esakal | ढिंग टांग : मानसिक मुख्यमंत्री! | Dhing Tang
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : मानसिक मुख्यमंत्री!

ढिंग टांग : मानसिक मुख्यमंत्री!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : राक्षसनाम संवत्सर श्रीशके १९४३ आश्विन शु. अष्टमी.

आजचा वार : ट्यूसडेवार!

आजचा सुविचार : दिल के झरोके में तुझको बिठाकर । यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर ।

रख्खुंगा मैं दिल के पास । मत हो मेरी जां उदास...।।

(सं. शि. हसरत जयपुरीकृत मो. रफीसाहेबनिरुपित ‘गीतमंजुषे’तून साभार.)

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) सकाळीच गोव्याला निघून आलो. प्रोटोकॉलप्रमाणे दोन दिवस इथे राहून दसऱ्याला परत जाणार आहे. इथे जंगी स्वागत झाले. आजही मला इथे ‘महाराष्ट्राचो मुखेल मंत्री’ असेच संबोधतात. मला बरे वाटते. गेल्या दोन वर्षात मी जेथे जेथे गेलो, तेथे तेथे माझे मुख्यमंत्री म्हणूनच स्वागत झाले. मधल्या निर्बंधांच्या काळात मास्क लावून फिरत होतो. तेव्हाही लोक मला ‘सीएमसाहेब’ म्हणून अचूक ओळखत होते. परवाच मराठवाड्याचा दौरा करुन आलो, लोकांनी मला मुख्यमंत्री म्हणूनच गाऱ्हाणी सांगितली. ‘सीएमसाहेब आता तुम्हीच आमचे आधार आहात…काहीतरी करा!’ असे तेथील शेतकऱ्यांनी अश्रूभरल्या डोळ्यांनी मला सांगितले.

मीदेखील त्यांना मुख्यमंत्र्यासारखेच आश्वासन देऊन आलो. मी स्वत:ला कधीच विरोधी पक्षनेता समजत नाही. मी नाहीच्चे मुळी!!

कालपरवाचीच गोष्ट. नवी मुंबईत एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथल्या आमच्या नेत्यांनी माझे असे काही स्वागत केले की विचारु नका! शेवटी ‘तुमच्या पाठबळामुळे मला आता आपण मुख्यमंत्री नाही, अशी जाणीवच होत नाही’ असे मी सांगून टाकले. माणूस कुठल्या पदावर आहे, याला काही अर्थ नसतो. तो काय काम करतो, आणि जनतेच्या मनात त्याची काय ओळख आहे, याच्यावर त्याचा लौकिक ठरतो. लोक अजूनही मला सीएम समजतात, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते मला सीएम समजतात. मग मी स्वत:ला सीएम समजलो तर त्यात काय चुकीचे आहे? काही लोक स्वत:ला वाघ समजतात. लोकदेखील त्यांना वाघ समजतात! असे समाजात चालतच असते. असो.

गोव्याच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी आमच्या पंकजाताईंचा फोन आला होता. त्या म्हणाल्या : तुम्ही मुख्यमंत्री (समजत) असाल तर ती चांगलीच गोष्ट आहे, पण ‘जनतेच्या मनातली मुख्यमंत्री’ या बिरुदावर माझा कॉपीराइट आहे, हे लक्षात ठेवा!’ मी त्यांना ‘हो’ म्हटले.

‘आपल्या पक्षात दोन मुख्यमंत्री आहेत, एक जनतेच्या मनातला (किंवा मनातली), आणि दुसरा मनातल्या मनातला (किंवा मनातली!).’’ मी म्हणालो. त्यांनाही पटले. आमचे कमळाध्यक्ष मा. चंदूदादांनाही मी तेच सांगितले. ते गंभीर झाले.

‘काहीही झालं तरी मला मी मुख्यमंत्री नाही, असं वाटतच नाही! असं का?’’ मी विचारले.

‘हे गंभीर लक्षण आहे, काळजी घ्या!’’ चष्म्याची काच पुसत ते म्हणाले, ‘‘ ‘‘तुम्हालाच काय, मलासुध्दा हल्ली कधी कधी मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं. आपले शेलारमामासुद्धा स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. इतकंच काय, परवा ते मुलुंडचे किरीट सोमय्या येऊन गेले, त्यांनाही हल्ली मुख्यमंत्री झाल्याची लक्षणं वाटू लागली आहेत!’’

महाराष्ट्राचा प्राब्लेम सध्या हाच आहे- मुख्यमंत्री असल्याची लक्षणं अनेकांमध्ये दिसू लागली आहेत. सगळ्यांनाच आपण सीएम असल्यागत वाटू लागलं आहे, आणि जो खरोखर मुख्यमंत्री आहे,त्याचा मात्र ‘आपण खरोखर मुख्यमंत्री झालो आहोत,’ याच्यावरच विश्वास बसत नाही. यावर एकच मार्ग मला दिसतो- मी पुन्हा येणं! असो.

loading image
go to top