esakal | ढिंग टांग : दिव्याखाली अंधार!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : दिव्याखाली अंधार!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

‘...हा असाच कारभार चालू राहिला तर अवघा महाराष्ट्र अंधारात बुडेल!’’ घनघोर काळोखी आवाजात मंत्रीमहोदयांनी इशारा देताक्षणी बैठकीच्या दालनातील दिवे गेले. सामसूम अंध:कार पसरला. महाराष्ट्रातील विजेची थकबाकी सत्तर हजार कोटींच्या वर गेल्यामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून वाट काढण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती, तेव्हा हा प्रकार घडला. पुढील सारा प्रसंग आवाजाधारितच वर्णावा लागणार आहे, कारण काळोखात काहीही दिसत नव्हते. कोण काय बोलते आहे, याचा अंधारात काय पत्ता लागणार? संवाद झडला तो काहीसा येणेप्रमाणे :

मंत्री आवाज १ : लाईट गेली?

मं. आ. २ : दिसत नाही का?

मं. आ. १ : दिसत नाहीए, म्हणूनच विचारतोय, अण्णासाहेब!

मं. आ. २ : मी अण्णासाहेब नाही!

म. आ. ३ : बरं, दादासाहेब म्हंटो!

मं. आ. २ : मी दादासाहेब तर अजिबातच नाही!

मं. आ. १ : हेच...महाराष्ट्राचं हेच भविष्य आहे! काळोख, नुसता काळोख!

मं. आ. २ : तुम्ही भविष्य सांगता वाटतं? दिवे आल्यावर आमचाही हात बघा मग!

मं. आ. १ : हात काय बघा? ‘हाता’मुळेच झालंय हे सगळं! सांगत होतो, वीज खातं त्यांच्याकडे देऊ नका म्हणून! आता भोगा फळं!!

मं. आ. ४ : वीज खात्याचा कारभारच दरिद्री आहे! केवढा भ्रष्टाचार, केवढी ती उधळपट्टी! अशानं एक दिवस महाराष्ट्र अंधारात लोटला जाईल, असं मी पंधरा मिनिटांपूर्वीच म्हटलं होतं!

मं. आ. ६ : ऐका, ऐका! गडबड करु नका! आपापली जागा सोडू नका!

मं. आ. ७ : अगदी कुणी कुणाच्या कानफटात मारली तरी जागा सोडू नका हां!!

(इथे ‘फाट, फडाड’ असे आवाज घुमतात. आइग्गं, ओय असे कुणी विव्हळते. काही काळ सामसूम पसरते.)

मं. आ. ६ : ऐका, ऐका! संकट अजून टळलेलं नाही! अंधाराचा गैरफायदा घेऊन कुणी सामाजिक अंतराचा नियम मोडू नये! खिशात सॅनिटायझरची बाटली आहे ना? दोन दोन थेंब अंदाजे तळहातावर टाकून घ्या! मास्क काढू नका! अंतर पाळा!

मं. आ. ७ : घ्या! हे सुरु झाले!!

मं. आ. ८ : अहो, तात्यासाहेब, तुम्ही सॅनिटायझर माझ्या हातावर काय टाकताय?

मं. आ. ९ : हो का? बरं बरं! अंधारात नेम चुकला असेल!

मं. आ. ३ : त्र्याहात्तर हज्जाराची थकबाकी! बाप रे! महाराष्ट्र भिकेला लागेल अशानं! छे, याला काय कारभार म्हणतात?

मं. आ. १ : मी आधीपासून सांगत होतो! या राऊतजींकडे देऊ नका वीज खातं! माझ्याकडे द्या!

मं. आ. ६ : यातून मार्ग कसा काढायचा, हे ठरवा! उणीदुणी मागाहून काढू!! दादासाहेब, तुम्ही बोला!

मं. आ. ८ : मी काय बोलू? सगळा दिव्याखाली अंधार आहे! नुसता वर उजेड! माझ्या गळ्यात घालू नका हे लचांड!

मं. आ. ९ : ‘वीज थकबाकीमुळे महाविकास आघाडीचा फ्यूज उडाला’ असल्या बातम्या टीव्हीवर बघण्यापेक्षा महाराष्ट्र अंधारात गेलेला बरा! काय मंडळी, खरं की नाही? द्या टाळी!...ओय ओय! अहो टाळी मागितली होती, हे काय भलतंच! आईग्गं!!

...तेवढ्यात दिवे आले! दिव्याखाली बैठक पुढे सुरु झाली!

इति.

loading image
go to top