esakal | ढिंग टांग : धमकी आणि टिमकी!

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : धमकी आणि टिमकी!
sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

धमक्या देणे हा दखलपात्र गुन्हा (Crime) असला तरी टिमकी वाजवणे मात्र कायद्याला मंजूर असावे. टिमकी वाजवल्यामुळे कारवाई होत नसते, उलटपक्षी झाला तर काहीसा फायदाच होतो. किंबहुना टिमक्या वाजवून काही माणसे राजकारणात (Politics) फार्फार पुढे गेल्याची उदाहरणे आहेत. राजकारणात टिमकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धमकीला तितकेसे नाही, तरीही थोडेफार महत्त्व (Importance) आहेच. आमच्या वळखीची काही माणसे कायम धमक्या (Warning) देतात, तर काही माणसे कायम टिमकी वाजवतात. धमकी आणि टिमकी यांचा कायम संतुलित उपयोग केला तर राजकारणात काम पक्के होऊन जाते, असा आमचा अनुभव व अभ्यास सांगतो. असे असले तरी कुणी कुणाला धमक्या देणे मात्र आम्हाला अजिबात मंजूर नाही. (टिमकी वाजवणे मंजूर आहे.) टिमकी वाजवली म्हणून धमकी देणे तर बिलकुलच मंजूर नाही. (Editorial Article Dhing Tang)

टिमक्या वाजवणे एवढे गुन्हेगारी स्वरूपाचे असते तर आम्ही आज भायखळ्याला आर्थर रोडच्या खोलीत आढळलो असतो. धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. असो.

घडले ते येवढेच की दूर पूर्वेकडे बंगालात कुणीतरी निवडणूक जिंकले व कुणीतरी हरले. त्यावर महाराष्ट्रात कुणीतरी टिमकी वाजवली, म्हणून दुसऱ्या कुणीतरी धमकी दिली. हा तिढा कसा सोडवावा? तपशील येणेप्रमाणे :

आमचे परममित्र मा. चंदुदादा यांनी आमचे दुसरे परममित्र मा. छगनबाप्पा यांना धमकी दिली. कां? तर मा. छगनबाप्पांनी टिमकी वाजवली! आता टिमकी वाजवली म्हणून धमकी देणे योग्य आहे का? नाही! आम्हाला काही पटले नाही. आम्ही नाराजी नोंदवण्यासाठी थेट मा. चंदुदादांना गाठले. ते नेहमीप्रमाणे चष्मा पुसून म्हणाले : ‘‘ नै…मुद्दा कुणी काय बोलावं हा नाहीच्चे! पण तुमच्या परममित्रांना सांगा जरा की गप्प बसा, नाहीतर महागात पडेल!’’

‘तुम्ही अशी धमकी कशी देऊ शकता?’ (सात्विक संतापाने) आम्ही.

‘ नै…मग ते टिमकी का वाजतात?’ (न्यायकठोर बुद्धीने) ते!

‘टिमकी वाजवल्याबद्दल धमकी म्हंजे फारच झालं! एवढं काय बोलले ते?’ आम्ही मा. छगनबाप्पांची वकिली केली.

‘नै…ते त्यांनाच विचारा!’ मा. चंदुदादांचा चष्मा पुसून झाल्याने आम्ही तिथून उठलो. तडक मा. छगनबाप्पांकडे गेलो. ते हिरमुसून गळ्यातील सुंदरशा मफलरचे टोंक बोटांनी गोल गोल पिळत बसले होते. डोळे डबडबले होते. ओठ बाहेर, आणि घशात आवंढा! ‘बाप्पा, बाप्पा, नका असे हिरमुसू!’ आम्ही ममतेने म्हणालो.

‘एवढं मी काय बोललो होतो? ममतादिदी झाशीच्या राणीसारख्या एकाकी लढल्या आणि त्यांनी विरोधकांचे नाक कापले, त्यांची अब्रू धुळीला मिळवली, असं काहीतरी बोललो!

त्यात एवढं मिरच्या झोंबण्यासारखं काय होतं?’’ त्यांनी रडवेल्या आवाजात तक्रार केली.

‘पराभवानं माणूस चिरडीला येतो हो! लक्ष देऊ नये आपण!’ (समजुतीच्या सुरात) आम्ही.

‘फ्राँकफ्रीफ्रुकबुरब्रुकसुर्रर्र…’ मा. छगनबाप्पांनी नाकाला मफलर लावला. एवढा सुंदरसा डिझायनर मफलर…पण जाऊ दे.

‘छे आमच्या चंदुदादांचे चुकलेच! त्यांचं घर आपण उन्हात बांधू हं!’ आम्ही त्यांचे शांतवन केले.

‘ते आमच्या बंगाली ममतादिदींनी आधीच बांधलंय!’ डोळे गरागरा फिरवत मा. छगनबाप्पा म्हणाले, ‘‘ सरळ सरळ धमक्या देतात, याला काय लोकशाही म्हणतात?’’

आम्ही विचारात पडलो. म्हणालो, ‘तुम्ही ‘ममता परिषद’ स्थापन करा, आणि लोकशाहीचं संरक्षण करा!’’

‘व्वा! क्या बात है...,’ असे म्हणून मा. छगनबाप्पांनी पुन्हा टिमकी बाहेर काढली.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा