ढिंग टांग : मीडिया फ्रेंडली व्हायचंय?

येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात स्फोट होणार, असे आम्ही गेले साताठ महिने ऐकत आलो आहो.
Dhing Tang
Dhing Tangsakal
Summary

येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात स्फोट होणार, असे आम्ही गेले साताठ महिने ऐकत आलो आहो.

येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात स्फोट होणार, असे आम्ही गेले साताठ महिने ऐकत आलो आहो. त्याआधीचे साताठ महिनेही असेच काहीसे ऐकले होते, आणि त्याहीपूर्वीची साडेतीन वर्षे हेच ऐकत आलो होतो. परंतु, यावेळेचा स्फोट जबरी आणि शतप्रतिशत असणार, अशी खबर आम्हाला मिळाली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रवादी संचातील कलावंतांचा ‘मी पुन्हा आलो’ या राजकीय प्रहसनाचा प्रयोग झाल्यानंतर प्रतिक्रिया विचारण्यासाठी आम्हाला आमचे नेते (‘एकच वादा…’ फेम) मा. दादासाहेब बारामतीकरांकडे जावे लागले.

दादासाहेब बारामतीला गेल्याचे त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सांगण्यात आले. बारामतीत गेलो, तर दादासाहेब पुण्यात असल्याचे सांगण्यात आले. पुण्यात आलो तर दादासाहेब मुंबईतच आहेत असे कळले! अखेरीस एकदाचे सांपडले!! पण ही भेट केवळ चिरस्मरणीय ठरली.

मा. दादासाहेबांची प्रतिक्रिया घेण्यासाठी अनेक वाहिन्यांचे प्रतिनिधी आपापले दांडुके घेऊन सज्ज उभे होते. सुरवात कशी होणार, हे प्रत्येक माध्यमकर्मीला मनोमन ठाऊक आहे. उदाहरणार्थ, दादासाहेब बाहेर येणार. मग आल्या-आल्या बरसणार : ‘काये रे?... लांब उभा राहा ना जरा बाबा, काय तोंडात घालतो का काय माझ्या माइक!...ए, तू गप रे…हां, बोला, काय काढलं?...हे बघा, संजय राऊत काय म्हणाले, पटोलेसाहेब काय म्हणाले, ते काहीही बोलले असतील तर त्यांच्याकडे जावा ना!! काय बोलायचं, नाही बोलायचं, याचा अधिकार लोकशाहीनं ज्याला त्याला दिला आहे…ते बोलले तर त्यांना विचारा, आम्हाला दुसरे उद्योग नाहीत का? ए…तू थांब रे…काय?’

भर रस्त्यात फटाक्यांची माळ फुटून संपली की वाहतूक मोकळी होते, तदनुसार या आतिशबाजीनंतर दादासाहेबांची पत्रकार परिषद मार्गी लागते. पण आजचा दिवस वेगळाचि होता…

‘या, या! बसा, चहा घेणार की थंड? पन्हं सांगतो हं!’ परिचित सुरात हे वाक्य ऐकून आम्हाला मूर्च्छा आली. दादासाहेबांनी आम्हाला पन्हे विचारले, ही बातमी बाहेर फुटली तर माध्यमजगतात केवढी खळबळ माजेल, या कल्पनेने आमचा झेंडू फुटला होता… कुणीतरी कांदा आणायला धावले. कुणी पाणी तोंडावर शिंपडू लागले. तेवढ्यात दादासाहेबांनी कुणाला तरी हांक मारली, ‘ए, चप्पल काढ रे…!’ आम्ही तात्काळ उठून बसलो.

‘तुम्हा माध्यमकर्मींसाठी मी रोज सकाळी प्रेस परिषद घेत जाईन!,’ दादासाहेब अतिशय मुलायम आवाजात हे बोलले, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. पण दादासाहेब चक्क हसत होते…

‘मी आता मीडिया फ्रेंडली व्हायचं ठरवलंय!’ दादासाहेबांनी जाहीर केले. हे म्हणताना त्यांनी सलगीने एका पत्रकाराच्या खांद्यावर हात ठेवला. एकाच्या डोक्यावर गंमतीने टप्पल मारुन डोळे मिचकावले. एका पत्रकाराचा गालगुच्चासुद्धा घेतला. (या तिन्ही मीडियावाल्या पत्रकारांना घाईघाईने बेशुद्धावस्थेत उपचारार्थ अन्यत्र हलवण्यात आले.) बाकीचे माध्यमकर्मी (आमच्यासकट) पुढे सरसावले. दादासाहेबांना काय विचारु, आणि काय नको, असे होऊन गेले. एकच कलकलाट झाला. एवढा राडा होऊनही दादासाहेब शांतपणे हसत हसत उभे होते.

‘दादासाहेब, तुम्ही मुख्यमंत्री कधी होणार?’ एका पत्रकाराने खेळीमेळीच्या सुरात बिनधास्त विचारुन टाकले. बाकीच्यांनीही ‘सांगा, सांगा ना’ असा धोशा लावला. दादासाहेब ‘नाही नाही’ अशी मान हलवत होते. पण कोणी काही केल्या ऐकेना. शेवटी अचानक तो स्फोट झाला…

‘तुमच्या आता! मघापास्नं गोडीनं वागतोय, तर डोक्यावरच बसायला लागले तुम्ही….हे असलं वागता, म्हणून तुमच्याशी बोलत नाही! एकेकाला **** पकडून

**** *** देऊन ** ***!!! निघा इथून!! मीडिया फ्रेंडली म्हणे! कसलं आलंय मीडिया फ्रेंडली?’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com