ढिंग टांग : शेल कंपन्यांचा सपशेल पर्दाफाश! (इन्स्पेक्टर किरीट कथा!)

‘दया, कुछ तो गडबड है!,’ एखाद्याच्या डोळ्यावर तिरीप पाडण्यासाठी आरसा धरुन हालवतात.
Dhing Tang
Dhing TangSakal

‘दया, कुछ तो गडबड है!,’ एखाद्याच्या डोळ्यावर तिरीप पाडण्यासाठी आरसा धरुन हालवतात, तसा अदृश्य आरसा पंजाने दाखवत इन्स्पेक्टर किरीट यांनी असा काही संशयी चेहरा केला की अभिनेता शिवाजी साटम यांनी त्यांच्याकडून काही धडे गिरवावेत! त्यांची मुद्रा कर्तव्यकठोर झाली. भिवया वक्रावल्या. डोळे बारीक झाले. ओठांवर गूढ स्मित झळकू लागले. सारांश इतकाच की इ. किरीट यांना नवे प्रकरण हाती गवसले होते.

इ. किरीट हे नेमके काय आहेत, हे उभ्या भारताला ठाऊक नाही. ते लोकप्रतिनिधी आहेत की नुसतेच सामाजिक कार्यकर्ते? सीआयडी की सीबीआय अधिकारी? गेले काही महिने ते ‘इडी’त नोकरीला लागल्याची गुप्त चर्चा सुरु होती. पण वस्तुत: ते एक खाजगी गुप्तहेर आहेत, हे फार थोड्या लोकांना माहीत आहे.

‘अमक्या अमक्या प्रकरणाची कागदपत्रे दिल्लीहून आली का?’ असे ते मधूनच आपला सहकारी दया यास विचारतात. उत्तरादाखल दया कुठली तरी खिडकी किंवा दरवाजा उचकटतो. इडी आणि सीबीआय अधिकाऱ्यांसारखी आपणही कुठेतरी ‘रेड’ मारावी, असे त्यांना भारी वाटते. मग ते एकटेच रेड मारुन येतात! गेल्या टायमाला एका मंत्र्याचे छुपे रिसॉर्ट शोधून काढून त्यांनी जबर्दस्त पर्दाफाश केला होता. (दयाने दरवाजा उखडून आणला!) आणखी एका राजकीय नेत्याचा कोकणातला बंगला हुडकून काढला होता. (तिथेही दयाने एक बिजागिरीसकट खिडकी उचटली!) एकदा तर कुणाची तरी जमीन धुंडाळून काढली होती. (दयाने तिथले गवत उपटले!) कुण्या काकांच्या कामाचे कागद कात्रीने कराकरा कापून काहीच्या काहीच कारनामे करणाऱ्या किरीटांना कोण कोळखत काही? (खुलासा : वाक्याच्या शेवटले दोन शब्द ओळखत नाही? असे वाचावेत ही विनंती.) यावेळीही तस्सेच घडले.

‘आज सकाळी सात वाजेपर्यंत आपल्याविरुध्द एकूण साडेचारशे कोटी रुपयांचे अब्रुनुकसानीचे दावे ठोकण्यात आले आहेत...सर!’’ हातात दरवाजा धरुन दयाने अदबीने माहिती पुरवली.

‘टुबी प्रिसाइज चारशे छप्पन्न कोटी तीन हजार पाचशे बेचाळीस रुपये! मी चार्टर्ड अकौंटंटंटंट आहे हे विसरु नकोस!’’ इ. किरीट अभिमानाने म्हणाले. अकौंटंट असे म्हणताना नेमके ‘टंट’ किती, यामध्ये त्यांचा थोडा घोळ होतो.

‘कोलकात्याच्या शेल कंपन्यांनी हे १२८ कोटी रुपये असे काही गोल गोल फिरवले आहेत की विचारु नकोस! हे १२८ कोटी गेले कुठे? हा खरा सवाल आहे!’’ हातातले कागद क्ष-किरणाची फिल्म पहावी, तसे तपासत इन्स्पेक्टर किरीट यांनी नवी केस दयाला समजावून सांगितली, त्यातले एक अक्षरही त्याला कळले नाही. तो निमूटपणाने दुसऱ्या दरवाजाशी जाऊन उभा राहिला.

‘एकेकाचा असा काही भंडाफोड करीन की देखते रह जाओगे...आय आय!,’’ इ. किरीट यांनी तळहातावर मूठ हापटली. वाक्याच्या अखेरीस आलेले ’आयो’द्गार मूठ अंमळ जोरात आपटली गेल्याने अवचित उमटले होते.

‘मंत्र्यांनो, बॅगा बांधून तयार रहा! हाहाहा!!,’’ विकट हास्य करीत इ. किरीट म्हणाले. त्यांचे विकट हास्यदेखील रहस्यकथेच्या नायकाच्या स्मिताप्रमाणे गूढ असते.

‘येवढ्या केसेस पडल्या तर अब्रुनुकसानीचे पैसे कुठून आणणार आपण...सर?,’’ दयाने निरागसपणाने प्रश्न विचारला.

‘आपलीही बॅग भरुन तयार ठेव...,’’ इ. किरीट विचारपूर्वक म्हणाले. दयाला त्यांच्याबद्दल इतका आदर दाटून आला की, त्याने काहीही कारण नसताना आणखी एक दरवाजा उखडून आणला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com