ढिंग टांग : नळावरचे भांडण : अंक दुसरा!

संजयाजी : (सकाळी नऊ वाजल्याच्या आविर्भावात) भांडी काढा रे इथनं! ही आमची पाणी भरण्याची वेळ आहे! कुठल्याही सोमय्यागोमय्यानं उठावं, आणि नळाखाली आपली टमरेलं भरावीत, हे महाराष्ट्राला मान्य होणार नाही!!
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

संजयाजी : (सकाळी नऊ वाजल्याच्या आविर्भावात) भांडी काढा रे इथनं! ही आमची पाणी भरण्याची वेळ आहे! कुठल्याही सोमय्यागोमय्यानं उठावं, आणि नळाखाली आपली टमरेलं भरावीत, हे महाराष्ट्राला मान्य होणार नाही!!

स्थळ : सार्वजनिक नळ. वेळ : पाणी भरण्याची.

काळ : पाणी गेल्याचा!

पात्रे : काही जात्यातली...काही सुपातली!

संजयाजी : (सकाळी नऊ वाजल्याच्या आविर्भावात) भांडी काढा रे इथनं! ही आमची पाणी भरण्याची वेळ आहे! कुठल्याही सोमय्यागोमय्यानं उठावं, आणि नळाखाली आपली टमरेलं भरावीत, हे महाराष्ट्राला मान्य होणार नाही!!

सोमय्यागोमय्या : खामोश! टमरेलं तुम्ही भरभरुन नेताय! हा नळच आमचा आहे, हे विसरु नका! तुम्ही रांग मोडून घुसला आहात! महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही!

संजयाजी : (डोळे फिरवत) माय व्यालीये कुणाची आम्हाला खामोश म्हणण्याची! नळ काय तुमच्या तीर्थरुपांचा आहे का?

सो.गो. : (टाळी वाजवून हात नाचवत) तुमच्या तरी कुठाय? घरुन घेऊन आलात का नळ?

संजयाजी : (संतापातिरेकानं) चोर, लफंगे!

सो. गो. : (तोंडातून शब्द फुटत नाहीत...) श..श...श...शिव्या कोणाला देता? हा सभ्य नागरिकांचा महाराष्ट्र आहे, तोंड सांभाळून बोला!

संजयाजी : (चेकाळत) आणखी देईन शिव्या! काय करशील? फुल्याफुल्या...फुल्याफुल्या... फुल्याफुल्याफुल्या... बीप...बीप...बीप...बीप...बीप...टुंऽऽऽ!!

सो. गो. : (खिजवत) अरे अरे अरे अरे! काय हे संस्कार!! तुम्ही शाळेत गेला नाहीत का हो कधी?

संजयाजी : (हाताची घडी ,तोऱ्यात) गेलो असेन नाहीतर नसेन! तुझ्याकडे फीचे पैसे मागितले का? तुमचं शिक्षण काय, पगार काय, उंची काय, चष्म्याचा नंबर काय...आणि तुम्ही बोलताय काय!!

सो. गो. : (अभिमानाने) मी सीए आहे, सीए!!

संजयाजी : (तुच्छतेने) असले डझनभर सीए मी नुसते आयटी रिटर्न्स भरायला ठेवतो!!

सो. गो. : पण भरता का?...रिटर्न्स? खीखीखी...

संजयाजी : (खवळ खवळ खवळून...) चोर तो चोर, वर शिरजोर! सीए म्हंजे चोर आदमी!! भंगारात निघालेल्या बोटीसाठी पब्लिकचे पैसे गोळा करता! टीशर्ट घालून डबे फिरवता! म्हणे निधी संकलन! हीच का तुमची देशभक्ती! ते काही नाही...पैसे, डबे आणि टीशर्ट सगळं वसूल करीन!!

सो.गो. : (वर्मी घाव लागल्यागत) हॅ:, प्रापर्टी अट्याच झालेल्या माणसाशी आपण बोलत नसतो! आपल्या पायाखाली काय जळतंय, ते बघा!

संजयाजी : (मिशीला पीळ भरत) बाप-बेट्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवीन, तरच नावाचा संजयाजी!!

सो. गो. : (कुत्सितपणे) आधी तुम्हीच बॅगा भरायला घ्या! ते बघा, ईडीवाले आलेच!

संजयाजी : (दचकून मागे बघत) क...क...कुठे आहेत?

सो. गो. : (टाळी पिटत) हाहाहा! दरवेळी मी तुम्हाला असंच दचकवतो! दरवेळी तुमचा पोपट होतो! होहोह...हीहीही!!

संजयाजी : भलती मस्करी चालणार नाय हां, आपल्याशी! आधीच सांगून ठेवतोय! गाठ मराठी माणसाशी आहे, एवढं लक्षात ठेवा! आपल्याशी वाकडं तर नदीवर लाकडं! समजलं ना?

सो. गो. : (तावातावाने) धमक्या कुणाला देताय?

संजयाजी : (थंडपणाने) तुला...काय करशील? गुमान तुझं टमरेल हटव, मला माझं पिंप भरु दे! साडेनऊ वाजून गेले... मीडियावाले खोळंबले असतील!

सो.गो. : (कमरेवर हात ठेवून) मला दहा वाजता भेटणार आहेत, तेच मीडियावाले! जास्त गमजा मारु नका!

एक तहानलेला चाळकरी : (पुढे येत अजीजीने) ...तुमचं झालं असेल तर मी आमची कळशी लावू का? घरात प्यायलादेखील पाणी नाही हो!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com