esakal | ढिंग टांग : कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे?
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे?

ढिंग टांग : कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे?

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

‘‘अ -भणा माणस देशपर बोझ छे...कछु सांभळ्यो?’’ माननीय मोटाभाईंनी हातातली फूटपट्टी पुढ्यात नाचवत सुनावले, तेव्हा आम्ही खांदे पाडून मान शरमेने खाली घातली. मोटाभाई आम्हाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होते. गुजराती भासा मां भणणे माने शिकणे! मराठी भाषेत शिकणे म्हणजे (डोके) भणभणणे!! असो.

विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले... इतके सारे अविद्येपोटी घडले, हे आम्हाला कळले होते, पण कधी वळले नाही. चार बुके धड शिकलो नाही, याचा प्रचंड विषाद आम्हाला त्याक्षणी वाटला. छे, सगळे जिणे फुकट गेले. थोडेतरी भणायला हवे होते.

‘‘केटला भण्या छे?’’ त्यांनी विचारले. काय उत्तर द्यावे अं? किती भणलो? काय भणलो? मनुष्यप्राणी आयुष्यभर विद्यार्थी असावा, असे आम्ही ऐकून होतो. म्हणजे आयुष्यभर भणणे आले! जाऊ दे. उत्तरादाखल आम्ही त्यांना आंगठा दाखवला. त्यांनी ‘चुक चुक’ असा उद्वेगवाचक उद्गार काढला. हताशेने मान हलवली. रेल्वे फलाटावर पडलेल्या भल्यामोठ्या बोचक्याकडे भारवाही बिल्लेवाल्याने पाहात मान हलवून ‘इसका पच्यास रुपिया ज्यादा होगा’ असे सांगावे, तद्वत त्यांची मुद्रा होती.

‘‘केटला खाए छे?’’ त्यांनी विचारले. आमची अपराधी नजर पुढ्यातल्या ढोकळ्याच्या प्लेटीकडे गेली. मोटाभाईंनी ती प्लेट काढून घेतली, आणि अति खाणे हे आरोग्यास कसे अपायकारक आहे, यावर आमचे एक बौध्दिक घेतले.

इकडची काडी तिकडे न करता नुसते जगत राहाणे, हेच उदाहरणार्थ अडाणीपणाचे लक्षण आहे, हे त्यांनी आम्हाला (वारंवार) पटवून दिले. आम्हालाही ते तेथल्या तेथे पटले. अडाणी माणूस हा देशाच्या खांद्यावरला (किंवा माथ्यावरला) बोजा असतो. अडाणी माणसाला संविधानाने दिलेले हक्कही धड ठाऊक नसतात, ना कर्तव्ये!

‘‘...असला माणस च्यांगला नागरिक कसा काय बनू सकेल? कछु सांभळ्यो?,’’ असा सवाल मा. मोटाभाईंनी आम्हाला केला. त्याचेही आमच्यापाशी उत्तर नव्हते. त्यांच्या ‘कछु सांभळ्यो?’ या प्रश्नार्थक पृच्छेला आम्ही उत्तर दिले ते मौनानेच. बालपणापासूनच आमचे कर्तृत्त्व ‘खायला काळ आणि भुईला भार’ ही म्हण वापरुनच सांगण्यात येते. देशाच्या पाठीवरचा (खांदा, डोके झाले, आता पाठ आली...) निव्वळ बोज्या म्हणून आपण जगतो आहोत, ही दाहक जाणीव पुन्हा एकवार अंतर्मनाला जाळून गेली. चार बुके शिकलो असतो, तर निदान या देशाचा कामी तरी आलो असतो, असे वाटून डोळियांत पाणी तरळले.

माणसाने भणले... आय मीन शिकले पाहिजे. थेट शाळेत नसेल तर किमान ऑनलाइन तरी शिकले पाहिजे! दुर्दैवाने घरच्या परिस्थितीमुळे आम्ही धड भणू शकलो नाही. चाऱ्ही ठाव खायची सोय, आणि अठरा तास लोळण्याची हक्काची जागा चोवीस घंटे उपलब्ध असेल तर, कोण भणण्याच्या भानगडीत पडेल? आमचे तस्सेच झाले...

...आमचे ओझे वाहात देशाला विकासाच्या वाटेवर मार्गक्रमणा करायची आहे, या कल्पनेने आम्हाला अपराधी वाटले. खरोखर कठीण मामला आहे. पण आता याला उपाय काय? आम्ही माननीय मोटाभाईंनाच सल्ला विचारला.

‘‘तुमचा बोजा हलका व्हावा यासाठी काय करायला हवे मोटाभाई?,’’ डोळे पुसत आम्ही अखेरीस विचारले.

‘‘नो प्रोब्लेम... तुम्ही आमच्या पक्साची मेंबरशिप घेतली काय? घेऊन टाका ने... मामला खतम! कछु सांभळ्यो?’’ त्यांनी नामी उपाय सुचवला.

...खरे सांगतो, मनावरचे (अपराधीपणाचे) मणामणाचे ओझे झटक्यात उतरले.

loading image
go to top