ढिंग टांग : न बोलवा मां नौ गुण!

राजा विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही, तो पुन्हा झाडापाशी गेला. फांदीवर लोंबकळणारे प्रेत त्याने खांद्यावर ओढून घेतले, व तो चालू लागला. खांद्यावरील वेताळ त्याला म्हणाला, ‘मी तुला एक गोष्ट सांगेन.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

राजा विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही, तो पुन्हा झाडापाशी गेला. फांदीवर लोंबकळणारे प्रेत त्याने खांद्यावर ओढून घेतले, व तो चालू लागला. खांद्यावरील वेताळ त्याला म्हणाला, ‘मी तुला एक गोष्ट सांगेन.

राजा विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही, तो पुन्हा झाडापाशी गेला. फांदीवर लोंबकळणारे प्रेत त्याने खांद्यावर ओढून घेतले, व तो चालू लागला. खांद्यावरील वेताळ त्याला म्हणाला, ‘मी तुला एक गोष्ट सांगेन. त्यातील कूटप्रश्नाचे उत्तर दिलेस तरच मी तुझ्यासोबत येईन.’

विक्रमादित्य काही बोलला नाही. वेताळ गोष्ट सांगू लागला : भारतीनगरी नावाच्या राज्यात एक नमोदत्त नावाचा परोपकारी राजा राज्य करीत असे. गोरगरीबांसाठी योजना आणी, त्यांच्यासाठी मंदिरे आणि घाट बांधी. इतकेच काय गावागावात त्याने स्वच्छतागृहेदेखील बांधली. राजा नमोदत्त अल्पावधीतच नागरिकांमध्ये लोकप्रिय झाला. ‘राजा असावा तर असा’ असे त्याचे दरबारी अधिकारी आणि अन्य मंडळी बोलू लागली. पूर्वीच्या राजाशी त्याची तुलना करु लागली. आधी राज्यकारभार करणाऱ्या राजाचे नाव मनोदत्त असे होते. मनोदत्त अबोल राही. गोरगरीबांसाठी जमेल तसे काम करीत राही. मनोदत्त अबोल, तर नमोदत्त बोलघेवडा होता. नमोदत्त बोलेल ते करुन दाखवणारा, तर मनोदत्त करुन दाखवलेलेही न बोलणारा. मनोदत्ताला मौनीबाबा असे चिडवणारा नमोदत्तच पुढे राज्याचा अधिपती झाला हा नियतीचा खेळ होता. नमोदत्ताने आपल्या अमोघ वाणीने प्रजेला मुग्ध केले. पण...

प्रजेमध्ये अचानक वितंड माजू लागले. ‘डोके फोडीन’, ‘तंगडे तोडीन’, ‘सरळ करीन’, ‘वाकडे करीन’ अशी भाषा तिठ्या-तिठ्यांवर ऐकू येऊ लागली. धमक्या-दरडावण्यांना ऊत आला. परंतु, नमोदत्ताने त्याबाबत एकदम बोलणेच बंद केले. प्रजेमधली दुफळी, भांडणे, वितंड यांच्याबद्दल तो काही बोलेनासा झाला. प्रजा बुचकळ्यात पडली. एवढे अमोघ वक्तृत्त्व असलेले सम्राट नमोदत्त हल्ली बोलत का नाहीत? प्रजेमध्ये शांतता नांदावी, गुण्यागोविंदाने राज्य चालावे, असे त्यांस वाटत का नाही? असे काय घडले की ज्यामुळे नमोदत्ताने मनोदत्ताप्रमाणे मौनव्रत पत्करले? विक्रमराजा, त्वां या प्रश्नाची उत्तरे दे. अन्यथा तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील...’

अखेर विक्रमादित्याने मौन सोडले. तो म्हणाला, ‘वेताळा, आधी तुझी भाषा सुधार पाहू! डोक्याची शंभर शकले करण्याची हिंस्त्र भाषा तुला मुळीच शोभत नाही. वेताळ झालास, म्हणून काहीही बोलशील का? तेव्हा तुझे शब्द तू मुकाट्याने मागे घे!’

विक्रमादित्याने झापल्यामुळे वेताळ चपापला व गोरामोरा झाला. तेव्हा विक्रमादित्यच पुढे म्हणाला : मेल्या, वेताळा, राज्य कारभार करणे म्हणजे झाडाच्या फांदीवर रिकामटेकड्याप्रमाणे लोंबकळण्याइतके सोपे नसते. तुला नाहीत उद्योग! मी गप्प राहून तुझ्या बोअरिंग गोष्टी ऐकत शतके काढली. आता कोण ऐकून घेणार? आता सोशल मीडियाचे दिवस आहेत. नेत्याच्या मनात काय आहे, हे ओळखून त्याचे चमचेच सोशल मीडियावर परस्पर उत्तरे देऊन काम फत्ते करतात. नेत्यांना तोंड कशाला उघडावे लागते, गाढवा? पुढे ऐक, मनोदत्त काय, किंवा नमोदत्त काय, दोघांनीही आपापली विहित कर्तव्ये बजावली, आणि बजावताहेत. परंतु, बोलणाऱ्याची माती खपते, आणि न बोलणाऱ्याचे सुवर्णही पडून राहाते, हा बाजारपेठेचा नियम आहे. त्यानुसार मनोदत्ताचे सोने पडून राहिले, आणि नमोदत्ताची माती खपली! तसेच ‘न बोलवा मां नौ गुण’ अशी गुजराथी भाषेत म्हण आहे. वेळवखत पाहून बोलणे यालाच राजकारण असे म्हणतात. कळले?’

‘तू बोला, मैं चला,’ असे म्हणत घाबरलेल्या वेताळाने उडी मारली, आणि तो पुन्हा झाडावर जाऊन सुरक्षित लोंबकळू लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com