esakal | ढिंग टांग : सहकार्याचे राजकारण! (एक पक्षांतर्गत पत्रव्यवहार...)

बोलून बातमी शोधा

dhing tang

सर्वांना कळविण्यात येते की मा. मुख्यमंत्र्यांनी स्वत: दुपारी फोन करुन लॉकडाउन करावा लागल्यास सहकार्य करावे, अशी विनंती केल्यामुळे आपल्या पक्षाने उदार मनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सर्वांना कळविण्यात येते की मा. मुख्यमंत्र्यांनी स्वत: दुपारी फोन करुन लॉकडाउन करावा लागल्यास सहकार्य करावे, अशी विनंती केल्यामुळे आपल्या पक्षाने उदार मनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

ढिंग टांग : सहकार्याचे राजकारण! (एक पक्षांतर्गत पत्रव्यवहार...)

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सर्व पक्ष सहकाऱ्यांसाठी-
सर्वांना कळविण्यात येते की मा. मुख्यमंत्र्यांनी स्वत: दुपारी फोन करुन लॉकडाउन करावा लागल्यास सहकार्य करावे, अशी विनंती केल्यामुळे आपल्या पक्षाने उदार मनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तेव्हा सरकारने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनला पक्ष कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. म्हणजेच घरी बसावे! रस्त्यावर उतरुन आंदोलनेबिंदोलने करु नयेत, तसेच व्यापक प्रमाणात लग्नेदेखील करू नयेत. (खुलासा : लग्नसमारंभ असे वाचावे!)
साथरोगाचे महासंकट भयंकर असून सत्ताधारी आघाडीस हे संकट रोखण्यामध्ये सपशेल अपयश आले आहे, हे दिसतेच आहे. लॉकडाउनमुळे कोणाचेही भले होणार नाही, हेदेखील सर्वमान्य (पक्षी : आपल्याला) सत्य आहे. मा. मुख्यमंत्री फेसबुकवर येऊन येऊन मधाळ (पक्षी : मधल्या भावाच्या आवाजात) भाषणे देतात, आणि लॉकडाउनचे इशारे देतात. त्यांना विरोध करायचा असे आधी ठरले होते, पण (त्यांनी कधी नव्हेत तो) फोन केल्यामुळे निर्णय बदलण्यात आला आहे. कळावे. आपला
नानासाहेब फ. (मा.मु. म. रा.-माजी)
ता. क. : मी पुन्हा येईन! दोनेक महिने कळ सोसा!!
……………..
मा. नानासाहेब, शि. सा. न. चालेल! आपण म्हणाल तसे! दोन महिन्यात? खरेच का? –
प्रवीणभाऊ दरेकर
…………..
मा. नानासाहेब, शतप्रतिशत प्रणाम, कौसा (मुंब्रा) येथील कोविड सेंटरला भेट देण्यासाठी मी निघालो असता पोलिसांनी रस्त्यातच अडवून मला परत पाठवले! हल्ली मी घरातून कुठेही जायला निघालो तरी पोलिस अडवतात, आणि तिसरीकडेच नेऊन सोडतात. परवा आमच्या मुलुंडमध्ये ब्रेड आणायला बाहेर पडलो, तर मला जीपमध्ये बसवून भायखळ्याला नेऊन सोडले!! अशा परिस्थितीत सहकार्य कसे करणार? पण तुम्ही म्हणताय, म्हणून (दोन महिने) करू. आपला आज्ञाधारक. सोमय्यागोमय्या
ता. क. : लॉकडाऊनची नवी नियमावली बघितली का? देवळं बंद आहेत, आणि वाइन शॉप उघडी ठेवली आहेत. या नियमाच्याविरोधात मी कोर्टात जाणार आहे. शिवाय सीबीआय, इडी, एनआयए, एनएसए, सीआयए, केजीबी, मोसाद यांनाही लॉकडाउनसंदर्भात वादग्रस्त कागदपत्रे नेऊन देणार आहे! सोगो.
………………….
मा. नानासाहेब, शतप्रतिशत प्रणाम. माझ्या मते मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असून मा. मुख्यमंत्र्यांनी मला फोन करणे अपेक्षित असताना, त्यांनी परस्पर तुम्हाला फोन केला, हे काही योग्य झाले नाही. मी फोनशी वाट बघत बसलो होतो! तुम्हीही त्यांच्या फोनने पाघळलात. मुख्यमंत्रिपदी बसलेला माणूस लाघवी आहे हे मान्य, पण राजकारणात एवढे पाघळणे उचित नव्हे!! मागल्या खेपेला त्यांच्याशी बंद दाराआड बोलणी केलीत, परिणाम काय झाला? यावेळेला तरी अनुभवातून शहाणे होऊन आपण कॉन्फरन्स कॉलवर मला घेतले असते, तर ते पोलिटिकली करेक्ट ठरले असते. दरवेळी तीच चूक करु नये. या लोकांशी बंद दाराआड किंवा खाजगी फोनवर कुठलेही संभाषण करु नये. संभाषण केले तरी त्याचे रेकॉर्डिंग ठेवावे, असे माझे स्पष्ट मत आहे. पुढेमागे सीडीआर काढावा लागणार!!
आता तुम्ही सहकार्याची भूमिका जाहीरच केल्यानंतर इलाज उरला नाही. पण विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना सहकार्य करायचे म्हंजे नेमके काय करायचे? हे स्पष्ट व्हावे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपण त्यांना सहकार्य करू, पण त्याआधी तुम्हीच आपल्या पक्षाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती. कळावे. आपला चंदूदादा कोल्हापूरकर (प्रदेश कमळाध्यक्ष)
ता. क. : दोन महिन्यांचे नक्की ना?