Dhing Tang
Dhing TangSakal

ढिंग टांग : दखलपात्र कामगिरी !

होप एव्हरीथिंग इज ओके इन महाराष्ट्रा अँड आवर पार्टी. तुमचं आणि तिथल्या (आपल्या) गवर्मेंटचं कसं चाललं आहे? वेळोवेळी कळवत चला.

मि. पटोलेजी, नामास्ते!

होप एव्हरीथिंग इज ओके इन महाराष्ट्रा अँड आवर पार्टी. तुमचं आणि तिथल्या (आपल्या) गवर्मेंटचं कसं चाललं आहे? वेळोवेळी कळवत चला. महाराष्ट्रातल्या घडामोडींवर मी लक्ष ठेवून आहे. - काळजी वाटते! महाराष्ट्रातून उलटसुलट बातम्या ऐकू येत आहेत. त्यातल्या किती खऱ्या? किती खोट्या? पंजाबात अशीच सुरवात झाली होती, नंतर काय झाले, हे तुम्हाला टीव्हीवर बघून कळले असेलच. बाय द वे, समवन नेम्ड मि. सोमय्या म्हणून कोणी माहिती अधिकार कार्यकर्ता महाराष्ट्रात आहेत का? त्यांनी म्हणे काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचे घोटाळे एक-दोन दिवसात बाहेर काढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी जाहीर केले की आणखी कुणी? मोस्टली त्या नतद्रष्ट पार्टीचे (मी…मी…नाव घेत नाही ते! शी:!!) प्रदेशाध्यक्ष मि. पाटील म्हणून कोणीतरी आहेत, त्यांचे हे काम असावे का? प्लीज कीप मी अपडेटेड. आपल्या पक्षातील जे कोणते दोन मंत्री अडकणार आहेत, त्यांची संभाव्य नावे कळवावीत. जरुर पडल्यास मी दिल्लीहून निरीक्षक पाठवीन, आणि एखादी पक्षांतर्गत समितीही नियुक्त करीन. तुम्ही आपल्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहात, तुम्हीही लक्ष द्यायला हवे! आपल्या महाराष्ट्रा गवर्मेंटचे सीएम मि. ठाकरे यांच्याशी गेल्या काही महिन्यात बोलणे नाही. मागल्या खेपेला ते ऑनलाइन बैठकीत दिसले होते. बराच वेळ बोलले, परंतु, त्यांनी बहुधा माइक म्यूटवर ठेवला होता. परिणामी एक अक्षरही ऐकू आले नाही! जाऊ दे. त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा द्याव्यात. कळावे.

तुमच्याच महामॅडम. (१०, जनपथ )

म..म…म..महामॅडमजी,

बालके नानासाहेबाचा सादर व साष्टांग प्रणिपात. पत्र पोचले. विश्वास बसेना! तुमच्या सहीचे पत्र आणखी एक-दोघां पक्षसहकाऱ्यांना दाखवून खातरजमा करुन घेतली. ते लागलीच माझ्याशी गोडीगुलाबीने बोलू लागले. ते पाहून खात्री पटली! आमच्या महाराष्ट्रात अगदी सगळे काही छान सुरु आहे. काळजी नसावी! आपले तीन पक्षांचे सरकार चालवताना आजवर एकही अडचण आलेली नाही. आपल्या मार्गदर्शनानुसारच सारे चालले आहे. दोन दिवसांपूर्वी कमळ पक्षाच्या लोकांनी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची धमकी दिल्याने पक्षात समाधानाचे वातावरण आहे. एका मंत्र्याच्या डोळ्यात तर आनंदाश्रू उभे राहिले! मला म्हणाले, ‘‘जगात देव आहे…आहे! आपलीही दखल कुणीतरी घेतंय..!’’ गेले दोन वर्षे आपण सत्तेत सहभागी होतो, हेच कोणाला जाणवत नव्हते. मंत्रालयात कोणी ओळखसुद्धा दाखवत नाहीत, अशी तक्रार आपले मंत्री-आमदार करत असत. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या नेत्यांकडे सहज गेले तरी, ‘उद्या या’ असे ठरावीक उत्तर मिळत असे. पण घोटाळ्यांमध्ये दोघांची नावे आल्यानंतर चित्र बदलले आहे. ‘हम भी कुछ कम नहीं’ असे आता आपल्या पक्षाचे मंत्री ठणकावून सांगू लागले आहेत. ‘‘कोणी सोम्यागोम्याने कितीही आरोप केले तरी आम्हाला फरक पडत नाही,’’ असे मी पत्रकार परिषदेत सांगून टाकले आहे. घोटाळ्याचे आरोप आपल्या लोकांवर होतायत, हे चांगलेच आहे. त्यामुळे आपण सत्तेत सहभागी आहोत, याची जाणीव जागी राहाते.

माननीय मुख्यमंत्री तुमची नेहमी आत्मीयतेने चौकशी करत असतात. भेटले की ते ‘कसे आहात?’ असे विचारतच नाहीत. त्याऐवजी, ‘तुमच्या मॅडम कशा आहेत?’ असेच विचारतात. त्यांनीही तुम्हाला ‘नमस्कार’ कळवला आहे. बाकी सर्व ठीक.

सदैव आपला

एकनिष्ठ सेवक. नाना पी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com