ढिंग टांग : दे ना टाळी..!

जय महाराष्ट्र तर जय महाराष्ट्र! कोण बोलतंय ते लौकर सांगा!
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

जय महाराष्ट्र तर जय महाराष्ट्र! कोण बोलतंय ते लौकर सांगा!

दादू : (रिकाम्या वेळात फोन फिरवत) हलोऽऽ…जय महाराष्ट्र!

सदू : (घाईघाईने फोन उचलत ) जय महाराष्ट्र तर जय महाराष्ट्र! कोण बोलतंय ते लौकर सांगा!

दादू : (जवळकीने) सदूराया, माझा आवाज नाही का ओळखलास?

सदू : (दुप्पट घाईने) कामाचं बोला पटापट! मला वेळ नाही!

दादू : (प्रेमभराने) एवढी कसली घाई रे? थोरल्या भावाशी बोलायला वेळ नाही का तुझ्याकडे? अरे, मी तुझा दादू!!

सदू : (निक्षून सांगत) शिळोप्याच्या गप्पा मारायच्या असतील, तर सवडीने फोन करीन! मला महाराष्ट्र दौऱ्यावर निघायचंय! पार्टीची कामं करायची आहेत!

दादू : (आशाळभूतपणाने) कधी देतोयस पार्टी?

सदू : (सर्द होत) दादूराया, फोन ठेव! नंतर बोलू!!

दादू : (वेदनेने कळवळत ) कळतात मला ही बोलणी! जे लोक कालपावेतो मुजऱ्यासाठी तिष्ठत होते, ते आता कटवायला लागले आहेत!!

सदू : (जहरी टोमणा मारत) दैव देतं नि कर्म नेतं!!

दादू : (भडकून) खामोश!! हा दादोजी तूर्त मायूस जाहला असला तरी अजून मनगटात ताकद राखून आहे! आडवे याल, तर आडवा करीन!

सदू : (निर्विकारपणे) यात तांत्रिक गफलत आहे, दादूराया! आडवा येणारा ऑलरेडी आडवाच येणार! त्यालाच आडवा कसा करणार?

दादू : (चवताळून) सद्याऽऽ…!!

सदू : (नरमाईनं घेत) रागावू नकोस, दादूराया! एक वेळ अशी होती की तुला भेटायला माणसं तिष्ठत होती, आणि तुला वेळ नव्हता! मी इथे माणसांची वाट बघत दिवसरात्र बसायचो, आणि कुणीही यायचं नाही! आता उलट झालंय…!

दादू : (हळहळून ) हंऽऽ…घर फिरलं की घरचे वासेदेखील फिरतात!! सकाळपासून घरात चहा मागतोय, कुणी आणून देईल तर शपथ!!

सदू : (घड्याळाकडे न बघता…) चालायचंच! हे बघ, मला खूप अपॉइण्टमेंट्स आहेत! लोक बाहेर ताटकळत बसले आहेत! आपण नंतर बोललो तर नाही का चालणार?

दादू : (कुत्सितपणाने) हल्ली बरेच बिझी झालेले दिसता, सदूशेठ! इंजिन जोरात धावणार की काय, आँ?

सदू : (शांतपणाने) धावणार, अगदी जोरात धावणार! बुलेट ट्रेनपेक्षा जोरात धावणार!!

दादू : (खोदून खोदून विचारत) हल्ली त्या कर्मवीरांशी गॉटमॅट सुरु आहे, असं कळलं! खरं का?

सदू : (कोरडेपणानं) तुला काय करायच्या आहेत रिकाम्या चौकश्या? तुला काही काम उरलं नाही, म्हणून इतरांनीही घरात बसावं का? महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागलोय, कामं केलीच पाहिजेत!

दादू : (वडिलकीचा सल्ला देत) त्या कमळाबाईच्या नादाला लागून कोणाचंही भलं झालेलं नाही, लक्षात ठेव!

सदू : (हुकमाचा पत्ता टाकत) का? त्या कर्मवीरांचं झालं की भलं!!

दादू : (संतापून) तळपट होवो त्यांचं! गद्दार लेकाचे!! त्यांच्याशीही काही साटंलोटं करु नकोस, ऐक माझं!

सदू : (थंड प्रतिसाद देत) बघू!!

दादू : (सलगी दाखवत) सदूराया, काही वर्षांपूर्वी तू मला टाळी मागितली होतीस…आठवतंय?

सदू : (कपाळाला आठी घालून) ते सगळं आता मी विसरलोय!

दादू : (आपुलकीचा कहर करत) कितीही झालं तरी तू माझा धाकटा भाऊ आहेस! पुन्हा मागितलीस टाळी तर मी का आता नाही म्हणणार आहे?

सदू : (सुप्रसिद्ध खर्जात) कमळाबाईला विचारुन सांगतो! चालेल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com