esakal | ढिंग टांग : यह दृश्य विचलित कर सकते हैं!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : यह दृश्य विचलित कर सकते हैं!

ढिंग टांग : यह दृश्य विचलित कर सकते हैं!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सोफ्यावरती पाय पसरुनि

रिमोट हाती घेऊन कोणी

उगाच टीव्ही पाहत बसला,

दृश्ये पाहुनि पडद्यावरली

बसल्या बसल्या सोफ्यावरती

कुणीएक तो विचलित झाला…

टीव्हीवरली अँकरयुवती

बजाबजावुनि सांगत होती,-

‘दृश्य यही तुम सबको अब भी

कर सकतें है विचलित, विगलित.

खून बहा है यहां किसी का

सर फूटे है, सब है स्तंभित’

तसेच घडले…

उग्र मनाचे किसान काही

मुठी उगारुन

संतापाने फणफणलेले,

तप्त घोषणा वातावरणीं

ढगाळलेले नभही

तेव्हा दुमदुमलेले,

किसान होते, त्यांना कुठले

ठाऊक होते

राजनीतीतिल डावेउजवे?

किंवा कुठल्या पेचामधले डाव

आणखी धुरिणांचीही मोठी नावे?

जुलूम होता, त्याला उत्तर

ज्याने त्याने द्यावे सत्त्वर

तिथल्या तेथे, जसे तसे वा

एकजुटीने अन् बलवत्तर

इतुके मातुर किसानांस

त्या होते ठावे.

जयघोषांच्या गजरामध्ये

अस्मानामधि उडती फेटे

आणि धुळीचे लोट उधळती

किसानहाती लाठ्या, सोटे.

सडकेवरले दगड उचलुनि

फेकित सुटला जमाव साचा

कल्लोळाच्या लाटा उठल्या,

खळाळ खळखळ फुटल्या काचा

…अशीच असते किसानगर्दी.

शेतशिवारी मान मोडुनि

राब राबतो बापुडवाणा

पोरीच्या अन् लग्नासाठी

कर्जापायी केविलवाणा

वेठ धरोनी बिगार म्हणुनी

हुकूम झेलीत भिंगुळवाणा

मातीमध्ये हात खुपसुनि,

आयुष्याची करितो माती

अखेर जातो मातीमध्ये

होऊन जातो केवळ माती

…त्याला म्हणती किसान सारे.

बापुडवाणा किसान त्याच्या

कुणिही नाही उभाच पाठी

कबीर त्याच्या मनातला मग

हाती घेतो एक लुकाठी.

डावेउजवे, हिरवेभगवे

हिशेब इथले त्यास न ठाऊक

मुळीच नाही त्याला माहीत

विद्वेषाचे विखार घाऊक.

आणि अचानक-

आणि अचानक एक जीप ती,

रागीट गुरगुर करिते इंजिन

तशीच रेंदत, चेंदत तेव्हा

वाट काढिते जाळत इंधन

जणू जुरासिक युगातला अन्

डिनॉसॉर तो धावत येतो,

दाढा रगडत सावज सगळे

अजस्त्र चावत अखंड गिळतो,

तसेच झाले.

चाकाखाली चिरडुनि जाती

उगा फुकाचे अनाम जीवित

राजकारणी कुभांड होते,

किसान मेला साग्र नि संगीत,

डाव रंगले!

जो तो उठतो करतो दावे

किसानभक्तीचे, उद्धाराचे

न्यायबुद्धीच्या अपहरणाचे

उच्चरवातुनि उठती नारे

‘जय जवान, अन् जय किसान’चे

तणक्षेत्राचे होत रुपांतर रणक्षेत्री,

अन् किसानभाई उगी उभा हा,

त्यास कोठुनि कळून यावे

राजकारणी खाचेखोचे?

टीव्हीवरली अँकरयुवती

सांगत होती पोटतिडकीने

पाहुनि सारे कुणीएक तो

(सोफ्यावरला) विचलित झाला

पोटामध्ये खड्डा

पडुनि स्तंभित झाला,

माजघराशी जाऊन तेव्हा,

बशीत थोडे कांदेपोहे

घेऊनि आला

‘गरीब बिचारे किसान अपुले’

पुटपुटला मग कुणीएक तो,

दु:खभराने विचलित त्याने

(मिरची तुकडा बाजूस सारुन)

शिगोशीग भरलेला चमचा

निर्ममतेने मुखी सोडला.

loading image
go to top