
ढिंग टांग - मुसाफिर हूं यारो...!
ढिंग टांग - मुसाफिर हूं यारो...!
बेटा : (अतिशय उत्साहात एण्ट्री घेत...) ढॅणटढॅऽऽण!...मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (पक्षकार्यात मग्न...) हं!
बेटा : (हातातली बॅग, पाठीवरली सॅक खाली आपटत) मम्मा, आयॅम बॅक फॉर द फायनल! पर्मनंट!!
मम्मामॅडम : (हरखून) खर्रच?
बेटा : (हाताची घडी घालून पोक्तपणाने) हां, मम्मा! किसी भी बेटे को अपने मां का घरही अपना लगता है...!
मम्मामॅडम : (आठवण्याचा प्रयत्न करत) कुठल्या सिनेमातला डायलॉग आहे हा?
बेटा : (इमोशनल सूर...) ये मेरे दिल का दर्द बोल रहा है, मम्मा!
मम्मामॅडम : (वास्तवात येत) बारा, तुघलक लेनवरचं घर सोडलं ना? चाव्या त्या नतद्रष्टांच्या टाळक्यावर फेकून आलास ना? उत्तम! आता इथंच रहा!!
बेटा : (सच्चाईचा सूर...) सच बोलने की भी कीमत होती है आज कल, मैं आगे भी चुकाता रहूंगा!! खरं बोललो, म्हणून मला घर सोडावं लागलं... सगळी कुलपं लावून चाव्या त्या सरकारी अधिकाऱ्याच्या हातात दिल्या, तर म्हणाला, सर आज छुट्टी का दिन है, चाबी कल जमा होगी!
मम्मामॅडम : (समजूत घालत) गेलं तर गेलं घर! याच दिल्लीत तुला याच्यापेक्षा मोठा बंगला पुढल्या वर्षीच मिळेल, अशी मेहनत करु या! ओके?
बेटा : (स्वगत म्हणताना नाटकीय ढंगाने) कुणी घर देता का घर? एका तुफानाला?...
मम्मामॅडम : (कळवळून) तुझे घर सोडतानाचे फोटो पाहिले, आणि अवघा देश हळहळला! आपल्या पक्षाने तर ‘मेरा घर आपका घर’ ही चळवळच सुरु केली आहे! देशभरातून अनेकांनी आपली घरं तुला देऊ केली आहेत! हे भाग्य क्वचित कुणाच्या वाट्याला येतं!
बेटा : (निरिच्छपणे) हे विश्वचि माझे घर! मी कुठेही राहू शकतो! मला चिंता नाही!! एका कार्यकर्त्यानं तर ऑफर दिली की माझी एक खोली आहे, भाडं शेअर करु या का? हाहा!!
मम्मामॅडम : (घाईघाईने विषय बदलत) पुढे काय करायचं ठरवलं आहेस?
बेटा : (बेफिकिरीने) ठरवायचं काय त्यात? काही दिवस इथं येऊन जाऊन राहीन! यापुढे ऑफिस हेच घर, आणि घर हेच ऑफिस!!
मम्मामॅडम : (विषण्णपणे) वीस-वीस वर्ष खासदार राहिलास, पण साधी एक स्वत:ची जागा घेता आली नाही तुला!! इतरांनी बघ, महाल बांधले, महाल!
बेटा : (मान्य करत) झूट की ईटों से बने महलों की मुझे कोई परवाह नहीं है. मां! मैं सच की छत के नीचे रहना चाहता हूं!!
मम्मामॅडम : (गोंधळून) हा आणखी कुठल्या सिनेमातला डायलॉग आहे बरं?
बेटा : (दुर्लक्ष करत) खरं बोलण्याच्या नादात घराचं विसरुनच गेलो!! जनतेने मला दिलेलं घर या लोकांनी हिरावून घेतलं! पण हरकत नाही, उनके नाक पे टिचके मैं जल्द ही बडा मकान ले लूंगा!
मम्मामॅडम : (निर्धाराने) घोडामैदान दूर नाही! पुढल्या वर्षी दिल्लीतील सर्वात महत्त्वाच्या मार्गावरल्या सर्वात महत्त्वाच्या बंगल्यात तू राहायला जाशील, आणि मी तिथं राहायला येईन! पण त्यापूर्वी आपली एकजूट व्हायला हवी!
बेटा : (तत्त्वज्ञ वृत्तीने...) घराच्या भिंती महत्त्वाच्या नसतात, त्या भिंतीच्या आत कोण राहातं हे महत्त्वाचं! घर कुठंही मिळेल! घरसंशोधनासाठी मी लौकरच देशभर पदयात्रा काढण्याचा विचार करतोय! मुसाफिर हूं यारों, ना घर है, ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस, चलते जानाऽऽ...!