esakal | ढिंग टांग : …कमळ मंडळाची दिल्लीवारी!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : …कमळ मंडळाची दिल्लीवारी!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

सर्व पक्ष सहकारी - विषय (‘ष’ चा उच्वार स्पेशल करावा.) असा आहे की, महाराष्ट्र प्रदेश कमळ पक्षाच्या नेत्यांना दिल्लीत कोणीही धड ओळखत नाही. काहीही समस्या आल्यास (किंवा न आल्यास) आपले ज्येष्ठ नेते व भावी मुख्यमंत्री (मी पुन्हा येईन’ फेम) मा. नानासाहेब फडणवीस हेच दिल्लीला जातात व समस्या सोडवून येतात. परिणामी, आपल्यापैकी कुणालाच दिल्लीला जाण्याची संधी मिळत नाही. आम्हालाही दिल्ली दौरा करायचा आहे, अशी मागणी आपल्या पक्षाच्या काही नेते-आमदारांनी वारंवार केली. त्यास मान देऊन दिल्लीत गपचूप जाण्याचे ठरले आहे. मा. नानासाहेबांना या नियोजित दिल्लीवारीचा पत्ता लागू देऊ नये! भलताच घोळ होईल!! तरी आपापल्या ब्यागा घेऊन दिल्लीत येणेचे करावे. तेथे (जमल्यास) कमळ पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा कार्यक्रम योजिला आहे. विशेष भाग्य फळफळल्यास मा. मोदीजींचे दुरुन दर्शनाचा लाभ होऊ शकेल, शिवाय मा. मोटाभाई यांच्या निवासस्थानावरुन मोटारीने जाता येऊ शकेल. हे भाग्य सर्वांच्याच वाट्याला येत नसते, याची कृपया नोंद घ्यावी. बाकी भेटीअंती.

- आपला. चंदूदादा कोल्हापूरकर (सध्या पुणे), प्रदेश कमळाध्यक्ष.

ता. क. : टूथब्रश, टावेल स्वतंत्र आणावेत, ही विनंती.

मा. दादासाहेब, शतप्रतिशत प्रणाम. आपल्या आदेशानुसार आम्ही दिल्लीत येऊन पोचलो. महाराष्ट्र सदनात उतरलो आहे. काल रात्रीचे जेवण मिळाले नाही. ‘जेवण संपले का?’ असे विचारले असता तेथील व्यवस्थापकाने ‘वेळ संपली’ असे उत्तर दिले. असो. एरवी आपल्या प्रदेश कार्यालयात दिसणारे बहुतेक सगळेच चेहरे इथे दिसत आहेत. आपण सगळ्यांनाच दिल्लीत बोलावले आहे का? काल सायंकाळी मा. मोटाभाईंना भेटायला जायचे आहे, असे मा. बावनकुळेसाहेब सांगून गेले. (हे पण इथे आलेत!) या भेटीसाठी मी नवेकोरे कपडे (ब्यागेत) आणले होते. त्यांना पुन्हा इस्तरी केली आणि तयार होऊन बसलो. कोणीही घ्यायला आले नाही. मा. मोदीजींचे दुरुन दर्शन होईल, असे संकेत आपण दिले आहेत. हे नक्की घडणार आहे ना? मोबाइलमधील कोविडलसीच्या सर्टिफिकेटावरील फोटो बघून आम्ही समाधान मानून घेत आहो!! आपल्या निरोपाची वाट पाहात आहे. कळावे.

- आपला नम्र. एक कमळ आमदार.

ता. क. : वाट लागली! शेजारच्या खोलीत मा. नितेशजी राणे उतरणार आहेत, असे कळले!

मा. चंदूदादा, शतप्रतिशत प्रणाम. काल रात्री मा. मोटाभाईंशी बैठक ठरवली होती. त्यानुसार त्यांच्या बंगल्यावर पोचलो. परंतु, थांब थांब थांबूनही ते बाहेरच्या खोलीत आले नाहीत, आम्ही आधी त्यांच्या दिवाणखान्यात होतो. मग रखवालदाराने बाहेरच्या हिर्वळीवर थांबायला सांगितले. तिथून दुसऱ्या रखवालदाराने गेटच्या बाहेर उभे केले! तिथून परत महाराष्ट्र सदनातच आलो…दुर्बिणीने तरी आपल्या ज्येष्ठ नेत्यांचे दर्शन होईल का?

- कळावे. विनोदवीर (माजी आमदार)

ता. क. : घात झाला! फडणवीसनाना आणि दरेकरभाऊ दोघेही दिल्लीत आले आहेत!

मा. चंदूदादा, शतप्रतिशत प्रणाम. आपली सगळी मंडळी दिल्लीत पोचली का? पोचली नसली तरी हरकत नाही. मी मा. मोटाभाईंशी दोनदा (बसल्या बसल्या) आणि मा. मोदीजींशी एकदा (उभ्या उभ्या) भेट घेऊन महाराष्ट्राचे सर्वच्या सर्व प्रश्न सोडवले आहेत. काळजी नसावी. सदैव आपलाच. नानासाहेब फ.

ता. क. : परतीची तिकिटं काढा, असे ज्येष्ठांनी कळवले आहे.

loading image
go to top