ढिंग टांग : कातळशिल्प…!

ding dang politics uddhav thackeray raj thackeray basru refinery project konkan
ding dang politics uddhav thackeray raj thackeray basru refinery project konkansakal

दादू : (फोन फिरवत) म्यांव म्यांव!

सदू : (सावध होत) बोल दादूराया, मी ओळखला तुझा आवाज! वाघासारखा वाघ तू, मांजराचे आवाज कसले काढतोस?

दादू : (ओशाळून) तो माझा रिंगटोन आहे!!

सदू : (हवापाण्याच्या गप्पा सुरु करत) दमला असशील ना? कसा झाला तुझा कोकण दौरा?

दादू : (धूर्तपणाने) आधी तुझा कसा झाला ते सांग!

सदू : (हिशेबीपणाने) माझा बरा झाला…म्हंजे बराच बरा झाला!

दादू : (हातचं राखून…) माझाही तसा बराच झाला म्हणायचं!

सदू : (कुतुहलानं) फोटो काढलेस का?

दादू : (दुर्लक्ष करत) सदूराया, मी किनई बारसुला गेलो होतो!

सदू : (शंकेखोरपणाने) बारसु म्हंजे नाणार ना?

दादू : (हसत) खुळा की काय? बारसु वेगळं, नाणार वेगळं!

सदू : मला वाटलं की नाणारच्या नावाचंच बारसु असं बारसु झालंय!!

दादू : (खो खो हसत) माझ्यासारख्या शाब्दिक कोट्या करायला लागलास की रे!!

सदू : (थेट मुद्द्यावर येत) रिफायनरी बारसुमध्ये व्हावी की न व्हावी? एका शब्दात उत्तर द्या!

दादू : (मखलाशी करत) हो आणि नाही…दोन्हीही! स्थानिकांचा विरोध नसेल तर हो! विरोध असेल तर नाही!

सदू : (संभ्रमित सुरात) पण बारसुच्या माळरानावर कातळशिल्प आहेत!! मी स्वत: सॅटेलाइट छायाचित्रं बघितली आहेत!

दादू : (उजळ आवाजात) छायाचित्र? हॅ:…मी स्वत:च जाऊन आलो! (खट्याळपणाने) सुरवातीला मला वाटलं की ती व्यंगचित्रंच आहेत…प्राचीनकाळी काढलेली! हाहा!!

सदू : (हतबलतेनं) अश्मयुगात व्यंगचित्रं कुठली दादूराया!!

दादू : (वर्णन करत) पुढल्या वेळी मी बारसुला जाताना हेलिकॉप्टरमधून कातळशिल्पांचे फोटो काढीन, आणि तुला पाठवीन! तिथं ती फडतूस रिफायनरी नकोच!! या बाबतीत आपल्या दोघांचं एकमत झालं, याचा किती आनंद झालाय मला, सदूराया!! शेवटी काहीही झालं तरी आपण भावंड नाही का?

सदू : (छद्मीपणानं) पण बारसुला रिफायनरी करा, असं पहिल्यांदा तूच पत्राद्वारे केंद्र सरकारला सुचवलं होतंस ना?

दादू : (ठामपणाने) मी ते पत्र लिहिलं तेव्हा आदिमानवानं बहुधा तिथं कातळशिल्पं कोरलीच नव्हती…

सदू : (कमालीच्या संयमानं) गेली हजारो वर्ष तिथं ती कातळशिल्पं आहेत, दादूराया!! आदिमानव जेव्हा गुहेबिहेत राहात होता, दगडांची हत्त्यारं वापरत होता, त्या काळात ती शिल्पं कोरली गेली आहेत!

दादू : (सवयीने विनोद करत) म्हणजे हा त्यांचा रिफायनरी नव्हे, तर फाइन आर्ट प्रोजेक्ट असणार!! तेव्हाही त्यांना स्थानिकांचा विरोध झालाच असेल!

सदू : (कडवटपणाने) भलते विनोद नकोत!

दादू : (विषय बदलत) गंमत केली रे! त्यांना म्हणावं, घेऊन जा, हा प्रकल्प तुमच्या गुजराथेत!

सदू : (कोड्यात टाकत) आम्हाला प्रकल्प हवाय, असं स्थानिक म्हणाले तर?

दादू : (खांदे उडवत) मग प्रकल्प हवाच, असं सुरवातीला मीच पत्र दिलं होतं, असं सांगून टाकायचं!! आहे काय नि नाही काय! मी सरसकट विरोध केलेलाच नाही!

सदू : (थंडपणाने) सरसकट विरोध माझाही नाही! पण-

दादू : (डोकं खाजवत) …मग करायचं काय आपण?

सदू : (मार्ग सुचवत) मी आडून आडून पाठिंबा देतो, तू आडून आडून विरोध कर!!

दादू : (संशयानं) त्यापेक्षा मी आडून आडून पाठिंबा देतो, तू आडून आडून विरोध कर!

सदू : (समाधानानं) तसंही करुन पाहायला हरकत नाही!

दादू : (दुप्पट समाधानानं) आता मात्र खरंच…दे टाळी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com