ढिंग टांग : झूम कॉल!

zoom call
zoom call

(इतिहासपुरुष साक्षी आहे एका ऐतिहासिक भेटीला! ही बंधूभेट नाही घडली प्रत्यक्षात. जे काही घडले ते आभासी दुनियेत. इंटरनेटच्या मायाजाळात! झूम कॉलवर ही ऐतिहासिक भेट झाली. या भेटीस फक्त इतिहासपुरुष साक्षी होता-एकाच समयी दोन्ही ठिकाणी. घडले काय? वाचा : 
(झूम सत्र सुरु…)
सदू : (झूम कॉलवर क्यामेरा सारखा करत) ए…कोणॅय रे तिकडे? हे भिकार झूम कसं करायचं बघारेऽऽ...! (तेवढ्यात संगणकाच्या पडद्यावर एक चष्म्याची फ्रेम दिसू लागते. मग नाक…मग नुसता कान!! मग खाकरण्याचा आवाज…) हलोऽऽ… जय महाराष्ट्र!
दादू : (निरखून बघत) जय महाराष्ट्र! सदूराया…तूच आहेस ना? मला आढ्याचा पंखा दिसतोय फक्त!
सदू : (संगणकाचा पडदा नीट करत) आता दिसतंय?
दादू : (मोठ्यांदा ओरडत) म्यूट काढ म्यूट! ऐकू येत नाहीए!! (इथे सदूला काही टोटल लागेनासे होते. तो ओठांची भेदक हालचाल करतो. आवाज बंद!)
सदू : (तावातावाने)….!....!....!!
दादू : म्यूट काढ म्यूट! आवाज कसा येणार?
सदू : (म्यूटचे बटण सापडून) कटकट आहे च्यामारी! झूम कॉल म्हणे! म्हणून म्हणत असतो मी नेहमी! प्रत्यक्ष भेटा, बोला, विषय सोडवा!!
दादू : (पुन्हा तक्रारीच्या सुरात) सदूराया, पलंगावर आडवा पडून नको ना बोलूस! पंखा दिसतोय मला फक्त!! क्येवढी ती जळमटं पंख्यावर! छे!!
सदू : (उठून बसत) वैताग आहे हा झूम कॉल म्हंजे!!
दादू : (गंभीरपणे) त्याला काही इलाज नाही! संकट अजून टळलेलं नाही! मास्क लाव, वारंवार हात धू आणि सुरक्षित अंतर पाळ!! बरं का!!
सदू : (विषय बदलत) तुला प्रत्यक्ष भेटायचं होतं, पण तूच क्वारंटाइन झालास!
दादू : (तक्रारीच्या सुरात) हो ना! त्यातून तू मास्क वापरत नाहीस! माझी ‘मी जबाबदार’ मोहीम ऐकून माहीत आहे ना?
सदू : (विषय बदलत ) पुन्हा लॉकडाऊन का केलास?
दादू : (निराशेने मान हलवत) मला हौस आहे का सदूराया? जड अंत:करणानं मी हा निर्णय घेतोय! माझ्या महाराष्ट्राची मला काळजी आहे! कुणीही कितीही शिव्याशाप देवो, मी कायम माझ्या महाराष्ट्राची काळजी घेणार! कारण महाराष्ट्र हेच माझं कुटुंब आहे!
सदू : स्वत:च क्वारंटाइन झालायस! कशी काळजी घेणार? लॉकडाऊन करुन? माझा विरोध आहे त्याला!!
दादू : (समजूत घालत) विषाणूची साखळी तोडण्यासाठी करावंच लागणार असं! दुसरा काही इलाज दिसतोय का तुला? तर सांग!...आणि त्याला लॉकडाऊन नाही रे म्हणायचं, सदूराया, यावेळी मी लॉकडाऊनचं नाव बदलून ‘चेक द ब्रेन’ आय मीन…(जीभ चावून) ‘ब्रेक द चेन’ असं ठेवलंय!!
सदू : (कुत्सितपणे) तुमच्या कारभाराची चेन तुटलीये ते बघा आधी!
दादू : (खवळून) सद्याऽऽ…तोंड सांभाळून बोल! झूम कॉलवर वाट्टेल ते बोलता येतं असं समजू नकोस!
सदू : (खट्याळपणे) दोन विकेट पडल्या तुमच्या राज्यात! इजा झाला, बिजा झाला, आता तिजा कधी?
दादू : (भान हरपून) सद्याऽऽ…तू माझ्या राज्यात आहेस, हे विसरु नकोस!
सदू : (एक डेडली पॉज घेत) तुझं राज्य आलंय की तुझ्यावर राज्य आलंय, हेच कळत नाहीए, दादूराया! जय महाराष्ट्र.
(झूम सत्र समाप्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com