
ढिंग टांग : अर्थसंकल्प, आयपॅड आणि एल निनो!
प्रिय मित्रवर्य मा. कर्मवीर भाईसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. चार दिवसांपूर्वी मी सादर केलेल्या जबरदस्त अर्थसंकल्पामुळे अनेकांची बोलती बंद झाली असेल, अशी अपेक्षा आहे. मी आयपॅडवर अर्थसंकल्प वाचणारा देशातला पहिला अर्थमंत्री आहे, याची कृपया नोंद घ्यावी! आधुनिकतेकडे, शाश्वत विकासाकडे महाराष्ट्राची वाटचाल सुरु झाल्याचा संदेश मला द्यायचा होता. त्यासाठी आयपॅड सोयीचे पडते.
आकडेवारी, तक्ते, तपशील सगळा पटापट बघता येतो. (विरोधकांची तोंडे उगीच का बंद झाली?) अर्थसंकल्पात मी यंदा काहीच बाकी ठेवले नाही. सगळ्यांना सगळे देऊन टाकले! गेले काही महिने मी सगळ्यांना सगळे देऊन टाकण्याच्याच मूडमध्ये आहे.
(तुम्हाला खुर्ची दिली!) ‘मागेल त्याला शेततळे, आणि मागेल त्याला खुर्ची वा महामंडळे’ याच ब्रीदवाक्यानुसार वाटचाल सुरु आहे. इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मी दणादण घोषणा केल्या, असा आरडाओरडा विरोधक आता करत आहेत. आमचे (आणि तुमचेही) माजी मित्र मा. उधोजी यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन ‘गाजर हलवा’ असे केले.
त्यांनाही एक डबा ‘गाजर हलवा’ रविवारी पाठवून दिला! डबा वापस करताना त्यांनी ‘मी आमरसाची उपमा देणार होतो’ असा उलट निरोप पाठवला आहे. सध्या आंबे महाग आहेत, म्हणून...जाऊ दे! मी मांडलेल्या बजेटमुळे विरोधकांच्या तोंडाची चव जाणार, हे मी आधीच ओळखले होते. पण कर्मवीरसाहेब, तुम्ही आमचे नेते! तुम्ही समाधानी आहात ना? मग झाले! आपला. नानासाहेब फ.
ता. क. : अर्थसंकल्पात मुबलक घोषणा असल्या तरी काळजीचे कारण नाही! यंदा एल निनोचं सावट असल्याने दुष्काळाची तयारी ठेवा, असेही मी बोलून ठेवले आहे. सो डोण्ट टेक टेन्शन! चिल!! शिंची एल निनोची भानगड नसती, तर आजच महाराष्ट्र कुठल्या कुठे गेला असता, असे म्हणायला आपण मोकळे!!
असो. नाना.
प्रिय मित्र तत्त्वज्ञ वाटाड्या मा. नानासाहेब, जय महाराष्ट्र. तुमच्या बजेटच्या वेळी सर्वात जोरात बाके वाजवणारा मीच होतो, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. (शेजारीच तर होतो!) विरोधकांची बोलती कंप्लीट बंद झाली. काही बोलायची सोयच ठेवली नाही तुम्ही! तुम्ही धडाधड घोषणा करत होता, आणि लोक च्याट पडत चालले होते. असे बजेट आजवर कधी झाले नाही, आणि कधी होणारही नाही!
समाजातला असा एकही घटक नाही, की ज्याच्यासाठी तुमच्या बजेटमध्ये घोषणा नाही. क्या बात है! टाळ्या कधी वाजवायच्या हे सांगून ठेवा, अशी विनंती आमच्या काही मेंबरांनी केली होती. त्यांना मी माझ्या बाके वाजवण्यावरुन क्लू घ्या, अशी टिप देऊन ठेवली होती. तस्सेच घडले. तुमचा अर्थसंकल्प गाजला! ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असे म्हटलेच आहे. त्याप्रमाणे तुमचा अर्थसंकल्प पंचामृताशी पैजा जिंकणारा आहे.
तुम्ही आयपॅडचा स्टँड आणून ठेवलात, तेव्हाच मला कळले होते की आजचे बजेट तोडफोड असणार! अधूनमधून बोटाने सरकवत तुम्ही आयपॅडवरची पाने उलटवत होता. मधूनच एखादा शब्द चिमटीत पकडून मोठ्ठा करुन पाहात होता! हे सारे बघायला फार भारी होते...एल निनोचे बोलून ठेवलेत, हे चांगले केले.
मीसुद्धा आता याच लायनीवर काम चालू ठेवीन. ‘त्यांना’ गाजर हलव्याचा डबा कशाला पाठवलात? फक्त गाजरे पाठवायची! असो. बाकी मस्त! कळावे. आपला. कर्मवीर (ठाणे.)
ता. क. : तुमचे आयपॅड बंद होते, हे गुपित कुणाला कळले नाही ना? कृपया चौकशी करावी. कर्मवीर.