ढिंग टांग : माझा कोकण, माझी जबाबदारी!

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर, बॅब्स...मे आय कम इन?
Dhing Tang
Dhing TangSakal

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर, बॅब्स...मे आय कम इन?

उधोजीसाहेब : न...न...नाही!

विक्रमादित्य : (फुशारकीने) बॅब्स, आज मी वरळीपर्यंत जाऊन आलो!

उधोजीसाहेब : (करारी आवाजात) आधी हातपाय साबणाने धू, मास्क बदल आणि लांब उभा रहा!!

विक्रमादित्य : (समर्थन करत) हिंडण्याची प्रॅक्टिस राह्यली पाहिजे! घरात बसून बसून मुंबईचा भूगोल विसरायला होईल!

उधोजीसाहेब : (खजील होत) ते खरंच! परवा मी मलबार हिलवरून बांदऱ्याला जायला निघालो! रस्ता चुकलो!! पुन्हा मलबार हिलवरच आलो!!

विक्रमादित्य : (च्याट पडत) पण बॅब्स, तुम्ही पीपीइ किट घालून आत्ता कुठे निघालात?

उधोजीसाहेब : (किंचित वरमून) ट्राय करत होतो!

विक्रमादित्य : (थक्क होत) डोण्ट टेल मी! तुम्ही या खोलीतून दुसऱ्या खोलीत जात नाही कधी!

उधोजीसाहेब : (गंभीर आवाजात) माझा कोकण संकटात सापडलाय! त्यांना धीर द्यायला नको? माझा कोकण, माझी जबाबदारी!!

विक्रमादित्य : (आयडिया सुचवत) मग टीव्हीवर भाषण द्या ना! फिजिकली कशाला जायला हवं? हल्ली कुठलंही काम टीव्हीद्वारे होऊ शकतं!

उधोजीसाहेब : (विचारात पडत) तेही खरंच! पण...

विक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवून जाब विचारल्यागत) पण काय?

उधोजीसाहेब : (उद्वेगाने) बाकीचे ते सगळे विरोधी नेते कोकणात दौरे काढताहेत ना! ते फडणवीस आणि दरेकर तर पोचलेसुद्धा कोकणात!! काय म्हणावं या गृहस्थाला!! नागपूर ते कोकण थेट दौरा काढलान!! एका ठिकाणी टिकतील तर शपथ!! बरं तर बरं, त्यांचं जुळ्याचं दुखणं आहे! त्यांच्या पाठोपाठ ते दरेकरजीही निघतात! त्यामुळे माझ्या टीव्हीतल्या भाषणाची हे लोक टिंगल करतात!!

विक्रमादित्य : (समजूत घालत) हसतील त्याचे दात दिसतील! विरोधकांकडे तुम्ही लक्ष देऊन नका!!

उधोजीसाहेब : (धुसफुसत) आपले लोक काय कमी आहेत? आमचे पुनर्वसनमंत्री वडेट्टीवारजीही निघालेच की लगेच पाठोपाठ!! अशानं सगळे आमदार-नामदार पोचतील कोकणात आणि आम्ही बसू इथेच टीव्हीवर भाषणं देत!!

विक्रमादित्य : (नव्या धाडसाची माहिती देत) बाय द वे, तुम्ही खरंच कोकण दौऱ्याची तयारी करत असाल, तर मी पण येईन! वरळीपर्यंत जाऊन आल्याने मला प्रॅक्टिस आहे! पण कोकणात जाऊन करायचं काय?

उधोजीसाहेब : (समजूतदारपणे) माझ्या कोकणातल्या लोकांना धीर द्यायला हवा! काहीही झालं तरी मी तुमच्या पाठीशी उभा आहे, असं आश्वासन द्यायला हवं! मागल्या वर्षी निसर्ग वादळाच्या वेळी आपण आलिबागेला नव्हतो का गेलो? तसंच!

विक्रमादित्य : (उत्साहाने) चला, निघायचं?

उधोजीसाहेब : (संशयानं) चिडवतो आहेस की खरंच विचारतो आहेस?

विक्रमादित्य : आत्ताच निघू, आणि तुमच्या कोकणात जाऊ! लोक च्याट पडतील! म्हणतील, टीव्हीवरचे हे साहेब आज इथं ‘लाईव्ह’ कसे काय बुवा आले! हाहा!!

उधोजीसाहेब : (पीपीइ किट चढवत) लगेच जाऊ, नंतर गेलो तर पंचाइत व्हायची!

विक्रमादित्य : (खांदे उडवत) पंचाईत कसली त्यात?

उधोजीसाहेब : (शांतपणे) आर्थिक मदतीची मागणी होण्याच्या आत असे दौरे करावेत, एवढं मी राजकारणात शिकलोय! नंतर गेलं तर...आकडे वाढतात! जाऊ दे! तुला नाही कळणार!

विक्रमादित्य : (हरखून) गॉट इट! बॅब्स, तुस्सी ग्रेट हो! चला, कोकण आपलाच आसा! जय महाराष्ट्र!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com