ की रे! आता उठला नाहीस तर मी भूपाळी म्हणेन हं!
सदू : (घाबरुन) नको, नको! कोण बोलतंय?
दादू : (खेळीमेळीनं) मी...मी... बोलतोय!
सदू : (गोंधळलेल्या आवाजात) कोण मी?
दादू : (घाईघाईने) मी म्हंजे...मीच रे!
सदू : (कंटाळून) मी एकाच ‘मी’ला ओळखतो... तो म्हंजे मी! मी महाराष्ट्राचा!!
दादू : (खवचटपणे) अजिबात कमीपणा घेत नाहीस! हुहु!! कमीपणातही मी आहेच! कशी आहे माझी नवी शाब्दिक कोटी?
सदू : (थंड खर्जात) वाईट!
दादू : (हबकून) ओळखला नाहीस का माझा आवाज? मी दादू!!
सदू : (जांभई आवरत) फोन का केलास? हल्ली तू फक्त फेसबुकवर बोलतोस, असं कळलंय मला!
दादू : (घाईघाईने विषय बदलत) तुझं आणि मास्कचं एवढं काय रे वाकडं? मास्क म्हंजे काय पुणेरी हेल्मेट आहे, ‘वापरणार नाही’ असं बाणेदारपणे म्हणायला?
सदू : (उठून बसत) मी मास्क लावतच नाही... तुलाही सांगतो!
दादू : (अंगावर शहारा येत) मास्कशिवाय जगाची मी कल्पनाही करु शकत नाही!
सदू : (गंभीरपणे) मास्क सोडून काहीही बोल!
दादू : (गळ घालत) लाव रे तो मास्क!
सदू : (घुश्‍शात) माझ्या ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या चालीवरची आणखी एक वाईट शाब्दिक कोटी!! शी:!!
दादू : (तक्रारीच्या सुरात) लोकांना माझं बोलणं किती छॉन वाटतं! तुलाच एकट्याला माझे विनोद आवडत नाहीत! जळतोस तू माझ्यावर!
सदू : (निक्षून सांगत) मास्क लावला की मला गुदमरायला होतं! असली मास्कटदाबी सहन करण्याचा माझा स्वभावही नाही! शिवाय निम्मं तोंड लपवून हिंडण्यासारखं मी काही केलेलंही नाही! मास्क हे गुलामीचं प्रतीक आहे! सबब मी कोरोना पसरवला नाही, मी मास्क वापरणार नाही!
दादू : (कुत्सितपणे) टिळक आठवले!
सदू : (खिजवत) तुलाही आता मास्क उतरवावा लागणार! नाणार होणार!
दादू : (संतापातिरेकानं) नाणार जाणार!
सदू : (दुप्पट चेवानं) नाणार होणारच!
दादू : (खवळ खवळ खवळून) जाणार नाणारच! आय मीन... नाणार जाणारच! नाणार जाणार नसेल तर काहीच होणार नाही! तुमच्या धमक्‍यांना मी भिणार नाही! कधी कच खाणार नाही! नाणारचा निसर्ग तुटणार नाही! नाणार नाही होणार, नाणार आता जाणार! (न राहवून) गेल्याच महिन्यात मी बघायला गेलो होतो लोणार!
सदू : (सर्द होत) पुन्हा बाष्कळ शाब्दिक कोटी!! कठीण आहे तुझं दादूराया!!
दादू : (ओशाळून) कोटी सुचली की आवरता आवरत नाही रे! ती शिंकेसारखी असते! दाबता येत नाही... पण मी प्रामाणिक प्रयत्न करतोय!! सॉरी!!
सदू : अर्थव्यवस्था रुळावर आणायची असेल तर नाणारसारखा प्रकल्प हातचा जाऊ देणं परवडणारं नाही, हे समजावून सांगणारं पत्र मी तुला पाठवलंय! मिळालं का?
दादू : (साळसूदपणे) कसलं पत्र? नाही मिळालं मला! तू ते पत्र ‘मातोश्री’च्या पत्त्यावर पाठवलंस की ‘वर्षा’ बंगल्यावर?
सदू : (एक डेडली पॉज घेत) पेडर रोडच्या ‘सिल्वर ओक’वर पाठवलं होतं! मिळालं असेलच तुला! वाच, मग बोलू! जय महाराष्ट्र!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com