ढिंग टांग : औषध न लगे मजला!

‘पडूं आजारी, मौज ही वाटे भारी’ हे जुने काव्य ज्या कुण्या कविने लिहिले, त्यास आमचे त्रिवार वंदन असो. कां की असले काव्य लिहिणारा मनुष्य उच्चकोटीचा धैर्यमूर्ती असणार, हे उघड आहे !
Dhing Tang
Dhing TangSakal

‘पडूं आजारी, मौज ही वाटे भारी’ हे जुने काव्य ज्या कुण्या कविने लिहिले, त्यास आमचे त्रिवार वंदन असो. कां की असले काव्य लिहिणारा मनुष्य उच्चकोटीचा धैर्यमूर्ती असणार, हे उघड आहे ! सांप्रतकाळी साधे पडसेदेखील माणसाच्या छातीत धडकी भरवते. आमच्या वळखीच्या एका गृहस्थाने तीनदा सटासट शिंकून थेट वकिलास पाचारण केले. परंतु, वकीलच आल्या आल्या शिंकल्याने मृत्युपत्राची कार्यवाही स्थगित झाली. तरीही त्याने निरवानिरव सुरु ठेवली. पडसे बरे झाले तरी तो बरा झाला नाही. असो. सध्या एकंदरितच लसीकरण आणि औषधोपचार याबद्दल इतक्या उलटसुलट सूचना कानावर येत आहेत की आम्हाला हल्ली कानाने ऐकू येईनासे झाले आहे. परवा मोठ्ठा श्वास घेतला तेव्हा नाकाने ऐकू आले!! त्यामुळे आम्ही घाबरुन आमचे भरवशाचे फ्यामिली डॉक्टर रा. हर्षवर्धन यांच्याकडे गेलो. ‘लसीकरण आणि औषधोपचार’ यांविषयी आम्ही एक प्रश्नावली तयार केली होती, त्याची उत्तरे मिळवण्याचा आमचा प्रयत्न होता. रा. हर्षवर्धन डॉक्टर यांना नुसते बघून पेशंटाचे निम्मे दुखणे पळते. आम्हाला मुळात दुखणेच निम्मे झाले होते, त्यामुळे ते पूर्णच पळाले. इतके हे गृहस्थ कायम हसरे आणि पॉझिटिव (पक्षी : सकारात्मक) मनोवृत्तीचे आहेत! मागल्या खेपेला त्यांनीच ‘साथ गेली, आहात कुठे?’ असे जाहीर केले होते.

लसीकरणाची त्यांनी केलेली सहर्ष घोषणा ऐकून आम्हालाही हर्षवायू झाला होता. येत्या तीन-चार दिवसात संपूर्ण देशाचे लसीकरण पूर्ण होऊन उरलेली लस ओतून द्यावी लागेल, असे वाटले होते. पण…पण ते जाऊ दे. हर्षवर्धन डॉक्टर यांच्या सहर्ष क्लिनिकमध्ये आम्ही गेलो. गळ्यातील स्टेथास्कोप उपरण्यासारखा घेऊन ते रुबाबात बसले होते. ‘‘काय होताय?’’ हातातला टॉर्च सर्सावत त्यांनी (हसत हसत ) विचारले. सवयीने आम्हीऑ…करुन जीभ काढून दाखवली. पण त्यांनी आमचे नाक पकडून टॉर्च नाकपुडीत मारलान! (शंका : सर्व फ्यामिली डॉक्टर नाकपुडीत ब्याटरीचा झोत टाकून नेमके काय प्रेक्षणीय असे बघतात?) नाक सोडवून घेत आम्ही प्रश्न विचारायला सुरवात केली.

प्रश्न : लस कधी घ्यावी?

उत्तर : चौऱ्यांशीचा फेरा संपला की! आय मीन चौऱ्यांशी दिवसांनी!

प्रश्न : कुठली घ्यावी?

उत्तर : मिळाली तर ना? आहेच कुठे? खीखीखी!!

प्रश्न : रेमडेसिवीर कधी मिळणार?

उत्तर : ते कुठे औषध आहे? इस्पितळातला मुक्काम कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, येवढेच! हाहा!! (इथे प्रश्नकर्त्याच्या बीमार मनात काही हिंस्त्र विचार बळावले. परंतु त्याने ते क्लोराक्विनच्या गोळ्यांप्रमाणे गिळले.)

प्रश्न : प्लाझमा थेरपीबद्दल तुमचे फायनल मत काय आहे?

उत्तर : उत्तम पण अतिशय भंपक थेरपी आहे! प्लाझमा टीव्ही असतो, थेरपी नव्हे!खिळ्ळ…खीखीखी!! विनोद केला हं!! (इथे प्रश्नकर्त्याच्या बीमार मनात पुन्हा हिंस्त्र विचार बळावले.

प्रश्न : १३७ कोटी लोकांना लस कशी देता येईल?

उत्तर : लसावि काढून! हॉहॉहॉ!! (इथे प्रश्नकर्त्याच्या डोक्यात खिट्टी सटकल्यासारखे काहीतरी झाले. ) एचारसीटी का करावी? का करु नये? रेमडेसिवीर का घ्यावे? का घेऊ नये? जीवरक्षक औषधांचा उपयोग का करावा, आणि का टाळावा? इस्पितळात दाखल व्हावे की होऊ नये? आदी अनेक विषयांवर हर्षवर्धन डॉक्टरांनी उलटसुलट उत्तरे देऊन आमच्या डोक्यात चक्रिवादळ उठवले. भणभणत्या डोक्यानेच आम्ही स्टुलावरुन उठलो…पुढले काही आठवत नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com