ढिंग टांग : नीरोच्या नवलनगरीत…!

जुन्या पुराण्या चिरेबंदी महालाच्या सौधात उभे राहून रोमन सम्राट नीरोने सभोवार टाकली नजर,
Dhing Tang
Dhing TangSakal

जुन्या पुराण्या चिरेबंदी

महालाच्या सौधात उभे राहून

रोमन सम्राट नीरोने

सभोवार टाकली नजर,

म्हणाला : प्रिय ऑक्टाविया,

कुष्ठरोग झाल्याप्रमाणे, ही

भिकारड्या रोमनांची वस्ती

महालाला चिकटून राहिली आहे,

एखाद्या रक्तपित्या जळवेसारखी!

ही वस्ती उठवून तिथं

उभारावं भव्य राजसंकुल,

जिथे रोमन साम्राज्याच्या

वैभवी परंपरेचं व्हावं दर्शन,

असं नाही का तुला वाटत?’’

ऑक्टावियाने किंचित हसून

महापौरांना बोलावणे धाडले.

वेगाने सूत्रे हलली, नगररचनाकारांचे

तांडे रोमकडे वळले, कागदावर

विविध रेखाटने उमटू लागली,

विशाल डोमुस ऑरिआ म्हणजेच

राजसंकुलाचा आराखडा झाला तयार..

‘सम्राटाचा विजय असो!

भव्य राजसंकुलाच्या उभारणीचा

मुहूर्त ठरवायचा आहे, तत्पूर्वी,

या आराखड्याकडे पाहून घ्यावे!

या इथं विशाल पुष्करिणी, आणि

चहू अंगांनी सीझर खानदानातील

सरदारांचे उंच पुतळे…

हा मधला चौक आपल्याच

तीस पुरुष उंच कलोजस प्रतिमेसाठी

राखून ठेवला आहे, आणि

इथल्या प्रांगणात खास भारतातून

आणवलेले मयुर पक्षी दाणे टिपणार आहेत,

या क्रीडासंकुलात रंगणाऱ्या झुंजींसाठी

जर्मनभूमीतून खास ओरोक्स जातीचे

वृषभ आणवले जातील, आणि

इजिप्तमधून तजेलदार अश्वांची

आयात करण्यात येईल, जेणेकरुन

रथशर्यतींचा रंग द्विगुणित होईल.

सम्राटाच्या महालाच्या सौधामागे

सुवर्णाचे कळस दिसतील, आणि

तेथेच सम्राटांच्या संगीतसभेसाठी

ध्वनियोजनाही करण्यात येत आहे…’’

आराखड्यातील नियोजन पाहून

सम्राट नीरो बेहद्द खुश झाला,

त्याने नगररचनाकार क्लॉडियसला

भेट दिले एक सुवर्णकडे, आणि प्रिय

राणी ऑक्टावियाच्या खजिन्यात

आणखी एका नायाब रत्नहाराची

आपसूक भर पडली.

त्यानंतर काही दिवसांनी, एका उत्तररात्री

अचानक महालानजीकची ती जळूयुक्त

भिकारड्या रोमनांची वस्ती

धडधडा जळू लागली...

आकांताच्या धुराने काळवंडला

आसमंत, माणसे इतस्तत: धावली,

धडपडली, श्वास कोंडून मेली.

इमारती, झोपड्या, वाड्या-वस्त्या

जळून खाक झाल्या, बघता बघता

सारे रोम सैराट जळू लागले…

तेव्हाच-

आपल्या सौधामध्ये निवांतपणे

एकटाच फिडल वाजवत बसलेल्या

सम्राट नीरोला एक जुनी

सिंफनी याद आली, आणि

त्या आर्त सुरांनी त्याच्या

संवेदनशील, रसिक डोळ्यांमध्ये

अनाहूतपणे पाणी तरारले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com